घरमुंबईमुंबईची हवा शुद्ध करणाऱ्या कृती आराखड्याला केंद्राची मंजुरी!

मुंबईची हवा शुद्ध करणाऱ्या कृती आराखड्याला केंद्राची मंजुरी!

Subscribe

मुंबईच्या आराखड्यासाठी आयआयटी मुंबई आणि निरीच्या माध्यमातून अभ्यास केला असून, २०२२ पर्यंत प्रदूषण २५ टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

दिल्लीप्रमाणेच मुंबईमध्येसुद्धा प्रदुषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुंबईत हवेचे वाढते प्रदूषण ही एक गंभीर समस्या झाली असून त्याचाच परिणाम आता हळूहळू जाणवू लागला आहे. त्यामुळे मुंबईतील हवेच्या प्रदुषणाला नियंत्रित करण्यासाठीच्या कृती आराखड्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. दरम्यान मुंबईच्या आराखड्यासाठी आयआयटी मुंबई आणि निरीच्या माध्यमातून अभ्यास केला असून, २०२२ पर्यंत प्रदूषण २५ टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुंबईच्या आराखड्यात तीन वेळा सुधारणा

२०१८ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने राज्यातील १७ प्रदूषित शहरांसाठी कृती आराखडा सादर करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानंतर चार महिने उशीराने यावर्षी एप्रिलमध्ये हा आराखडा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर करण्यात आला. त्यापैकी मुंबई, नाशिक आणि सोलापूर या तीन शहरांच्या आराखड्यावर केंद्रीय मंडळाने आक्षेप नोंदवून सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या. मुंबईच्या आराखड्यात तीन वेळा सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंडळ आणि केंद्र सरकारने त्यास मंजुरी दिल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सह-संचालक डॉ. व्ही. एन. मोटघरे यांनी सांगितले.

- Advertisement -

असा आहे आराखडा

मंजुरी मिळालेल्या सुधारीत आराखड्यात हवेतील धूलिकणांचे वाढते प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागास रस्ते स्वच्छ करण्याच्या यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. स्मशानभूमीत मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी विद्युत दाहिन्यादेखील वाढवण्यात येतील. तसेच सिग्नलच्या सुसूत्रीकरणावर भर दिला जाईल. या सर्वासाठी केंद्राकडून मंजूर केलेल्या १० कोटी रुपयांच्या निधीपैकी सहा कोटी रुपये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाले आहेत. आराखड्याशी निगडित प्रत्येक घटक संस्थाशी यापूर्वी विचारविनिमय केला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मोटघरे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -