दिव्याने केला घात, ८० वर्षीय वृद्धेचा होरपळून मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

दिवाळी सणानिमित्त देव्हाऱ्यात लावलेला दिव्याने पेट घेऊन लागलेल्या आगीत ८० वर्षीय वृद्धेचा होरपळून मृत्यू झाला असून तिघेजण या आगीत भाजल्याची घटना भिवंडीतील नारपोली या ठिकाणी रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. लक्ष्मी म्हसकर (८०) असे या आगीत मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. लक्ष्मी म्हसकर या वृद्धा मुलगी अंजू सरेन (४५) आणि नात ज्योती (१७) यांच्यासह भिवंडीतील वाफेवर कंपाउंड, राहनाळ भिवंडी येथे राहण्यास होत्या.

दिवाळीचा सण आल्यामुळे अंजू सरेन यांनी रविवारी सायंकाळी घरातील देव्हाऱ्यात तेलाचे दिवे लावले होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व जण झोपले असताना पंख्याच्या वाऱ्यामुळे दिव्याने पेट घेऊन प्रथम देव्हाऱ्यात आग लागली. काही कळण्याच्या आतच आग संपूर्ण घरात पसरताच अंजुने मुलीला व आईला उठवून घराबाहेर पडण्यास सांगितले. मात्र वृद्धपकाळामुळे लक्ष्मी यांना बाहेर पडत न आल्यामुळे या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात अंजू आणि तिची मुलगी ज्योती आणि शेजारी राहणारी १९ वर्षीय युवती या तिघी किरकोळ भाजल्या.

शेजाऱ्यांनी धाव घेऊन ताबडतोब आग विझवून जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णलायत दाखल करण्यात आले. या घटनस्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग विझवली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधीक तपास सुरू आहे.