घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात बाळासाहेब सानपांना तिकीट नाकारणे युतीला जड जाणार?

नाशकात बाळासाहेब सानपांना तिकीट नाकारणे युतीला जड जाणार?

Subscribe

पाच मतसंघांवर इम्पॅक्ट होण्याचीच अघिक शक्यता : भाजप पेचात

भारतीय जनता पक्षाने आपल्या तिसर्‍या यादीतही नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवार जाहीर न केल्याने या जागेविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी न दिल्यास वंजारी समाजातील मतांचा मोठा फटका युतीला बसण्याची शक्यता आहे. विशेषत: नाशिक पूर्वसह सिन्नर, निफाड, येवला आणि नांदगाव या पाच मतदार संघावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

जातीय राजकारणाला केंद्रीभूत ठेऊन निवडणुका लढवल्या जाऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरीही, प्रत्यक्षात जातीय समीकरणेच निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करत असल्याचा काही वर्षांपासुनचा अनुभव आहे. निवडणुकीच्या काळात विशेषत: मराठा, वंजारी, माळी, दलित आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य किती आहे यावरुन पुढील रणनीती ठरविली जाते. विशेषत: गेल्या काही निवडणुकांपासून मराठा आणि वंजारी समाजातील मते निर्णायक ठरत असल्याचे बोलले जाते. नाशिक जिल्ह्यात भाजपच्या चार आमदारांपैकी दोन आमदार मराठा समाजाचे असून, वंजारी आणि माळी समाजाचा प्रत्येकी एक आमदार आहे. तर, शिवसेनेच्या चारपैकी तीन मराठा समाजातील तर एक आमदार चर्मकार समाजातील आहे. त्यामुळे उमेदवारी देतानाही हाच जातीय समतोल राखण्याची जबाबदारी युतीच्या पदाधिकार्‍यांवर येऊन ठेपली आहे.

- Advertisement -

प्रत्यक्षात नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय पक्षाने तिसर्‍या यादीनंतरही राखून ठेवला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचा पत्ता कट होण्याची चर्चा आहे. त्यांच्या जागेवर अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असा फेरबदल झाल्यास त्याचा परिणाम नाशिकमध्ये वंजारी समाजाचे प्राबल्य असलेल्या पूर्व नाशिकसह सिन्नर, निफाड, येवला आणि नांदगाव मतदार संघावर होऊ शकतो. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना जर वंजारी समाजात पसरली तर युतीच्या उमेदवारांना या मतदारसंघात मोठा फटका बसू शकतो. याशिवाय अन्य मतदारसंघातील ओबीसी मतेही गमविले जाण्याची भीती पक्षातीलच काही ज्येष्ठ नेते वर्तवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -