घरमहाराष्ट्रशिवसैनिकच मुख्यमंत्री होणार

शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार

Subscribe

शिवसेना-भाजपच्या युतीची बोलणी सुरू असतानाच शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सत्ता मिळवण्याचा एल्गार केला. मला यावेळी विधानसभेत सत्ता हवी आहे. एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवल्याशिवाय राहणार नाही, असे मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलेले आहे. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावरून शिवसेना पक्षप्रमुखांना सत्तेची आस लागलेली असल्याचे स्पष्ट होत आहे. या सत्तेच्या आकांक्षेपोटी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असेही जाहीर करून टाकले.

विधानसभा निवडणुकीकरिता शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांचा मेळावा व मार्गदर्शन शिबीर वांद्य्रातील रंगशारदा सभागृहात शनिवारी पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना उध्दव ठाकरे यांनी, रंगशारदामध्ये भेटल्याशिवाय निवडणूक असल्यासारखे वाटत नाही.

- Advertisement -

असे स्पष्ट करत पूर्वजांची पुण्याई माझ्या मागे आहे म्हणून माझ्यासोबत एवढ्या लोकांचे प्रेम आहे, असे सांगितले. राजकीय भाषणांपेक्षा मी तुमच्याशी कौटुंबिक भाषण करणार आहे. कारण तुम्ही माझे कुटुंब आहात. शिवसेनाप्रमुखांनी माझ्याकडे तुमच्यासारखे सोबती दिले आहेत, असे जगाच्या पाठीवर कुठेही नाहीत, असे सांगत शिवसैनिकांप्रती गौरवोद्गारही त्यांनी काढले. माझा तर पक्षच पितृपक्ष आहे. पूर्वजांची आशीर्वाद असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतो का, असाही सवाल त्यांनी केला.

शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टासमोर जाऊन उभे राहिले आणि त्यांनी न्यायमूर्तींना विचारले होते की, ‘सांगा माझा गुन्हा काय ?’ १९९२-९३ साली झालेल्या दंगलीमध्ये हिंदूंचे रक्षण करणे हा गुन्हा आहे का, असा सवाल करत उध्दव ठाकरे यांनी तुमच्यासारख्या मर्दांनी हिंदूंचे रक्षण केले. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढत राहण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. गेली पाच वर्षे संघर्षाची होती. त्यामध्ये तुम्ही माझ्या नेहमी सोबत राहिलात. यासाठीसुद्धा आभार मानण्यासाठी मी तुम्हाला बोलवले आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

शिवसेनेची स्थापना ही कोणताही मुहूर्त किंवा काळ वेळ बघून झाली नाही असे सांगतानाच त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवार निवड हा माझ्यासाठी फार कठीण काळ असतो, असे स्पष्ट केले. मी म्हणजे भगवा. मी म्हणजे शिवसेना. हा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकला पाहिजे यासाठी प्रयत्न करा, असेही आवाहन त्यांनी या मार्गदर्शन शिबिरामध्ये शेवटी केले. याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव अनिल देसाई यांची भाषणे झाली. यावेळी त्यांनी उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज भरावेत तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले.

अजित पवारांनाही चिमटे
मला कोणाबद्दल वाईट बोलण्यात अजिबात आनंद वाटत नाहीत. जो आपल्या कर्माने मरणार आहे, त्यांना धर्माने मारू नका. कोणी जर सूड उगवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र त्याच्यावर आसूड उगवल्याशिवाय राहणार नाही, असाही चिमटा त्यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना मारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -