घरट्रेंडिंग२५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतात केला होता पहिला मोबाईल कॉल

२५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतात केला होता पहिला मोबाईल कॉल

Subscribe

भारतात आज लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत, शहरांपासून ते गावागावापर्यंत कोट्यवधी लोकांच्या हातात मोबाईल फोन दिसतो. मोबाईल वापरणे ही आता अतिसामान्य गोष्ट झालेली आहे. जगभरात भारत ही सर्वात मोठी मोबाईलची बाजारपेठ झालेली आहे. पण तुम्हाला माहितीये का? भारतात पहिला मोबाईल फोन कधी आला? पहिला कॉल कधी लावला गेला? तर आजच्याच दिवशी म्हणजे ३१ जुलै १९९५ रोजी भारतात पहिला मोबाईल कॉल केला गेला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी आजच्या दिवशी पहिला मोबाईल कॉल तत्कालीन केंद्रीय दळणवळण मंत्री सुखराम यांना केला होता.

भारतातील हा पहिला मोबाईल कॉल नोकीयाच्या हँडसेटमधून करण्यात आला होता. त्यासाठी मोदी टेलस्ट्रा कंपनीची मोबाईल नेट ही नेटवर्क देणारी सेवा वापरण्यात आली होती. पश्चिम बंगाल मधील बी.के.मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेलस्ट्रा कंपनीच्या भागीदारीतून मोबाईल नेट सेवा देण्यात येत होती. त्याकाळी मोबाईलवर आऊटगोईंग आणि इनकमिंगसाठी प्रति मिनिट ८.४ रुपये लागत असत. मात्र जेव्हा मोबाईल ट्राफिक वाढू लागले तेव्हा हा दर प्रति मिनिट १६.८ रुपयापर्यंत गेला होता.

- Advertisement -

भारतातला पहिला मोबाईल कोलकातामध्ये येण्यासाठी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी मोदी टेल्स्ट्राचे अध्यक्ष बी.के.मोदी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर मोदी यांनी १० महिन्यात ज्योती बसू यांना मोबाईल कॉल करण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगितले. आजच्याच दिवशी कोलकाच्या रॉयटर बिल्डींग येथून दिल्लीच्या संचारभवनात हा कॉल कनेक्ट करण्यात आला होता.

मोबाईलची सुरुवात झाल्यानंतर कॉलरेट महाग असल्यामुळे सुरुवातीच्या पाच वर्षात मोबाईल सबक्रायबर्सची संख्या ५० लाखांपर्यंतच गेली होती. मात्र जसजसे कॉल दर आणि मोबाईलच्या किंमती खाली येऊ लागल्या तसा मोबाईल वापरकर्त्यांची संख्येत गुणाकार होत गेला. आज भारतातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या ही ११७ कोटींच्या आसपास पोहोचली आहे. १९९५ रोजी मोबाईल फोनची किंमत ही ४० हजारांच्या घरात होती. आज २५ वर्षांच्या महागाईचा विचार केल्यास मोबाईलची किंमत २ लाखांपर्यंत पोहोचायला हवी होती. मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज काही हजारांपासून ते लाखाच्या घरात मोबाईल फोन सहज उपलब्ध होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -