घरमुंबईस्फोटके ठेवणार्‍याच्या शोधासाठी 5 पथके

स्फोटके ठेवणार्‍याच्या शोधासाठी 5 पथके

Subscribe

कळंबोलीतील सुधागड विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सापडलेल्या स्फोटक वस्तूंमुळे रायगड जिल्हा हादरला आहे. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून स्फोटके ठेवणार्‍या संशयिताच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. नवी मुंबई पोलिसांनी पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2 व पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या नियंत्रणाखाली पोलीस ठाण्यातील एकूण 75 अधिकारी आणि कर्मचार्‍यांची टीम या तयार करण्यात आली आहे. तपासासाठी 5 पथके तयार करण्यात आली असून शाळा, कॉलेज, मॉल्स, सिनेमा गृह व गर्दीच्या ठिकाणी एखादी वस्तू बेवारस स्थितीत आढळून आल्यास त्याला हात न लावता त्याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले.

सुधागड विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्फोटकांसह आढळलेली हातगाडी घेऊन येताना सीसीटीव्ही चित्रिकरणात आढळलेली व्यक्ती अन्य एका सीसीटव्ही चित्रिकरणात रिक्षातून उतरताना आढळली आहे. त्यामुळे स्फोटके ठेवणार्‍या या संशयिताला शोधण्यासाठी पोलिसांनी संबंधित रिक्षाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यातील रिक्षावाल्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

शाळा परिसरातील बॉम्ब निकामी करण्यासाठी राज्य दहशतवादविरोधी पथकाची मदत घेण्यात आली असली तरी, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची सूत्रे नवी मुंबई पोलिसांकडेच राहतील असे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी स्पष्ट केले आहे. कळंबोली वसाहतीमधील रविवार आणि सोमवारचा मोबाइल फोनच्या ‘डम्पडाटा’तून काही हाती लागते आहे का, तसेच वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरून हातगाडीवरून आणलेला बॉम्बचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत.

रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वसाहतीच्या झवेरी बाजारातील मुख्य रस्त्यावरून एक इसम बॉम्ब ठेवलेली हातगाडी ढकलत शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत नेत असतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी टिपले आहे. निळ्या रंगाचा शर्ट तसेच डोक्यात टोपी आणि टोपीखाली पांढर्‍या रंगाचा ओढलेला रुमाल यामुळे सीसीटीव्हीमध्ये संबंधित व्यक्ती अस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी कळंबोलीतील सुमारे 20 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. यामध्ये हातगाडी ढकलणारी व्यक्ती एका रिक्षातून उतरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या रिक्षाचाही शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

अद्याप संबंधित व्यक्तीचा शोध लागलेला नाही. नवी मुंबई क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करीत आहे. पोलिसांची इतर सर्व पथके यात काम करत आहेत. आम्ही मदतीसाठी व माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी ‘एटीएस’ची मदत घेतली होती. -संजयकुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -