बंगळूरुच्या विद्यार्थ्यांनी लावला रेस्क्यू रोबोटचा शोध

तपासकार्यात अथवा बचावकार्यामध्ये मदत करू शकेल असा रोबो बंगळूरूमधील विद्यार्थ्यांनी तयार केला आहे.

Bengaluru
Students
विद्यार्थी (सौजन्य - इंडियन एक्स्प्रेस)

सप्तगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हेक्सापॉड नावाचा कोळ्याच्या आकाराचा एक रोबोट तयार केला आहे. हा रोबोट तपासकार्यात अथवा बचावकार्यामध्ये मदत करू शकेल असं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर अंध व्यक्तींसाठी स्मार्ट स्टीक म्हणूनदेखील याचा वापर करता येऊ शकतो असं या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे. हेक्सापॉडची श्रेणी अमर्यादित असून जगातील कोणत्याही भागातील मोबाईल डिव्हाईस वापरून इंटरनेटनं यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं ही या रोबोटची खासियत आहे.

काय आहेत रोबोची वैशिष्ट्य?

हा हेक्सापॉड रोबोमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग फीचर असून ३६० डिग्रीचा मुव्हेबल कॅमेरा आहे. शिवाय यामध्ये तापमान सेन्सरदेखील बसवण्यात आलं आहे. हा रोबोट दोन वेगवेगळ्या गतीमध्ये सर्व दिशानिर्देशांमध्ये फिरू शकतो असं या रोबोचा शोध लावणाऱ्यांपैकी एक अनुदीप मेडिसेट्टीनं सांगितलं. याचा मुख्य उपयोग बचावकार्य अथवा तपासकार्यात होऊ शकतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असून त्यासाठी या रोबोटमध्ये संवादासाठी माईक लावण्यात आला आहे. यातील अर्ड्यूइनो सेन्सरच्या सहाय्यानं आपोआप अडथळे टाळता येऊ शकतात. लष्करी घुसखोरी थांबवण्यासाठी अथवा प्रत्यक्ष तापमान जाणून घेण्यासाठीदेखील या रोबोटचा उपयोग करता येतो. सध्या या रोबोटी किंमत २५ हजार असून याचं उत्पादन वाढल्यास, त्याची किंमत कमी होऊ शकते असं या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं आहे. या रोबोटची प्रेरणा कीटकांच्या हालचालीतून मिळाली असून खाण उद्योगामध्येदेखील याचा वापर होऊ शकतो असं विद्यार्थी रवीशंकरनं सांगितलं. तर हा रोबोट अरविंद वल्सानन, हर्षा एम. एन., अनुदीप मेडीसेट्टी आणि दीपक कुमार या चौघांनी मिळून तयार केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here