घरमहाराष्ट्रशिवसेना प्रवेशाच्या बातम्या खोट्या; मी राष्ट्रवादीतच - सुनील तटकरे

शिवसेना प्रवेशाच्या बातम्या खोट्या; मी राष्ट्रवादीतच – सुनील तटकरे

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या करमाळा विधानसभा मतदारसंघातील नेत्या रश्मी बागल यांनी आज आपल्या बंधूसहीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भुजबळ यांनी काल नाशिक येथे बोलताना या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले होते. तर सुनील तटकरे यांनी देखील एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मी राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सांगितले. तटकरे सध्या दिल्लीत आहेत, त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानातून संवाद साधत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याची चर्चा फेटाळून लावली.

सुनील तटकरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असून तशी त्यांची चर्चा उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सुरु असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली होती. त्यानंतर तटकरे यांनी या बातमीचे खंडन केले. तसेच खोट्या बातम्या पसरलवल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याच्या मार्गाची चाचपणी सुरु असल्याचेही तटकरे म्हणाले. खासदार सुनील तटकरे हे शरद पवार आणि अजित पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. १९९९ पासून सत्तेत असताना पक्षाने त्यांना सतत महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद दिले होते. तसेच २०१४ पासून ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना अनंत गिते यांच्याकडून अवघ्या २१०० मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. मात्र २०१९ मध्ये त्यांनी शेकापसोबत युती आणि काँग्रेसला सोबत घेत अनंत गिते यांचा पराभव केला होता.

- Advertisement -

सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वीच कोकणातील राष्ट्रवादीचे अनेक नेते माझ्या संपर्कात असून ते सेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सुनील तटकरे यांचे नाव चर्चेत आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र सुनील तटकरे यांनी स्वतः या विषयावर पडदा टाकला आहे. तटकरे हे स्वतः पक्षांतर करणार नाहीच. उलट पक्षांतर करणाऱ्या इतर नेत्यांना थांबविण्याचे काम पक्षाने त्यांच्याकडे सोपविल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सध्या साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माढ्याचे आमदार बबन शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे युतीमधील पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -