घरमुंबईमुख्यमत्री शिवसेनेचाच

मुख्यमत्री शिवसेनेचाच

Subscribe

आमच्यासाठी सर्व पर्याय खुले; उद्धव ठाकरे यांचा दावा, खोटारड्यांशी चर्चा नाही

भाजप आमदारांचे १०५ संख्याबळ आहे,आमच्याशी सत्तेस्थापनेविषयी चर्चा झालेली नाही, तरीही काळजीवाहू मुख्यमंत्री हे बहुमताचा दावा करत ‘भाजपचेच सरकार येईल’, असा दावा करत असतील, तर त्यांना त्याकरता जे पर्याय निवडण्याची मोकळीक आहे, तसे शिवसेनेला सर्व पर्याय खुले आहेत असे सांगत अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरलेच नव्हते, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खोटारडेपणाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चिरफाड करत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे म्हटले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. ठाकरे घराण्यावर पहिल्यांदाच कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या वक्तव्याचा आधार घेऊन आम्हाला खोटे ठरवले आहे. शहा आणि कंपनीने कितीही खोटेपणाचा आरोप केला तरी खोटे कोण आणि खरे कोण हे सर्वांना माहीत आहे. शहा आणि कंपनीच खोटारडी असून अशा लोकांसोबत आम्हाला चर्चा करायची नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. त्याचे खंडन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तात्काळ शिवसेनाभवन येथे पत्रकार परिषद घेऊन केले. आज माझ्यावर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणी तरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. अवघा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख, त्यांचा मुलगा आणि शिवसैनिक यांना जाणतो. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी जे अमित शहांचा संदर्भ घेऊन मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे दु:ख झाले. महाराष्ट्राची जनता खरे कोण, खोटे कोण हे पुरेपूर जाणून आहे. लोकसभेच्या वेळी अमित शहांसोबत चर्चेत मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली होती, मात्र मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, ‘एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार आहे, तसे मीे शिवसेनाप्रमुखांना वचन दिले आहे. त्यासाठी मी लाचार बनणार नाही, मला कुणाच्याही मदतीची गरज नाही’, असे सांगून मी बाहेर पडलो. दुसर्‍या दिवशी अमित शहा यांनी स्वत:हून फोन करून पुन्हा मु्ख्यमंत्री पदाविषयी विचारणा केली, तसेच अडीच अडीच वर्षांचा प्रस्ताव मांडला. अडीच वर्षांवेळी शिवसेनेने सहकार्य करावे आणि उर्वरित अडीच वर्षांसाठी भाजप सहकार्य करेल, असे अमित शहा म्हणाले. त्याला मी संमती दिली.

- Advertisement -

त्यानंतर अमित शहा मातोश्रीमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत आले आणि ‘माझ्यामुळे आपल्यातील संबंध दुरावले आणि आता ते संबंध सुधारण्याची मला संधी मिळाली आहे’, असे म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘तुम्ही आधी मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांच्यासोबत जे ठरले आहे, ते समजून घेऊन तसे माध्यमांना स्पष्ट करा’, असे सांगितले, मात्र त्यांनी माझ्यासोबत पत्रकार परिषदेत बसून माझ्याकरवी ते बोलून घेतले. त्यावेळी मी ‘पद आणि जबाबदारी यांच्यात समसमान वाटप’ असा शब्दप्रयोग केला. मग यात ‘मुख्यमंत्रीपद’ यात येत नाही का? माझे वडील, आजोबा यांनी कधीही खोट्याचा आधार घेतला नाही. ठाकरे घराण्याची ही संस्कृती नाही. तेव्हा काळजीवाहूंनी तसा प्रयत्न करू नये. मला खोटे ठरवल्यावर मी ते सहन करणार नाही. खोटारडेपणाचा शिक्का लावून मी शिवसैनिकांसमोर जाणार नाही. खोटे बोलणे हे कोणत्या हिंदुत्वात बसते, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरवावे. राम हा एकवचनी होता, तेव्हा हे कोणत्या तोंडाने रामाची पूजा करणार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की, २०१४ मध्ये त्यांनी एकाकी लढा देऊन भाजपचा अश्वमेध अडवला होता. २०१९ मध्ये त्यांनी गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी वेळीही आम्ही त्यांना मात दिली आहे. भाजपने गुजरात, मणिपूर, काश्मीर, मध्य प्रदेश, गोवा या ठिकाणी जे पर्याय निवडून सत्ता स्थापन केली, मग आम्हालाही तसे पर्याय निवडता येतात. त्यामुळे आम्ही कुणाशी बोलतो, यावर पाळत ठेवू नका. आम्ही उघड उघड बोलत असतो. मी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क केलेला नाही. मात्र जर भाजप १०५ जागा असताना तसेच आमच्याशी चर्चा न करता सत्ता स्थापनेचा दावा करत असेल, तर त्यांना जशी त्यांचे पर्याय निवडण्याची मोकळीक आहे, तशी शिवसेनेला आहे, मी चर्चेचे दरवाजे कधीच बंद केले नाहीत, मात्र मला ज्या क्षणी खोटे ठरवले तेव्हापासून मी चर्चा बंद केली, मात्र आता त्यांनी ईश्वरसाक्षीने खोटे न बोलण्याची शपथ घ्यावी, पुन्हा चर्चा करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आम्ही कधीच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली नाही. नरेंद्र मोदी यांनी मला छोटा भाऊ मानले आहे. आमच्या या नात्यामध्ये कोण काडी घालत आहे, हे नरेंद्र मोदी यांनी त्याचा शोध घ्यावा, असे सांगत हरयाणात सत्तास्थापन करण्यासाठी भाजपने ज्या दुष्यंत चौटाला यांची मदत घेतली, त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या खालच्या पातळीवर टीका केली त्याची व्हिडीओ उद्धव ठाकरे यांनी यावेळी दाखवला.

भाजपकडे सर्वाधिक जागा आहेत, त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करावा अन्यथा इतरांना संधी द्यावी. सर्वांना सर्व पर्याय खुले आहे. राज्याच्या जनतेला आम्ही वार्‍यावर सोडू शकत नाही. राज्यात सध्या ओला दुष्काळ आहे. दोन्ही हंगाम वाया केले आहेत. राज्यातील शेतकर्‍याला पीक विम्याचे पैसे मिळत नाही, दुष्काळी अनुदानाचे पैसे पोहोचले नाही, शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्तास्थापनेची वाट न पाहता गावागावात शेतकर्‍यांसाठी मदत केंद्रे सुरू केली आहेत, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना मागील ५ वर्षांतील कामांचा आढावा घेतला. मात्र जर शिवसेना त्यांच्यासोबत राहिली नसती, तर त्यांना ही आचाट कामे करता आली असती का? शिवसेनेने विकासाच्या कामात कधीही राजकारण येऊ दिले नाही. आम्ही जो शब्द देतो तो पाळतो, एकदा शब्द दिला कि तो परत घेत नाही. तशी शिवसेनाप्रमुखांची मला शिकवणच आहे. आम्ही सत्तेत होतो, तरीही विरोधात बोललो कारण, ती जनतेची बाजू होती. सरकारमध्ये राहून आम्ही जनतेला न्याय मिळवून देत होतो.

दिवसभराचा घटनाक्रम

•सकाळी ९.३० वा : नेहमीप्रमाणे संजय राऊत यांची १५वी पत्रकार परिषद
•सकाळी ११. ३० वा. : विजय वडेट्टीवार यांचा घोडेबाजाराचा आरोप
•दुपारी २.०० वा. : उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये जिल्हाप्रमुखांना केले मार्गदर्शन, मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम
•संध्याकाळी ४.०० वा. : फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, आता काळजीवाहू मुख्यमंत्री
•संध्याकाळी ४.१५ वा. : संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी घेतली शरद पवारांची भेट, तपशील मात्र गुलदस्त्यात
•संध्याकाळी ४.३० वा. : मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर पत्रकार परिषद
•संध्याकाळी ६.०० वा. : अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद ठरले नव्हते-गडकरी
•संध्याकाळी ६.३० वा. : उद्धव यांची शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद
•संध्याकाळी ७.३० वा. : शिवसेनेचे आमदार मालाडच्या द रिट्रिट हॉटेलवर
•संध्याकाळी ८.०० वा. : बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली पवारांची भेट, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -