घरमहाराष्ट्रबनावट धाडीत सुका मेवा ढापला

बनावट धाडीत सुका मेवा ढापला

Subscribe

अधिकार्‍यासह चौघांना अटक

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) निरीक्षक असल्याचे भासवून कारवाईची भीती दाखवत मिठाईच्या दुकानातून प्रथम 5 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर पैसे न मिळाल्याने सुका मेवा घेऊन जाणार्‍या चौकडीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. यात अलिबाग तालुक्याच्या वैद्यकीय अधिकार्‍याचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

कामोठे सेक्टर २१ येथील बालाजी स्वीट दुकानात रविवारी दुपारी 4 जणांनी एफडीएचे अधिकारी असल्याचे भासवून प्रवेश केला. तुमच्या दुकानातील साहित्य उघड्यावर आहे, खाद्यपदार्थांची काळजी घेण्यात आलेली नाही, असे सांगत दुकानाचा परवाना जप्त करण्याची धमकी दिली. दुकानमालक गणेश चौधरी यांच्याकडे त्यांनी 5 हजार रुपये मागितले. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर दुकानातील सुक्या मेव्याच्या पाकिटांची मागणी केली. ती पाकिटे घेऊन चौघेही मोटारीत बसत असतानाच चौधरी यांना संबंधित अधिकारी बोगस असल्याची माहिती दूरध्वनीवरून मिळाली. त्यांनी तातडीने चौघांना अडवले आणि पोलिसांना कळवले. पोलीस हजर झाल्यानंतर ही धाड बनावट असल्याचे समोर आले.

- Advertisement -

या बनावट धाडीत अलिबाग तालुकाचे आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश प्रमोद घालवाडकर (४६) आणि अलिबाग-पेढांबे येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साहेबराव देठे (२६) सामील होते. या दोघांनी पेण येथील सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक भगवान म्हात्रे (६१) आणि अलिबाग तालुक्यातील पिंपळघाट येथे राहणारा बेरोजगार तरुण राजकुमार बिराजदार यांच्या मदतीने पैशाच्या हव्यासापोटी ही बनावट धाड टाकल्याचे समोर आले. चौकशीअंती चौघांनी फसवणूक, पदाचा गैरवापर आदीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कामोठ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी दिली.

या बनावट धाडीत सहभागी झालेेले डॉ. शैलेश घालवाडकर आणि डॉ. संंदीप देठे यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -