Coronavirus चा धोका; वाचा आपण तासाभरात किती वेळा चेहऱ्याला हात लावतो

Mumbai
stop face touching
चेहऱ्याला हात लावणे थांबवा आणि कोरोनाला थोपवा

कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहायचे असेल तर तुम्हाला वारंवार हात धुणे, हाच जालीम उपाय आहे कारण कोरोनाचा विषाणू हाताला चिकटलेला असेल आणि तुम्ही तो हात तुमच्या चेहऱ्याला लावाल तर तुम्ही कोरोनाचे शिकार व्हाल. अशावेळी कमीत कमी वेळा तोंडाला हात लावण्याची सवय करून घेणे अवघड आहे. कारणही तसेच आहे. ऑस्टेलियातील वैद्यकीय क्षेत्रातील काही विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणानुसार आपण एक तासात किमान २३ वेळा नाक, डोळे, तोंड किंवा कान यांना हात लावत असतो. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची जास्त शक्यता असते, असे यात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठातील वैद्यकीय शाखेच्या २६ विद्यार्थ्यानी केलेल्या या सर्वेक्षणानुसार एक तासात १ व्यक्ती तब्बल २३ वेळा तिच्या चेहऱ्याला हात लावत असते. २०१५ साली केलेल्या या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. चेहऱ्याच्या विविध अनावश्यक भागांना हात लावण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीरात बाहेरील विषाणूंचा प्रवेश होत असतो, असेही यात म्हटले आहे.

ऑफिसात तासाला १६ वेळा हात लागतो

२००८ साली झालेल्या यासंबंधीच्या दुसऱ्या एका सर्वेक्षणात अश्या प्रकारे चेहऱ्याला हात लावण्याच्या सवयीमुळे जंतू संसर्ग होऊन श्वसनाचे आजर होतात. ऑफिसमध्ये असताना कोणतीही व्यक्ती तासाला किमान १६ वेळा चेहऱ्याच्या विविध भागांना हात लावत असते, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

डॉक्टरही या सवयीच्या आहारी

२०१४ सालीही याच विषयावर सर्वेक्षण झालेले होते. त्यात तर १-२ तासात डॉक्टर्स, नर्स हे वैद्यकीय क्षेत्रातील लोकही किमान १९ वेळा चेहऱ्याच्या विविध भागाला हात लावत असतात, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रातील घटक अश्या सवयीच्या दुष्परिणामाविषयी माहितगार असतात. तरीही ते या सवयीच्या आहारी गेलेले आहेत, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.