घरमुंबईतू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा...!

तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा…!

Subscribe

गानकोकिळा लता मंगेशकर यांचा शनिवारी २८ सप्टेंबर रोजी ९० वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. बॉलिवूड कलाकार, राजकीय नेते यांनी दीदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे लतादीदींबरोबरचे अनोखे नाते जगजाहीर आहे. त्यामुळे सचिननेदेखील खास स्टाईलने लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिनने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या.

या व्हिडिओमध्ये त्याने लतादीदींबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मी लहान असताना माझ्या आईच्या कुशीत झोपायचो तेव्हापासून मी तुमची गाणी ऐकत आलो आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू तर तुमचे पहिले गाणे कधी ऐकले हे मला आठवत नाही. असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा मी तुमचे गाणे ऐकले नाही, असेही तो यावेळी म्हणाला. त्याने यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

- Advertisement -

‘तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा’ हे गाणे तुम्ही माझ्यासाठी गायले होते. ते माझ्यासाठी मोठे गिफ्ट होते. जर देवाने मला कोणते मोठे गिफ्ट दिले असेल तर ते लता मंगेशकर यांच्या रूपात दिले आहे, असेही तो या व्हिडिओत सांगत आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून १.२५ मिनिटांचा हा व्हिडीओ शेअर करत लता मंगेशकर यांना टॅग केले आहे. तसेच यावर त्याने लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना केली आहे.

लता मंगेशकर यांच्या हस्ते २००६ मध्ये झालेला सत्कारही सचिन अजून विसरलेला नाही. २००६ साली मराठी क्रीडा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सचिनला लतादीदींच्या हस्ते ३६ तोळ्यांची सोन्याची बॅट देऊन गौरवण्यात आले होते. या कार्यक्रमाला सचिनच्या आईसह त्याचे सारे कुटुंब हजर होते. सुनील गावस्करचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम मोडल्याबद्दल सचिनचा हा सत्कार होता. यावेळी दीदींचा नाजूक सूर आईच्या मायेने ओथंबला होता. ‘मी सचिनची नजर काढायला आले आहे. तो असाच तुफानी खेळत राहू दे’, अशी भरभरून शुभेच्छा त्यांनी दिल्या.

- Advertisement -

‘लता ९०’ पुस्तकाचे प्रकाशन
लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी ‘लता ९०’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे जीवनगाणीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात लतादीदींची मराठी आणि हिंदी निवडक गाणी सादर करण्यात आली. तसेच संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींच्या गाण्यांचे खास रसग्रहण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -