घरक्रीडाजास्त सामने खेळल्याने, जास्त ज्ञान मिळत नाही!

जास्त सामने खेळल्याने, जास्त ज्ञान मिळत नाही!

Subscribe

भारताच्या निवड समितीला मागील काही काळात बर्‍याच टीकेला सामोरे जावे लागले आहे. विश्वचषकात अंबाती रायडू आणि रिषभ पंत यांच्या जागी विजय शंकर आणि दिनेश कार्तिकची निवड, तसेच सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर यष्टीरक्षक पंतला, तर अष्टपैलू शंकरला दुखापत झाल्यानंतर सलामीवीर मयांक अगरवालला संघात स्थान दिल्यामुळे एम.एस.के प्रसाद यांच्या निवड समितीवर बरीच टीका झाली आहे.

त्यातच विश्वचषक जिंकण्यात अपयश आले असतानाही औपचारिक बैठक न घेता विराट कोहलीला कर्णधारपदी कायम ठेवल्याने माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी निवड समितीला खडे बोल सुनावले. निवड समितीतील ५ सदस्यांनी (प्रसाद, देवांग गांधी, शरणदीप सिंग, जतीन परांजपे आणि गगन खोडा) मिळून केवळ १३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असल्याने त्यांचे ज्ञान आणि अनुभव यावरही वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, एखादा खेळाडू जास्त सामने खेळला म्हणून तो जास्त ज्ञानी असतो, हा समज चुकीचा आहे, असे मत प्रसाद यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

निवड समितीतील प्रत्येक सदस्य भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त आम्ही सर्वांनी मिळून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४७७ सामने खेळले आहेत. आम्ही निवड समितीत असताना २०० हून अधिक सामने पाहिले आहेत. मग असे असतानाही आमच्या अनुभवावर आणि ज्ञानावर प्रश्न उपस्थित करणे योग्य आहे का? आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवाबाबत बोलणार असू, तर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एड स्मिथ यांनी केवळ १ कसोटी सामना खेळला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष ट्रेवर हॉन्स यांनी केवळ सात कसोटी सामने खेळले आहेत. १२८ कसोटी आणि २४४ एकदिवसीय सामने खेळलेले मार्क वॉ यांनी हॉन्स यांच्या हाताखाली काम केले आहे.

आता महान ग्रेग चॅपलही हॉन्स यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. इतर देशांमध्ये निवड समिती सदस्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी आणि अनुभव याबाबत चर्चा होत नसेल, तर ते आपल्या देशात का होते? प्रत्येक कामाचे काही निकष असतात आणि तुम्ही ते पूर्ण करत असाल तर चर्चा करायची काही गरज नाही असे मला वाटते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवावरून निवड समिती सदस्यांची नेमणूक होत असेल, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ज्यांनी खूप सामने खेळले आहेत, ते खेळाडू कधीही निवड समितीचे सदस्य होऊ शकणार नाहीत, असे प्रसाद म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -