मुख्यमंत्र्यांनी नागपूरला ‘क्राईम सिटी’बनवले

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Mumbai
sharad pawar
पवार यांचा सत्ताधार्‍यांना टोला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपुरात सभा घेऊन देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला क्राईम सिटी अशी नवी ओळख दिली आहे,अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. छत्रपतींचे स्मारक, इंदू मिलवरचे बाबासाहेबांचे स्मारक अशा सगळ्या प्रकल्पांची कामे रखडली आहेत. एक विटही रचली गेलेली नाही. काम तर काही केले नाही मात्र मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवले. मग तुमचे काय हाल असतील असे सांगत पवारांनी यावेळी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. राज्यात कुठल्याही रस्त्याने गेलात तर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. आम्ही आघाडीच्या काळात खड्डेमुक्त राज्य घडवण्याचा संकल्प केला होता, मात्र या सरकारने खड्डे युक्त राज्य घडवण्याचा निर्धार केला आहे,असेही पवार म्हणाले.

राज्यामध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असताना या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आणि परदेशी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी उध्वस्त झाला आहे. या भागात अतिवृष्टी झाली, शेतकर्‍यांनी पीकविमा काढून देखील त्यांना पैसे मिळाले नाहीत. सरसकट कर्जमाफीची घोषणा यांनी केली पण अजूनदेखील 70 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली नाही,असा आरोप देखील पवार यांनी यावेळी केली.

गडकरींची स्तुती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. परंतु, येथील रस्ते खड्डेयुक्त आहेत, गडकरींनी केंद्रातील निधीतून उड्डाणपुलाची चांगली काम केली मात्र विदर्भासह राज्यात रस्त्यांच्या दयनीय अवस्थेस मुख्यमंत्र्यांची निष्क्रियता जबाबदार असल्याचे वक्तव्य यवतमाळमध्ये शरद पवारांनी केले आहे.