घरक्रीडा७ हजार विकेट घेतल्यानंतर ८५व्या वर्षी 'तो' होतोय निवृत्त!

७ हजार विकेट घेतल्यानंतर ८५व्या वर्षी ‘तो’ होतोय निवृत्त!

Subscribe

तब्बल ७ हजाराहून अधिक विकेट घेतल्यानंतर वेस्ट इंडिजचा हा बॉलर वयाच्या ८५व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीची! आता धोनीचं वय झालं, त्याने निवृत्त व्हायला हवं, असं सांगणारेही बरेच आहे. पण क्रिकेट ज्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो, त्याला वयाचं बंधन उरतच नाही, हे एका वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूने सिद्ध करून दाखवलं आहे. तब्बल ७ हजाराहून जास्त विकेट घेतल्यानंतर वयाच्या ८५व्या वर्षी हा ‘तिरतरूण’ क्रिकेटपटू निवृत्त होत आहे! सेसिल राईट उर्फ सेस असं या अवलियाचं नाव आहे. जोएल गार्नर, गॅरी सोबर्स, वेस हॉल, गारफिल्ड सोबर्स, सर विवियन रिचर्ड्स अशा दिग्गजांसोबत सेस क्रिकेट खेळले आहेत.

फास्ट बॉलर म्हणून सुरू केली कारकीर्द

बार्बाडोसतर्फे जमैकाच्या विरोधात फास्ट बॉलर म्हणून खेळताना सेस यांनी १९५०च्या दशकात क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यानंतर १९६२मध्ये ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आणि सेंट्रल लॅन्सेशायर लिगमध्ये क्रॉम्प्टनकडून खेळू लागले. तेव्हापासून आजतागायत गेली ६० वर्ष सेस क्रिकेट खेळत होते. या कालावधीमध्ये त्यांनी ७ हजारांहून जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या उमेदीच्या काळात तर त्यांचा अॅव्हरेज रेट २७ होता! म्हणजेच, प्रत्येक २७ बॉलमध्ये त्यांनी एक विकेट घेतली होती!

- Advertisement -

हेही वाचा – बुमराहची अव्वल दहामध्ये एंट्री!

सेस यांनाही कारण माहिती नाही!

पण आता सेस यांनी अॅक्टिव्ह क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतका मोठा काळ आपण कसे खेळत राहिलो याचं सेस यांना स्वत:लाच मोठं आश्चर्य वाटतं. ‘मला शांत बसून टीव्ही पाहात राहायला आवडत नाही. अगदीच काही नसेल, तर मी चक्कर मारून येतो किंवा घराच्या बागेत काम करतो. पण इतकी वर्ष क्रिकेट कसा खेळत राहिलो, याचं कारण मला देखील माहिती नाही’, असं सेस म्हणतात.

७ सप्टेंबरला खेळणार आयुष्यातला शेवटचा सामना!

येत्या ७ सप्टेंबरला ते अप्परमिलच्या संघातून पेन्नीन लिग साईड स्प्रिंगहेड संघाविरूद्ध स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतील. आणि या सामन्यानंतर आपण निवृत्त होऊ, अशी घोषणा त्यांनी केली आहे. अर्थात, आजच्या काळातल्या क्रिकेटर्सच्या अतिव्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या दीर्घ काळ क्रिकेट खेळण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला हे जरी वास्तव असलं, तर तब्बल ८५व्या वर्षापर्यंत सलग ६० वर्ष क्रिकेट खेळण्यासाठीचा फिटनेस असणारे सेस अर्थात सेसिल राईट हे सध्यातरी एकमेवाद्वितीय उदाहरण आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -