वाकडेतिकड्या दातांमुळे पत्नीला दिला ट्रिपल तलाक

हैदराबादमधल्या एका माणसानं पत्नीला दात वाकडेतिकडे असल्यामुळे ट्रिपल तलाक दिला. महिलेनं तिच्यावर बरेच अत्याचार झाल्याचा पती आणि सासरच्यांवर आरोप केला.

हैदराबाद पोलीस स्थानकात एका माणसाने पत्नीला वाकडे दात असल्यामुळे ट्रिपल तलाक दिला आहे. यामुळे त्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेचं नाव रुखसाना बेगम असून, तिचं लग्न मुस्तफा नावाच्या तरुणाशी २७ जून २०१९ रोजी झालं होतं. लग्नाच्या दरम्यान मुस्तफाच्या परिवारानं रुखसानाच्या परिवाराकडून हुंड्याची मागणी केली होती. त्यानंतरही आणखी हुंड्याची मागणी करत तिचा छळ करत राहिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ ऑक्टोबर रोजी मुस्तफावर भादंवि कलम ४९८ अ, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि तिहेरी तलाक कायद्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई सध्या सुरु आहे.

‘आमच्या लग्नाच्या वेळी, मुस्तफा आणि त्याच्या परिवारानं माझ्या परिवाराकडून खूप गोष्टींची मागणी केली होती. आम्ही त्या मागण्या पूर्ण देखील केल्या. मात्र तरिही लग्न झाल्यानंतर माझे पती आणि सासरच्यांनी माझा छळ सुरुच ठेवला. माझ्या माहेरातून आणखी सोनं आणि पैसे आणायला सांगायचे. मुस्तफानं माझ्या भावाकडून बाईक देखील घेतली होती.’ रुखसाना बेगम

कशा प्रकारे रुखसानावर अत्याचार झाला?

पुढे रुखसानानं हे देखील सांगितलं की दररोज तिला छळलं जायचं. एके दिवशी मुस्तफा तिला म्हणाला की, तिचे दात वाकडे असल्यामुळे त्याला ती आवडत नाही आणि त्याला यापुढे तिच्यासोबत राहायचं नाही. या घटनेनंतर रुखसानाला तिच्या सासरच्यांनी १०-१५ दिवस घरात बंद करून ठेवलं. ती आजारी पडल्यानंतर तिला माहेरी पाठवलं. त्यानंतर तिनं स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस तक्रारीनंतर सासरची मंडळी तिला घरी परत घेण्यास तयार झाले. पण पुन्हा काही दिवसांनतर मुस्तफाने रुखसानाच्या घरी जाऊन तिला ट्रिपल तलाक दिला. तसेच सासरच्या मंडळींना शिवीगाळ देखील केली.

त्यानंतर रुखसानानं मुस्तफाशी संपर्क साधण्यास त्याला फोन केला आणि तेव्हा देखील फोनवर त्यानं रुखसानाला ट्रिपल तलाक दिला. परत एकदा रुखसानानं ट्रिपल तलाक आणि हुंड्याच्या आधारावर मुस्तफा आणि त्याच्या परिवारावर गुन्हा दाखल केला. पुढील कारवाई चालू असून रुखसानाला पोलिसांकडून पूर्ण न्याय अपेक्षित आहे.