नगरसेविकेच्या पुढाकारामुळे नोकरीसाठी एनजीओने डांबलेल्या नऊ तरुणींची सुटका

ठाण्यातील येऊरमधील सुपरवासी एनजीओने परराज्यातील तरुणींना नोकरीच्या नावाखाली बळजबरीने डांबून ठेवले होते. तसेच त्यांना मानसिक त्रास होत असल्याची तक्रार आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलीस ढिम्म होते. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी छापा टाकून ९ तरुणींची सुटका केली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे नगरसेवक नजीब मुल्लांनी शोधून काढावे. भाजपाची स्टंटबाजी म्हणाऱ्या नजीब मुल्लांनी प्रेसनोट काढण्याऐवजी थेट गृह मंत्री अनिल देशमुखांना पत्र पाठविले असते, तर तरुणींना न्याय मिळाला असता, असा टोला याप्रकरणी पुढाकार घेणाऱ्या भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी लगावला आहे. तरुणींच्या बेडरुममध्ये सीसीटीव्ही लावून संचालक मुलींची सुरक्षा कशी करत होते, याचे पोलिसांकडूनही उत्तरही घ्यावे, असेही त्या म्हणाल्या.

सुपरवासी एनजीओकडून होणाऱ्या छळाच्या आणखी तक्रारी मिळाल्या आहेत. त्याबाबत भाजपाकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाद मागितली जात आहे. ही भाजपाची स्टंटबाजी कशी असू शकेल, असे पेंडसे यांनी म्हटले आहे. या गंभीर प्रकरणाची नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती. पण `जळी स्थळी काष्ठी’ भाजपा द्वेष करणाऱ्या व्यक्तीला हे कसे समजणार. नेत्यांची सरबराई आणि नेत्यांच्या गाडीचे दरवाजे उघडून देणे म्हणजेच समाजकार्य अशी व्याख्या असलेल्यांकडून अपेक्षा ती काय करणार, असा टोलाही मृणाल पेंडसे यांनी लगावला आहे.

सुपरवासी या संस्थेचा नव्हे तर त्यात कार्य करणाऱ्या नौपाड्यातील कार्यकर्तीचा सत्कार करण्यात आला होता. मात्र, या संस्थेकडून गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यावर भाजपानेच त्यांचे बिंग फुटले. गुन्हेगारांची पाठराखण करण्याची संस्कृती ही भाजपाची नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचा इतिहास आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

हेही वाचा –

Wedding Website : विवाह संकेतस्थळावर महिलेला भामट्यानं फसवलं!