घरमहाराष्ट्रVideo: कोल्हापूरकर तरुणीचं चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरी स्टाईल झणझणीत उत्तर!

Video: कोल्हापूरकर तरुणीचं चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरी स्टाईल झणझणीत उत्तर!

Subscribe

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांविषयी केलेल्या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया कोल्हापूरमध्ये उमटू लागल्या असून त्यांना सडेतोड उत्तर देणारा कोल्हापूरमधील युवती काँग्रेसच्या पदाधिकारी तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

‘सगळं जग सुधारेल, पण कोल्हापूरकर जनता सुधारणार नाही. प्रवाहाच्या विरोधात मतदान करतील’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच केलं होतं. पण ते वक्तव्य कोल्हापूरकर जनतेला मात्र चांगलंच जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे कोल्हापूरमधून त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याचंच एक उदाहरण म्हणून एका कोल्हापूरकर तरुणीचा सेल्फी व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. कल्याणी माणगावे असं या तरुणीचं नाव असून त्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. या व्हिडिओमध्ये कल्याणी कोल्हापूरचे पालकमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनाच खुलं अव्हान देत आहेत.

चंद्रकांत पाटलांना खुलं आव्हान!

‘कोल्हापूरसाठी चंद्रकांत पाटील यांनी गेल्या ५ वर्षांत खरंच काही केलं असेल, तर त्यांना माझं चॅलेंज आहे, की त्यांनी पुढे यावं आणि सांगावं. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरच्या जनतेचा जो अपमान केला आहे, तो कोल्हापूरची जनता कधीही विसरणार नाही. आत्ता आम्ही भाजपमुक्त कोल्हापूर केला आहे. पुढे जनता त्यांचा राज्यातून कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. हा सत्तेचा तुम्हाला आलेला माज आहे’, असं कल्याणी व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. शिवाय, ‘चंद्रकांत पाटलांनी विचार करून बोलावं. कोल्हापूर ही भाजप-शिवसेनेची मक्तेदारी नाही. हे शाहू महाराजांचं कोल्हापूर आहे. शाहू महाराजांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाजाच्या कल्याणासाठी जे करता आलं, ते केलं. शाहू महाराजांचे विचार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी जे करता येईल, ते आम्ही करतो’, असं देखील कल्याणी व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना सत्तेसाठी भाजपशिवाय इतर पर्यायांच्या तयारीत?

महापुरात चंद्रकांत पाटील कुठे होते?

कोल्हापुरात महापुराचं पाणी घुसलं, तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे होते? असा सवाल या तरुणीने केला आहे. ‘कोल्हापुरात महापूर आला, तेव्हा पाटील कुठे होते? पहिले ५ दिवस चंद्रकांत पाटील महाजनादेश यात्रेत होते. गायब होते. पुराच्या वेळी तुम्ही विमानातून फिरता आणि मतं मागायला जमिनीवर येता. त्यामुळे तुम्हाला कोल्हापूरकरांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही’, असं कल्याणी यांनी व्हिडिओमध्ये सुनावलं आहे. ‘पूरग्रस्तांना जी मदत मिळायला हवी होती, ती अजूनही ६० ते ७० टक्के लोकांना मिळालेली नाही. शिरोळ तालुक्याला सर्वात जास्त फटका बसला होता. तिथल्या शेतकऱ्याने पाण्यामुळे शेती-घर वाहून गेल्यामुळे आत्महत्या केली. ही वेळ त्याच्यावर तुमच्यामुळे आली. कारण तुम्ही त्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई देऊ शकला नाहीत’, असं देखील कल्याणी म्हणत आहेत.

कोल्हापूरकरांविषयीच्या वक्तव्यावर तरुणी भडकली | Young Woman Angry With Chandrakant Patil

कोल्हापूरकरांविषयीच्या वक्तव्यावर तरुणी भडकली | Young Woman Angry With Chandrakant Patil

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 28, 2019

- Advertisement -

…म्हणून कोल्हापूरकरांनी भाजपला नाकारलं

दरम्यान, कोल्हापूरकरांनी भाजपला का नाकारलं, याचं कारणच कल्याणी यांनी व्हिडिओतून स्पष्ट केलं आहे. ‘कोल्हापूर दक्षिणमध्ये पक्षबदलू लोकांना पक्षात घेऊन त्यांना निवडून आणायचं हा प्रकार आता बंद करा. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. तुम्ही कितीही पैसे दिले, तरी आम्ही तुमच्या धनशक्तीला भीक न घालता मतदान करणारे आहोत. इचलकरंजीतही भाजपचे आमदार पडले. कारण तिथले हातमाग आणि वस्त्रोद्योगाचा व्यवसाय गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून ठप्प झाला होता. कामगारांना पगार द्यायला व्यापाऱ्यांकडे पैसे नव्हते. लोकांना काम नव्हतं. म्हणून तिथला जनादेश तुमच्या विरोधात गेला. जनता जेव्हा उपाशी असते, तेव्हा ती कुणाचीही गय करत नाही हे लक्षात ठेवा’, असं कल्याणी यांनी ठणकावलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -