घरमहाराष्ट्रभाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली

भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली

Subscribe

भाजपने जागावाटपात मित्र पक्षांना त्यांची जागा दाखवली, असा आरोप करतानाच भाजपने मला फसवले, माझ्या पक्षालाही धोका दिला, असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, हे उद्धव ठाकरे यांचे विधान तंतोतंत खरे आहे, असेही ते म्हणाले.

महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला १२४ तर भाजपला १५० जागा मिळाल्या आहेत. तर मित्रपक्षांना अवघ्या १४ जागा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपने या जागा आपल्या कोट्यातून दिल्याने मित्रपक्षांना भाजपच्याच चिन्हावर लढण्याची सक्ती केली आहे. जिंतूर आणि दौंड या जागांवर भाजपने परस्पर रासपच्या राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांना एबी फॉर्म दिले होते. या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जानकर यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजप आणि आमच्यात जागावाटपाची बोलणी झाली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. पण, भाजपने रासपला सरळसरळ फसवले आहे. माझ्या पक्षाला धोका दिला. शिवसेनाही जात्यात आहे, मी पण भरडला जातोय, अशी खंत जानकरांनी व्यक्त केली.

केवळ गंगाखेडमधून रासपचे रत्नाकर गुट्टे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे याठिकाणी शिवसेना-भाजपकडे उमेदवार मागे घेण्याची विनंती करू. तसेच अन्याय झाला असला तरी उपेक्षित समाजाच्या भल्यासाठी रासप महायुतीबरोबर राहणार असल्याचे जानकरांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -