घरमहाराष्ट्र..आणि भर पावसात शरद पवारांनी केलं भाषण!

..आणि भर पावसात शरद पवारांनी केलं भाषण!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. या सभेमध्ये पवारांचं भाषण सुरू असताना अचानक पावसानं हजेरी लावली. मात्र, वरून कोसळणाऱ्या पावसाची अजिबात तमा न बाळगता शरद पवारांनी भर पावसात समोर जमलेल्या लोकांसमोर भाषण केलं. यावेळी शरद पवारांनी नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसलेंवर निशाणा साधला. ‘राज्यात जनता २१ तारखेला महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे. एखाद्या माणसाकडून चूक झाली, तर ती चूक कबूल करायची असते. लोकसभेच्या उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीरपणे कबूल करतो’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

 

- Advertisement -

व्हिडिओ पाहिलात का? – पाय सुजलेले, शरीर थकलेले तरी मनाने तरुण शरद पवार

‘मुख्यमंत्र्यांकडे पैलवान असतील, माझी हरकत नाही’

‘साताऱ्यातली निवडणूक महत्त्वाची आहे. देशाचे पंतप्रधान इथे येऊन गेले. मुख्यमंत्री म्हणतात, या निवडणुकीत विरोधात कुणी पैलवान दिसत नाही. मी त्यांना जाहीरपणे सांगितलं, की तुमच्याकडे पैलवान असतील, तर मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण या तालुक्यात अनेक पैलवान तयार करणारे आमच्यासोबत आहेत. आणि त्यातही कुस्ती किंवा पैलवान हा भाजपवाल्यांच्या तोंडात न शोभणारा विषय आहे. ही खऱ्या अर्थानं कुस्तीच नाही. या निवडणुकीत ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायची संधी मिळेल, त्या निवडणुकीचा निकाल संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. सातारा जिल्हा विचाराचा आणि मताचा पक्का आणि शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने जपणारा आहे हे स्पष्ट होईल, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

नुकताच शरद पवारांचा पाय सुजलेला असून देखील प्रचार करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता भर पावसात सभा घेणाऱ्या शरद पवारांचा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला असून त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -