घरमुंबईअनधिकृत वाहन पार्किंगवर दंडात्मक कारवाई

अनधिकृत वाहन पार्किंगवर दंडात्मक कारवाई

Subscribe

पहिल्याच दिवशी ५६ वाहनांवर कारवाई, ९ जणांनी भरला दहा हजारांचा दंड.

मुंबईत महापालिकेने जाहीर केलेल्या अधिकृत वाहनतळापासून ५०० मीटर परिसरात उभ्या करण्यात आलेल्या अनधिकृत वाहनांवर रविवारपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. जी/दक्षिण विभागातील सेनापती बापट मार्गावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर पहिला १० हजाराचा दंड करण्यात आला आहे. दिवसभरात मुंबईतील एकूण चारचाकीसह इतर ५६ वाहनांवर महापालिकेच्या नेमण्यात आलेल्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली. यापैकी केवळ ९ जणांनी प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड भरला असून उर्वरित वाहने महापालिकेच्या ताब्यात आहेत.

वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि वाहनांच्या पार्किंगला शिस्त येण्यासाठी 

मुंबईतील रस्त्यांवर व रस्त्यांलगत अतिक्रमित स्वरुपात अनधिकृत वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने सुलभपणे उभी करता यावीत यासाठी महापालिकेने विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरही अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, याकरिता पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ ठिकाणी असणाऱ्या महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरातील रस्ते वा पदपथांवर अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्या कारवाईला रविवारपासून सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

अनधिकृतपणे पार्किंग केलेली वाहने टोविंगने दूर केली

महापालिकेच्यावतीने दुचाकीसह चारचाकी वाहनांना १० हजारांचा दंड आधीच घोषित केल्यामुळे एरव्ही रस्त्यांवर दिसणारी वाहने वाहनतळांमध्ये उभी करण्याकडे चालकांचा कल होता. परंतु तरीही अनेक वाहने वाहनतळ परिसरात रस्त्यांवर उभी असल्याने रविवारी सर्व परिमंडळांमध्ये नेमलेल्या पथकामार्फत या अनधिकृत उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करून टोविंग करत नेण्यात आले. जी/दक्षिण विभागात एकूण सहा वाहनतळ असून त्यातील ३ वाहनतळ मोफत आहेत. तर उर्वरीत ३ वाहनतळांच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, सुरुवातील लोकांना वाहने हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या. तरीही काहींनी वाहने न हटवल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे परिमंडळ दोन मधील सार्वजनिक वाहनतळांमध्ये इतर रविवारच्या तुलनेत २५५ वाहने अधिक प्रमाणात उभी होती.

४७ वाहने पालिकेच्या ताब्यात 

रविवारी दिवसभरात एकूण ५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ९ जणांनी ९० हजार रूपये दंड भरून वाहने सोडवून घेतली. उर्वरित ४७ वाहने पालिकेच्या ताब्यात आहेत. ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारून परत देण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या कारवाईत दंडापोटी जमा होणारा पैसा हा त्या-त्या विभागातील विकासकामांवर खर्च केला जाईल, असे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

जनजागृती ऐवजी थेट कारवाई

मुंबई महापालिकेने अनधिकृत वाहनांवरील दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर त्वरीत रविवारी याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. परंतु दंडात्मक कारवाई करताना आधी जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक होते. परंतु जनजागृती न करता थेट दंडात्मक कारवाई केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. यापूर्वी महापालिकने क्लीनअप मार्शल योजना राबवताना सुरुवातीचे तीन महिने लोकांमध्ये जनजागृती केली होती. त्यानंतरच दंडात्मक कारवाईला सुरुवात केली होती.

आयुक्तांनी केला महापालिका सभागृहाचा अवमान

मुंबईतील अधिकृत वाहनतळांच्या १ कि.मी अंतरावर अनधिकृत वाहने उभे केल्यास १० हजारांपर्यंतचा दंड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने गटनेत्यांच्या सभेपुढे मान्यतेसाठी सादर केल्यानंतर त्यात सुधारणा करत १ कि.मी ऐवजी ५०० मीटरचे अंतर करण्यात आले. त्यामुळे गटनेत्यांच्या मान्यतेनंतर याची त्वरीत अंमलबजावणी करण्यात आली. दंडात्मक कारवाई ही आर्थिक बाबींशी संलग्न असल्याने तसेच धोरणात्मक बाब असल्याने त्याला वैधानिक समित्यांसह महापालिका सभागृहाची मान्यता आवश्यक आहे. परंतु महापालिका सभागृहाची मान्यता न घेताच आयुक्तांनी, महापालिकेच्या नियमांना फाटा देत त्याची थेट अंमलबजावणीला सुरुवात करत सभागृहाचा अवमान केला आहे. गटनेत्यांच्या बैठकीला वैधानिक दर्जा नाही. त्यामुळे गटनेत्यांच्या सभेत मंजूर झाल्यानंतर वाहनतळावरील दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव विधी समितीपुढे सादर करणे आवश्यक आहे. विधी समितीच्या मंजुरीनंतर सभागृहात प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. सभागृहाच्या मान्यतेनंतरच याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाऊ शकते.

या ७ वाहनतळांमध्ये मिळणार मोफत पार्किंग

के-पश्चिम – ओशिवरा लिंक रोड रुणवाल बिल्डींग
एन विभाग – विक्रोळी पश्चिम वाधवा ग्रुप, आर सिटी मॉलजवळ
पी-दक्षिण – गोरेगाव पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाशेजारी हबमॉलजवळ
जी/दक्षिण – लोअरपरळ सेनापती बापट मार्ग, दी पार्क, कमला मिलजवळ
जी-दक्षिण – एलफिन्स्टन सेनापती बापट मार्ग, इंडियाबूल फायनान्स सेंटर
टी विभाग – मुलुंड पश्चिम विकास पलाझू बिल्डींग, पंडित जवाहरलाल आणि मदन मोहन मालविया चौक
जी-दक्षिण – लोअर परळ सेनापती बापट मार्ग, श्रीनिवास कॉटर मिल, वर्ल्ड टॉवर कमला मिलशेजारी

दंडात्मक कारवाई परिमंडळनिहाय

परिमंडळ – एक
८ चारचाकी वाहने

परिमंडळ – दोन
३ चारचाकी वाहने
दंड वसुल २० हजार

परिमंडळ – तीन
१२ चारचाकी
५ दुचाकी
दंड ४० हजार

परिमंडळ – चार
१२ चारचाकी
दंड १० हजार

परिमंडळ – सहा
६ चारचाकी
१ तीन चाकी
३ दुचाकी
दंड १० हजार

परिमंडळ – सात
४ चारचाकी
२ तीन चाकी
दंड १० हजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -