किवीजपुढे शरणागती

Mumbai
world cup 2019

वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच आटोपले. अव्वल रँकिंगच्या भारताने साखळीत अव्वल क्रमांक पटकावला, पण गेल्या वर्ल्डकपचीच पुनरावृत्ती यंदा इंग्लंडमध्ये झाली. चार वर्षांपूर्वी सिडनीत यजमान ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत झाला होता. यंदा ओल्ड ट्रॅफर्डवर केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडमध्ये न्यूझीलंडने तीनदा भारताला हरवले असून एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताची विजयाची पाटी कोरीच आहे.

न्यूझीलंडच्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या भारताची १९ चेंडूतच ३ बाद ५ अशी दयनीय अवस्था केली ती ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्रीने. रोहित, राहुल, विराट यांनी पिनकोडप्रमाणे १,१,१ धाव केल्यामुळे सुरुवातीलाच भारताच्या डावाला खिंडार पडले. चौथ्या क्रमांकाची समस्या सुटलेली नाही, त्याची भारी किंमत भारताला मोजावी लागली. उपांत्य लढतीत वर्ल्डकप स्पर्धेत पदार्पण करणार्‍या रिषभ पंतला चौथा तर दिनेश कार्तिकला पाचवा क्रमांक देण्यात आला. २५ चेंडूत ६ धावा करणार्‍या कार्तिकची निवड का करण्यात आली, हेच एक कोडे आहे.

कोहली व शास्त्री जोडगोळीचा हा प्रयोग सपशेल फसला. पॉवर-प्लेच्या १० षटकांत ४ बाद २४ अशी अवस्था असताना पंत, पांड्या यांनी पडझड रोखण्याचा प्रयत्न केला, पण सँटनरच्या फिरकीवर स्लॉग-स्वीप मारण्याच्या नादात विकेट फेकून दोघेही माघारी परतले. दोघांचा उतावळेपणा भारताला महागात पडला. धोनी, जाडेजा जोडीने शतकी भागी करुन विजयासाठी निकाराची झुंज दिली. मात्र, धोनी धावचीत झाल्यावर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. साखळीत केवळ एक सामना गमावणार्‍या भारताची मधली फळी कमकुवत होती. अव्वल तीन फलंदाजांनी धावांच्या राशी उभारल्या. परंतु निर्णायक लढतीत अव्वल तीन फलंदाज ५ धावातच माघारी परतले अन् सारे समीकरणच बदलले.

साखळी लढतीत त्रिशतकी मजल मारणे सोपे होते. मात्र, इंग्लंडच्या लहरी वातावरणात दोन्ही उपांत्य लढतीत २५० धावांची मजल मारता आलेली नाही, त्याचा पाठलाग करणे अधिकच जिकिरीचे बनले. पावसाळी, ढगाळ वातावरणात स्विंगचा मुकाबला करताना धावा करणे मुश्किल झाले. फलंदाजांची कसोटी पाहणार्‍या वातावरणात कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर या न्यूझीलंडच्या अनुभवी फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जाडेजा यांनाच अर्धशतकी मजल मारता आली. धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांवर दडपण आले. त्यातच त्यांनी विकेट गमावल्या. धोनीसारख्या अनुभवी फलंदाजाला सातव्या क्रमांकावर पाठवण्याची चूक भारताला नडली.

जाडेजाचाही योग्य वापर करण्यात आला नाही. त्याच्यासारख्या अष्टपैलूऐवजी चायनामन कुलदीप यादववर जास्त भरवसा ठेवण्यात आला. १० पैकी केवळ दोनच सामन्यांत जाडेजाला खेळवण्यात आले. संघ व्यवस्थापनाच्या गफलतींचा फटका भारताला बसला. कर्णधार विराट कोहलीला आयसीसी स्पर्धांमध्ये यश मिळालेले नाही. चॅपियन्स ट्रॉफीपाठोपाठ (२०१७) वर्ल्डकप (२०१९) स्पर्धेत भारताला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. आगामी जागतिक कसोटी चॅपियनशीप स्पर्धेत कोहली यशस्वी ठरेल अशी आशा करुया.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here