घरक्रीडाटी-२० संघात धवन नकोच!

टी-२० संघात धवन नकोच!

Subscribe

भारताचा सलामीवीर शिखर धवनला मागील काही टी-२० सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. खासकरून डावाच्या सुरुवातीला त्याला वेगाने धावा करता आलेल्या नाहीत. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक होणार असून या स्पर्धेसाठी अनुभवी धवनचे भारतीय संघातील स्थान निश्चित मानले जात नाही. अंगठ्याच्या दुखापतीमुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे आणि त्याच्या जागी लोकेश राहुलला सलामीला येण्याची संधी मिळणार आहे. भारताचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांच्याही मते भारताने आता टी-२० क्रिकेटमध्ये धवनला वगळून राहुलसारख्या खेळाडूला जास्तीतजास्त संधी दिली पाहिजे.

टी-२० क्रिकेटमध्ये डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत खेळत वेगाने धावा करणार्‍या फलंदाजाची संघाला गरज असते. भारताला सध्या अशा फलंदाजाची उणीव भासत आहे. भारताने आता धवनला टी-२० संघात न घेता लोकेश राहुलसारख्या खेळाडूला सलामीला खेळण्याची जास्तीतजास्त संधी दिली पाहिजे. विराट कोहलीसारख्या खेळाडूंमुळे भारताची फलंदाजी मजबूत आहे, पण एखाद्या मोठ्या सामन्यात हे खेळाडू लवकर बाद झाल्यास भारतीय संघ अडचणीत सापडतो हे आपण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाहिले आहे, असे श्रीकांत म्हणाले.

- Advertisement -

भारताचा संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकांमध्ये विंडीजचा संघ कोहलीच्या भारताला झुंज देईल असे श्रीकांत यांना वाटते. टी-२० विश्वचषकाला आता दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून विंडीजविरुद्धची मालिका भारतासाठी फायदेशीर ठरेल. क्रिकेटच्या या प्रकारात कोणताही संघ कोणत्याही संघाचा पराभव करू शकतो. नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेच्या सामन्यात बांगलादेशने भारतावर मात केली होती. विंडीजचा संघही या मालिकेत भारताला चांगली झुंज देईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -