घरमुंबईविज्ञान क्षेत्रातील संधी

विज्ञान क्षेत्रातील संधी

Subscribe

दहावीच्या परीक्षेचा डोंगर नुकताच पार झाला आणि बघता बघता निकालही लागला. मित्र-मैत्रिणी यशस्वीरीतीने यातून पार झालेले असतील. त्यांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा! मागे जे राहिलेत त्यांनाही शुभेच्छा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी!

चला तर आता सज्ज व्हायचं आहे पुढचा डोंगर सर करायला; तो म्हणजे आता काय निवडायचा? मला इतिहास आवडतो, तर माझ्या आवडीला प्राधान्य देत कला शाखेला प्रवेश घ्यायचा की मैत्रिणीला सीए व्हायचंय म्हणून तिच्यासोबत वाणिज्य शाखेला जायायचेे. तर बाबांची इच्छा आहे मी इंजिनिअर व्हावे.

- Advertisement -

म्हणून विज्ञान घेऊ का? असे विचार यावेळी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांसमोर असतात. म्हणूनच मुद्दाम तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच विज्ञान विषयात प्रवेश घ्या. याचा एक फायदा असतो. समजा तुम्हाला विज्ञान विषय कठीण वाटत असेल तर तुम्ही पदवीसाठी वाणिज्य किंवा कला शाखेत प्रवेश घेऊ शकता. तसेच बारावीत वाणिज्य शाखेत असाल तर कला शाखेत पदवीसाठी जाता येते. पण कला शाखेतून वाणिज्य किंवा वाणिज्य शाखेतून विज्ञान किंवा कला शाखेतून विज्ञान हा बदल तुम्हाला करता येत नाही. कोणत्याही शाखेत प्रवेश घेण्यापूर्वी हे लक्षात असलेले बरे आहे.

दहावीनंतर विज्ञान आणि बारावीनंतर डॉक्टर आणि इंजिनिअर व्हायचे असाच कल आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टरसाठी नीट पास होणे बर्‍याच विद्यार्थ्यांना जमत नाही. म्हणून कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात. इंजिनिअरिंगसाठी बर्‍याच जागा असल्याने सगळेच इंजिनिअर होत आहेत. पण नोकरी किती लोकांना मिळते? कुठल्याही विषयात काम करण्यासाठी त्या विषयात प्राविण्य मिळवावे लागते व त्यास जोड लागते ती तंत्रशिक्षणाची व कौशल्य विकासाची. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान हे कधीही महत्त्वाचे असते. इंजिनिअरिंगसाठी जेईई, सीईटी असे प्रवेश परीक्षेचे विकल्प आहेत. जेईई परीक्षेद्वारे भारतातील वेगवेगळ्या आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश मिळवता येतो.

- Advertisement -

सीईटी ही राज्यस्तरावरील प्रवेश प्रक्रिया आहे. त्यातून अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग)च्या मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, केमिकल अशा विविध प्रकारच्या विषयात प्रवेश मिळवता येतो. मुळातच कमी जागा असलेल्या परीक्षांमध्ये फारच मोजकी मुले उत्तीर्ण होतात. म्हणून अन्य विद्यार्थ्यांनी निराश व्हायचे का? तर नाही. सगेळच डॉक्टर आणि इंजिनिअर झालेत तर मग बाकीच्या क्षेत्रात कोण काम करणार? विज्ञान विषयात अशा बर्‍याच शाखा आहेत, ज्यामध्ये तुम्ही विशेष प्राविण्य मिळवू शकता व आपल्या आवडीच्या विषयात कामही करू शकता. आपली आवड किंवा छंद जोपासण्यासाठी कोणी आपल्याला पगार देत असेल तर यापेक्षा चांगले अजून काय? चला तर जाणून घेऊया विज्ञान विषयातील उपलब्ध संधी.

बारावी विज्ञान शिक्षण घेतले असता तुम्ही भारतीय सैन्य सेवेस पात्र होता. विशिष्ट ठरवलेले गुण व पात्रता असल्यास तुम्ही बारावीनंतर थेट सैन्य दल, वायू दल किंवा नौसेनेत दाखल होऊ शकता. बारावीनंतर पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेता येतो. यासाठी कुठलीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. तुमच्या बारावीच्या गुणांवर आधारीत तुम्हाला विद्यापीठात प्रवेश घेता येतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विज्ञानाच्या मुख्य विषयांव्यतिरिक्त इतरही अनेक विषय आहेत. ज्यामध्ये नोकरीच्या चांगल्या संधी भविष्यात उपलब्ध होतील. तंत्रशिक्षण (आयटी) संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स), जैवतंत्रज्ञान (बायोलॉजी) या विज्ञानाच्या मुख्य विषयांव्यतिरिक्त जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नोलॉजी), सूक्ष्मजीव विज्ञान (मायक्रोबायोलॉजी) यासारख्या कौशल्य विकासाशी निगडीत विषयांमध्ये बर्‍याच संधी मिळू शकतात.

वरील सर्वच विषयांमध्ये तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. पदवीनंतर पुढे याच विषयांत विशेष प्राविण्यासाठी दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. त्यानंतर तुम्हाला नोकरीची अनेक दालने खुली होतात. पण तुम्ही शिक्षणाची कास धरून पुढे डॉक्टरेटची पदवी घेऊ शकता.

प्रत्येक विषयासाठी संधीचा थोडक्यात आढावा घेऊयात.

भौतिकशास्त्र विषयात तुम्ही महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकता. या मुख्य विषयात अनेक घटक विषय आहेत. उदा. नाभिकीय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, क्वांटम मेकॅनिक्स, खगोलशास्त्र यातील ठराविक घटक विषयात तुम्ही पदव्युत्तर शिक्षण व डॉक्टरेट पूर्ण करू शकता. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वैज्ञानिक पदावर तुम्ही काम करू शकतात. एखाद्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कामाला लागू शकता. यासोबत पुढील जीवनात संशोधन करण्याचे स्वातंत्र मिळते.

रसायनशास्त्र विषयात पदवी पूर्ण केल्यास रसायशास्त्राशी निगडीत कंपन्यांमध्ये तुम्ही विविध पदावर काम करू शकता. उदा. अन्न तपासणी शाखा, दवाखान्यांमध्ये रक्त तपासणी गट, रसायन विशेषज्ज्ञ इत्यादी. मात्र पदवीनंतर या विषयातील विशेष कोर्स, डिप्लोमा करावा लागतो.

जीवशास्त्र तुम्हाला वनस्पती व प्राण्यांशी जास्त आपुलकी वाटत असेल तर हा उत्तम विषय आहे. यात तुम्ही प्राणी विज्ञान आणि वनस्पती विज्ञानाचा सखोल अभ्यास करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही बायोटेक्नॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी यासारख्या विषयातून पदवी शिक्षण घेऊ शकता. आजकालच्या युगात जैवतंत्रज्ञानास जास्त मागणी आहे. त्यामुळे विविध कंपन्यांमध्ये स्पेशालिस्ट किंवा संशोधक म्हणून काम करता येते. वरील सर्वच विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन नीटची परीक्षा उत्तीर्ण झाले तर कॉलेजांत प्राध्यापक म्हणून तुम्ही नोकरी करू शकता.

आयटी व कॉम्प्युटर सायन्स या विषयातील पदवी ही जवळपास संगणक क्षेत्रातून इंजिनियरिंग केल्यासारखीच आहे. संगणक व आयटी क्षेत्रात नोकरीच्या बर्‍याच संधी या विषयांतून पदवी घेतल्यानंतर उपलब्ध होतात. पदवी शिक्षणानंतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही पात्र होतात. यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमधून अनेक स्पर्धां परीक्षांमधून प्रशासन, पोलीस सेवा यामध्ये प्रवेश मिळवता येतो. इतरही अनेक सरकारी खात्यांच्या परीक्षा देता येतात.

पदव्युत्तर शिक्षणानंतर पेट (महाराष्ट्राकरिता) व नेट यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तुम्ही डॉक्टरेटच्या कोर्ससाठी पात्र होतात. नोकरीच्या सुरुवातीच्या काही काळात मोठ्या पगाराची अपेक्षा न करता केवळ अनुभव मिळवण्याकडे भर द्या. एक-दोन वर्षे शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था किंवा उद्योगांमध्ये काम करून अनुभव घ्या. अनुभवाने तुम्हाला आपल्या क्षेत्राची माहिती होईल व पुढील उत्तमोत्तम संधी सहज मिळतील. आईवडील, मित्रमैत्रिणींच्या आवडीवर भर न देता, आपल्या आवडीचा विषय निवडला असता, शिक्षणात व काम करण्यातही एक उत्सुकता व आनंद वाटतो व आपला छंद, आवड जोपासल्याचे समाधानही मिळते! तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!

– शीतल चोपडे, सहाय्यक शिक्षणाधिकारी, नेहरू सायन्स सेंटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -