घरफिचर्सअंधश्रद्धा निर्मूलनाच्या वाटेवरचा सच्चा साथी!

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वाटेवरचा सच्चा साथी!

Subscribe

गेल्या ३०-३५ वर्षांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामांमध्ये डॉ. श्रीराम लागू यांनी काही महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. डॉ. लागू, निळू फुले त्यांच्या येण्याने लोक कार्यक्रमाला गर्दी करू लागले. या गर्दीला अंनिसचे कार्यकर्ते प्रबोधित करतील, अशी एक नम्र भूमिका ते मांडायचे. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये लागू, निळूभाऊ अंनिससोबत फिरले. या दौर्‍यांमध्ये आयोजक, संयोजक म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा सहभाग होता. त्यामुळे लागूंसोबत अनेक दौर्‍यांमध्ये एकत्र राहण्याची संधी अविनाश पाटील यांना मिळाली. निवासाच्या ठिकाणी थांबायची संधी मिळाली. डॉ. लागूंबाबत पाटील सांगतात, ‘या सहवासातून त्यांच्यातील एक परफेक्शनिस्ट व्यक्तिमत्त्व पाहायला मिळालं. मग ते कलावंत, अभिनेता, साहित्यिक, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता, संवेदनशील जबाबदार नागरिक ते अगदी माणूस म्हणून देखील असेल. परफेक्शन आपल्यात असले पाहिजे याच्याबाबत ते फार दक्ष असायचे. त्याच्यासाठी ते सतत स्वत:ला तपासत राहायचे’. डॉ.लागू आज हे जग सोडून गेले असले तरी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील त्यांचे योगदान चिरकाल टिकून राहणार आहे.

ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार दिवंगत डॉ. श्रीराम लागू हे त्यांच्या क्षेत्रातील जाणकार, दिग्गज आहेत याची कल्पना सर्वांनाच आहे. डॉ. लागू यांनी महाविद्यालयीन काळातच नाट्य क्षेत्रात प्रवेश केला होता. नंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय बंद करून पूर्णवेळ नाट्य क्षेत्राला देण्याचे ठरवले. याच दरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामदेखील केले. १९८० ते ९० च्या दशकात त्यांचा सामाजिक क्षेत्राशी संबंध आला. त्यावेळी डॉ. बाबा आढाव हे वर्षातून एकदा विषमता निर्मूलन परिषदेचे आयोजन करत असत. या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या कामातले अनुभव, त्यांच्या कामातील अडथळे, त्यांच्यासमोर असलेली आव्हानं या सर्व बाबींवर परस्परांशी संवाद करणे, एकमेकांना कामाचा अनुभव सांगणे आणि त्यातून एकमेकांना कशा प्रकारे उभारी देता येईल, यावर विचार करून त्यामधून मार्ग काढणे, हा त्यामागचा विचार होता.

साधारण देशातील आणीबाणीनंतरचा हा काळ होता. सलग १० ते १२ वर्षे विषमता निर्मूलन परिषदेचे काम सुरू राहिले. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खांदेश, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण या राज्यातील विविध भागांतून कार्यकर्ते येऊ लागले. त्यातून एक व्यापक जनसंपर्क तयार झाला. हळूहळू लक्षात येऊ लागलं की कार्यकर्त्यांच्या कामात आर्थिक अडचणीची बाब महत्त्वाची आहे. हा प्रश्न गंभीर होता. दोन अंगाने या प्रश्नाबाबत चर्चा झाली. एक तर हे कार्यकर्ते समाज बदलाच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलत असून त्यांच्या योगदानातूनच अनेक सामाजिक समस्या सोडवण्याची रुजवात होत आहे. तसेच सरकार आणि इतर समाजातील महत्त्वाचे, प्रभावी धोरण ठरवणारे घटक यांच्यावरही दबाव येत असून यातून नवपरिवर्तन होत आहे. म्हणजेच अंधश्रद्धेविरोधात धोरणं, कायदे, कल्याणकारी योजना तयार होत आहेत. अशा कार्यकर्त्यांकडे बघण्याचा समाजाचा संकुचित दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांच्यामागे समाजातील काही प्रतिष्ठित लोकांनी, मान्यवरांनी उभं राहणं गरजेचं होतं. तर दुसरी भूमिका म्हणजे कार्यकर्त्यांच्या कामाची समाजाने आपापल्या पद्धतीने उतराई करणे. या दोन भूमिकेतून सामाजिक कृतज्ञता निधीच्या उपक्रमाला सुरुवात झाली आणि त्यातून प्रामुख्याने डॉ. लागू हे अंनिसशी जोडले गेले.

- Advertisement -

डॉ. लागू यांच्या जवळचे स्नेही आणि वर्गमित्र डॉ. राम आपटे हे जळगावला वैद्यकीय व्यवसाय करत असत. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने डॉ. लागू यांचे वर्षातून एकदातरी त्यांच्याकडे जाणं-येणं होत असे. जळगावातही अंनिससाठी काम करणारे कार्यकर्ते होते. त्यांचा संबंध डॉ. राम आपटे यांच्याशी होता. त्या ठिकाणी डॉ. आपटे यांनी कार्यकर्त्यांसाठी काही तरी करायला हवे ही कल्पना डॉ. लागूंसमोर मांडली. विषमता निर्मूलन समितीच्या माध्यमातून बाबा आढाव यांनी सामाजिक कृतज्ञता निधी उपक्रमाची सुरुवात केली. त्यांचा डॉ. लागू यांच्याशी संपर्क होताच, शिवाय इतरही काही मान्यवरांनी यात जोडले गेले पाहिजे असा विचार समोर आला. त्यातून कला क्षेत्रातील डॉ. लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, साहित्यिक ना. धो. महानोर असे अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनाही बाबा आढाव यांनी त्यात सामावून घेतले. यासाठी तयार झालेल्या विश्वस्त मंडळात डॉ. लागू हे अध्यक्ष, बाबा आढाव हे कार्याध्यक्ष, तर डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कार्यवाह होते. या उपक्रमाला १९८६-८७ साली सुरुवात झाली. त्यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करायचे ठरवले.

मात्र त्यासाठी पैसा कुठून आणायचा म्हणून व्यक्तिगत पातळीवरच्या देणग्या जमा करणे आणि दुसर्‍या बाजूला व्यापक पातळीवरचा निधी आणून त्याचा एक कोष तयार करणे, असे ठरवले गेले. साधारण दोन टप्प्यांमध्ये एक कोटी रुपयांचा निधी गोळा करायचे निश्चित केले गेले. त्याकरता ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग राज्यभर करण्याचे ठरले. डॉ. लागू आणि निळूभाऊंसारखे त्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेते हे नाटक करणार होते. समन्वय, संवाद, आखणी, नियोजन करण्याचे काम या कलाकारांनी हाती घेतलं. नाटक बसवलं आणि नंतर त्याचे प्रयोगही झाले. डॉ. लागू आणि निळूभाऊंसारखे कलाकार नाटकात असल्यामुळे अनेक मान्यवर, दिग्गज मंडळी यासोबत जोडले गेले. तनुजा, रिमा लागू, सदाशिव अमरापूरकर, अशोक सराफ असे अनेक दिग्गज अभिनेते नाटकाच्या प्रयोगामध्ये सहभागी झाले. या नाटकाचे ५० हून अधिक प्रयोग राज्यातील विविध भागांमध्ये झाले. त्यातून साधारण ५०-५५ लाख रुपये जमा झाले. मात्र हा निधी अपुरा पडतोय की काय म्हणून अजून काही वेगळे प्रयत्न करायचे ठरले. पुढील दहा वर्षे २ ते ३ टप्प्यांत यासाठी प्रयत्न करण्यात आले. १९८८ पासून ते १९९५-९७ पर्यंत डॉ. लागू आणि निळूभाऊंनी मराठीतील एक नाटक हिंदी, इंग्रजीत बसवून त्याचे देशासह परदेशातही काही प्रयोग केले. तसेच लागू आणि फुले दरवर्षी त्यांच्या कमाईतील पैसे निधीमध्ये देणगी म्हणून देतच होते. शिवाय व्यक्तिगत पातळीवरही काही कार्यकर्त्यांना त्यांनी अनेकदा मदत केली आहे. अशा पद्धतीचा लागूंचा तो प्रवास, संवाद सुरू झाला.

- Advertisement -

१९९१ च्या दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचे पितामह अशी ओळख असलेले डॉ. अब्राहम कोवूर यांच्या एका पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्यात आले. त्या पुस्तकाला डॉ. लागू यांनी प्रस्तावना लिहिली होती. ती प्रस्तावना लेख स्वरुपात दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये देण्याचे ठरवले. मात्र त्याला टोकदार असे शीर्षक देण्यासाठीचा विचार सुरू झाला. यावेळी ‘परमेश्वराला रिटायर करा’ हे शीर्षक तेथील पत्रकारांनी सुचवलं. लेखाचा साधारण आशय तसाच असल्यामुळे लागूंनीही ते मान्य केलं. अखेर तो लेख ‘परमेश्वराला रिटायर करा’, या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आणि एकच गदारोळ माजला. या विचाराला विरोध करणार्‍या तसेच समर्थन करणार्‍या अशा दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. तेव्हापासून ते डॉ. लागू हयात असेपर्यंत हा माणूस परमेश्वराला रिटायर करायची मागणी करतोय, अशी डॉ. लागूंची दुसरी ओळख समाजामध्ये रुढ झाली. अंनिसच्या कामातही ते जेव्हा जेव्हा आले, राहिले, त्यावेळी त्यांनी याचा पुनरुच्चार केला आहे. अगदी अंनिसच्या २०१४-१५ च्या पुण्यातील रौप्य वर्षपूर्ती कार्यक्रमातही डॉ. लागू यांनी परमेश्वराला रिटायर केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम पूर्ण होणार नाही, असे म्हटले होते.

अंनिसच्या प्रत्येक कामातील त्यांचा कृतीशील सहभाग १९९२-९३ पासून मिळाला. काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला असून त्यामध्ये विवेक जागराचा वादसंवाद हा कार्यक्रम १९९३ ते १९९७ च्या दरम्यान राज्यभर घेण्यात आला. या कार्यक्रमातही ‘परमेश्वराला रिटायर करा, सर्व अंधश्रद्धांचे मूळ परमेश्वर आहे. ‘त्याला रिटायर केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकत नाही,’ ही भूमिका लागूंनी मांडली. तसेच तुम्ही फक्त वरवरची मलमपट्टी करत आहात, झाडाच्या फांद्या तोडून उपयोग नाही. त्याच्या मुळाशी घाव घातला पाहिजे, अशी टीकाही ते अंनिसवर करायचे. लागूंची ही भूमिका असली तरीही अंनिसची मात्र दुसरी एक तटस्थ भूमिका होती. यामध्ये भारतीय संविधानाला अभिप्रेत असणार्‍या संविधानातल्या नागरिकत्वाच्या मूल्याशी सुसंगत, म्हणजे नागरिकत्वाचे जे अधिकार आहेत त्यामध्ये उपासनेचे स्वातंत्र्य तसेच ५१ व्या कलमामध्ये मिळालेल्या धर्म चिकित्सेचे स्वातंत्र्य आहे. या दोन्हीचे समर्थन आणि पुरस्कार अंनिस करते.

त्यामुळे लागू आणि आमच्यातील हा परस्पर विरोधी विचार कायम राहिला होता. परंतु, विवेक जागराचा वादसंवाद या कार्यक्रमांसाठी डॉ. लागू यांच्यासारखा माणूस येऊन अशा स्वरुपाची मांडणी करतो, त्यामुळे समाजातील बुद्धीवादी विचार करणार्‍या समाजातील लोकांनाही वैचारिक खाद्य मिळत होते. त्याचा अंनिसच्या कामाला फायदाच होत गेला. तर दुसर्‍या बाजूला कट्टर धर्मवादी लोकांकडून त्या त्या ठिकाणच्या कार्यक्रमांना विरोधही प्रचंड प्रमाणात झाला. अनेकदा काही विशिष्ट संघटनेची माणसं तेथे येऊन व्यक्तिगत पातळीवर वाद घालायचे. काही वेळेला संघर्षाचे प्रसंगही आले. १९९६-९७ साली औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात लागूंना यामुळे धक्काबुक्की झाली, तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला, शिवीगाळ केली. त्यालाही लागू संयमाने आणि शांतपणे सामोरे गेले.

डॉ. लागूंसारखा माणूस जेव्हा परमेश्वराला रिटायर करा, असं म्हणतो. त्यावेळी त्याला बातमीमूल्य प्राप्त होते. ती एक सनसनाटी होती. त्या त्या ठिकाणच्या दैनिकांमध्ये, नियतकालिकांमध्ये त्याला मोठं कव्हरेज मिळत होतं. दुसरीकडे अंनिसची संघटना म्हणून जी भूमिका दाभोलकर मांडत होते, ती मात्र बाजूला पडत होती. त्यामुळे विरोधकांनाही आयतं कोलित मिळालं. अंनिसवाले परमेश्वराला रिटायर करायला निघाले, असा आमच्याबद्दलचा गैरसमज पसरू लागला. ज्याला आम्हाला अजूनही सामोरं जावं लागत आहे. मात्र लागूंसारखा मोठा माणूस आमच्या मंचावर येऊन विचार मांडतो, बोलतो आणि ग्रामीण भागापर्यंत तो पोहोचतो. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला एक प्रकारचं ग्लॅमर मिळालं.
परफेक्शनिस्ट असे लागूंचे व्यक्तिमत्त्व…

गेल्या ३०-३५ वर्षांच्या अंनिसच्या कामांमध्ये डॉ. लागू यांनी काही महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यामध्ये यात्रेतील पशू हत्या (नवसासाठी कोंबडं, बकरं मारणं) याकरता १५० यात्रांमधून अंनिसच्यावतीने प्रबोधन आणि संघर्ष करायचा प्रयत्न केला गेला. नवस बोलणं ही अंधश्रद्धा आहे आणि आपण देवासारख्या उदात्त कल्पनेशी केलेला तो गैरव्यवहार आहे. म्हणून आपण पण नवसापोटी पशू बळी देणं हे योग्य नाही. यामध्ये आम्ही शाकाहार, मांसाहाराच्या प्रकारामध्ये गेलो नाही. जाऊ इच्छित नाही; पण नवसापोटी बळी देणं काही योग्य नाही. मग ते नरबळी असो वा पशूबळी. यासाठी अंनिसने प्रबोधन केले, संघर्ष केला. त्या त्या यात्रा, जत्रांमध्ये जाऊन सत्याग्रह केले, पत्रकं वाटली, कार्यक्रम केले. या यात्रा-जत्रांमध्ये डॉ. लागू, फुलेंचाही सहभाग होता. त्यांच्या येण्यामुळे लोकं कार्यक्रमाला गर्दी करायचे, त्या गर्दीला लागू प्रबोधित करायचे.

तसेच या गर्दीला अंनिसचे कार्यकर्ते प्रबोधित करतील, अशी एक नम्र भूमिकाही ते मांडायचे. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये लागू, निळूभाऊ आमच्यासोबत फिरले. या दौर्‍यांमध्ये आयोजक, संयोजक म्हणून दाभोलकरांच्या पाठोपाठ माझाही सहभाग होता. त्यामुळे लागूंसोबत अनेक दौर्‍यांमध्ये एकत्र राहण्याची संधी मला मिळाली. निवासाच्या ठिकाणी थांबायची संधी मिळाली. त्यातून त्यांच्यातील एक परफेक्शनिस्ट कलावंत, साहित्यिक, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता, जबाबदार नागरिक ते अगदी माणूस म्हणून मला पाहायला मिळाला. परफेक्शन आपल्यात असले पाहिजे याच्याबाबत ते फार दक्ष असायचे. त्याच्यासाठी ते सतत स्वत:ला तपासत राहायचे. ते नेहमीच स्वत:चीही चिकित्सा करायचे आणि कधीकधी आमच्याशी याबाबत मोकळेपणाने बोलायचे.

लागूंमध्ये टापटिपपणा, निटनेटकेपणा आणि वेळेच्या बाबतीत लागू यांच्या इतका परफेक्शनिस्ट माणूस आम्ही पाहिला नाही. लागूंच्या सोबत कार्यक्रमाचे आयोजन करायचं म्हणजे वेळ पाळायचीच. कुठल्याही परिस्थितीत काहीही घडून गेलं तरी, कारण ते स्वत: मनगटावर घड्याळ बांधायचे नाहीत. ते लॉकेटसोबतचं घड्याळ बाळगायचे. कधीही ठरलेल्या वेळेच्या आधी १५ मिनिटं ज्या संयोजकाच्या सोबत ते आले असतील त्याला ते घड्याळ दाखवायचे. वेळेची आठवण करून द्यायचे. कधी कधी तर वेळ चुकल्यामुळे वेळेवर कार्यक्रम झाला नाही म्हणून लागू अनेकदा चिडलेले आम्ही पाहिले आहेत. त्यावेळेला त्यांना शांत करणं ही फार मोठी गोष्ट असायची. फार जिकिरीने ते करावं लागायचं.

दोन महत्त्वाचे संघर्ष अंनिसने केले त्यातील एक म्हणजे शनी शिंगणापूरमधील चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे. त्यांचा नागरिक म्हणून तो अधिकार आहे. याकरता समान नागरिकत्वाची लढाई जवळपास दहा वर्षे त्याकाळी अंनिसने लढली. यासंबंधी २००२ साली एक सत्याग्रह अहमदनगरला आयोजित करण्यात आला. त्याला लागू, फुले, एन. डी. पाटील, पुष्पा भावे यासारखे अनेक मान्यवर, ज्येष्ठ सहकारी आले होते. एका मोठ्या सभागृहात परिषद आणि सत्याग्रह घेण्यात आला. प्रसंगी आम्हाला अटकही झाली. सर्व ज्येष्ठ मंडळींना तेथील अहमदनगरच्या जेलमध्ये ठेवलं गेलं. रात्रभर ती सर्व मंडळी जेलमध्ये राहिली होती. त्या ठिकाणी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे की काय, असा समज तेथील लोकांचा झाला. असे असले तरी डॉ. लागूंच्या कार्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ मिळालं, प्रोत्साहन मिळालं, आपण लढलं पाहिजे, अशी भावना निर्माण झाली.

अंनिसचा दुसरा मोठा संघर्ष म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्यासाठी झाला. शेवटी या कायद्यासाठी दाभोलकर यांना आपला जीव गमवावा लागला. या कायद्याचं सुरुवातीचं नाव अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हे होतं. या कायद्यासाठीच्या संघर्षाचा १९९२-९३ पासून ते २०१३ पर्यंतचा जो १८ वर्षांचा संसदीय प्रवास राहिला त्या सगळ्या प्रवासाचे डॉ. लागू हे साक्षीदार आहेत. यात किमान पाच वेळा ते राज्य स्तरावरील शिष्टमंडळासह तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित नेत्यांना भेटायला आमच्यासोबत आले. मुंबईमध्ये आम्ही जी काही विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान धरणे, सत्याग्रह करायचो त्याला ते उपस्थित राहायचे.

दाभोलकर हयात असताना जुलै २०१३ मध्ये जो सत्याग्रह झाला त्यातही भर पावसात डॉ. लागू, एन. डी. पाटील आणि इतर मंडळी तोंडावर काळी पट्टी लावून त्या मूक सत्याग्रहात आमच्यासोबत उपस्थित होते. विविध कार्यक्रमाच्या वेळी डॉ. लागू लोकांना संबोधित करत असताना विरोधी लोक घंटानाद करायचे, जेणेकरून लागूंचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू नये. पण अशाही परिस्थितीत शांतपणे लागू आणि इतर त्यांच्यासोबतच्या सहकार्‍यांचे आंदोलन सुरू असायचे. डॉ. लागूंमुळे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी अंनिसच्या कामाशी जोडली गेली. सिनेमा, नाटक, साहित्य, सांस्कृतिक, संगीत, अभिनय, माध्यमं अशा अनेक क्षेत्रातील माणसाचा अंनिसशी संपर्क आला. लागू हे स्वत:च्या मतांशी ठाम होते. त्यापेक्षा अट्टाहासी असायचे. मात्र असे असूनही त्यांच्याशी संवाद व्हायचा. शांतपणे ऐकून घेणं हे त्यांना जमायचं हा त्यांच्यातील विशेष गुण होता.

लागूंच्या संदर्भात कृतज्ञता कशी व्यक्त करावी हा एक आमच्या समोरचा प्रश्न आहे. पण आम्ही त्यांची स्मृती जागवणार हे निश्चित. त्यासाठी यापूर्वीच एक सुरुवात केली आहे ती ‘विवेक फिल्म फेस्टिव्हल’ने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १ नोव्हेंबरच्या जयंती आधी ४-६ महिने विवेक फिल्म फेस्टिव्हलची घोषणा अंनिसकडून केली जाते. दिग्दर्शक-निर्माता नागराज मंजुळे यांची आटपाट नावाची चित्रपट संस्था आणि महाराष्ट्र अंनिसचे सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात चार वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. सलग तीन वर्षे म्हणजे २०१५, २०१६, २०१७ मध्ये दरवर्षी एक थीम घेऊन त्याबद्दल हे फेस्टिव्हल आयोजित केले गेले. आता दर दोन वर्षांनी हे फेस्टिव्हल आयोजित करायचं ठरवलं आहे. आता २०२० मध्ये हा फेस्टिव्हल होणार आहे. यामध्ये दरवर्षी दिल्या जाणार्‍या पारितोषिकांमध्ये तीन विभाग केले आहेत. शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंट्री आणि अ‍ॅनिमेशन असे हे विभाग आहेत. यामध्ये प्रथम पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने दिला जातो. डॉ. लागूंशी आमचा एक जिव्हाळा, भावबंध राहिला आहे. ज्यामुळे वैचारिकतेतून मानवतेकडे जायला मदत झाली, असं मला मनापासून वाटतं.

(शब्दांकन – रश्मी माने)                                                                                

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -