घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराज ठाकरे, इकडे लक्ष द्या!

राज ठाकरे, इकडे लक्ष द्या!

Subscribe

राज ठाकरे यांनी केवळ केंद्राच्या निर्णयांचे स्वागत केले तरी त्यांनी हिंदुत्वाचे विषय हाताळल्यासारखेच होणार आहे. मात्र, असे करून राज ठाकरे यांनी परावलंबी बनू नये. त्यांनी मागील दोन वर्षे शरद पवार यांच्यावर अवलंबून राहून जे राजकीय नुकसान करून घेतले, तसे त्यांनी भाजपवर अवलंबून राहून करू नये. राज ठाकरे स्वत: एक उत्तम वक्ता, उत्तम संघटक, उत्तम अभ्यासू आणि उत्तम नेता आहेत. त्यांच्यातील या गुणांमुळे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत नाराजी व्यक्त करून दुसरा पक्ष काढला आणि शिवसेनाप्रमुखांसमोर तो यशस्वीपणे उभा करून दाखवला. तेव्हा ते स्वावलंबी होते, स्वत: पक्षाचे ध्येयधोरण ठरवत होते, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देत होते. पक्ष संघटना बांधत होते. आता जरी त्यांनी राजकीय अपरिहार्यता म्हणून प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली असली तरी हिंदुत्वासाठी त्यांना भाजपवर अवलंबून राहण्याची काहीही गरज नाही. त्यांचे मूळ हे हिंदुत्वच होते, हे त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात जाहीर केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना हिंदुत्वाचे मुद्दे कोणते आहेत, हे कुणी सांगण्याची नक्कीच गरज नाही. तसे त्यांनी त्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनातील भाषणात अनेक मुद्यांचा उल्लेख केला. त्यातील एक महत्त्वाचा मशिदींवरील भोंग्यांचा होता.

पक्षस्थापनेनंतर १४ वर्षांनी झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाचा अंगीकार केला. ‘माझ्या धर्माला कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन’, असे उद्गार राज ठाकरे यांनी काढले होते. कालपर्यंत प्रत्येक भाषणाची सुरुवात ‘माझ्या तमाम मराठी माता-भगिणींनो…’, अशा शब्दांत करणारे राज ठाकरे यांनी पहिल्यांदा त्या भाषणात ‘माझ्या तमाम हिंदू माता-भगिणींनो…’ अशी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे केली. समोर उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाला कसे संबोधित करायचे, त्यांना कसा संदेश द्यायचा, हे राज ठाकरे यांच्यासारखा फर्डा वक्ताच जाणो. प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली हे सांगण्यासाठी राज यांची भाषणाची ही सुरुवात पुरेशी होती. राज ठाकरे यांनी पक्षांतर केले नाही, तर नवीन पक्ष स्थापन करून आपले अस्तित्व दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि यश प्राप्त केले. त्यामुळे नवी सुरुवात यशस्वीपणे करण्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यासाठी कोणकोणते विषय हाताळायचे, कोणते उपक्रम सुरू करायचे यात राज ठाकरे निष्णात आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेवरून राज यांनी केलेली नवी सुरुवात ही त्यांची १४ वर्षांनंतरची पुन्हा शून्यातून सुरुवात म्हणावी लागणार आहे. कार्यकर्त्यांसमोर नुसती हिंदुत्वाची भूमिका मांडून चालणार नाही, त्यासाठी विषय द्यावे लागणार, म्हणून मग राज ठाकरे यांनी अधिवेशनातील भाषणात नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देत ‘पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमानांना देशाबाहेर हाकला’, अशी मागणीही केली. ही भूमिका अर्थातच हिंदुत्ववादी विचारधारेची आहे. त्यामुळे कालपर्यंत जे राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार समजत होते, त्यांच्यासाठी राज यांची भूमिका सुखावणारी होती. त्याच वेळी राज ठाकरे यांनी पक्षाच्या दुसर्‍या झेंड्याचेही अनावरण केले. भगव्या रंगाचा हा ध्वज राज कार्यकर्त्यांच्या हातात देऊन त्यांनी तरुणांईमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

मनसेच्या पहिल्या अधिवेशनात राज यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या दोन्ही कायद्यांना नुसता पाठिंबा न देता या कायद्यांच्या विरोधात देशभरात मोर्चे निघत असल्यामुळे मोर्चाला मोर्चाने उत्तर अशी भूमिका मांडत ९ फेब्रुवारी रोजी या कायद्यांच्या समर्थनार्थ मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यस्तरावर या मोर्चासाठी मोर्चेबांधणी केली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चाला समजतील, अशी तयारी केली आणि प्रत्यक्षातही हा मोर्चा अभूतपूर्व निघाला. राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जत्था या मोर्चासाठी मुंबईत दाखल झाला. हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. राज ठाकरे यांच्या कामाची पद्धत पाहता ते कोणत्याही विषयावर कायम स्थिर नसतात, असा आरोप त्यांच्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी कायम करत असतात. त्यासाठी टोलचे आंदोलन असो की परप्रांतीय फेरीवाले असो, अशा अनेक विषयांचा दाखला दिला जातो. या आरोपांचे सक्षमपणे खंडन अद्याप राज ठाकरे यांना करता आलेले नाही. त्यामुळे त्यात तथ्यही आहे. कारण राज ठाकरे यांनी मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अचानक राजकीय भूमिका बदलली होती. कालपर्यंत नरेंद्र मोदी यांचे गुणगाण गाणारे राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा बदलून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर भरभरून टीका केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदींच्या भाषणांचा सारांश दाखवून त्याचा कसा फज्जा उडाला हेही निवडणूक काळात ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून मतदारांना दाखवून दिले. मोदी-शहा यांचे कट्टर विरोधक बनलेले राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा मात्र विशेष परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यात ३७० डिग्रीपर्यंत राजकीय स्थित्यंतर घडले.

- Advertisement -

शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत आघाडी करून राज्यात सरकार स्थापन केले. शरद पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला. उद्धव यांच्या आघाडीतील प्रवेशामुळे अर्थातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आघाडीचे दरवाजे बंद झाले. त्याआधी शरद पवार यांनी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने त्याला कायम विरोध केला. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेचे आमिष दाखवून पवार यांनी शिवसेनेला आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसला राजी केले. परिणामी आज राज्याच्या राजकीय कॅनव्हासवर भाजप आणि मनसे हे दोन पक्ष एकाकी पडल्याचे चित्र आहे. म्हणूनच एकाकी पडलेल्या या दोन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पडद्यामागून तरी या दोन्ही पक्षांनी हात मिळवणी केल्याची चर्चा आहे. अशा प्रकारे राज यांनी त्यांच्या पक्षाची पुढील वाटचाल भाजपसोबत करण्याचे ठरवले आहे. मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्षांनी होणार आहे. त्यासाठी नव्या विचारांची पेरणी आतापासून पक्षामध्ये करण्यासाठी राज ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राज ठाकरे यांनी एकाच वेळी दोन टार्गेट समोर ठेवले आहे. एक म्हणजे शिवसेना ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत गेल्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ बनल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आक्रमक हिंदुत्वाची निर्माण झालेली पोकळी राज ठाकरे यांना भरून काढायची आहे. अर्थात राजकीय पटलावर शिवसेनेची जागा घ्यायची आहे, तर दुसरीकडे भाजपसोबत युती करून मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देत सत्तेचे वाटेकरी बनायचे आहे. याकरता राज ठाकरे यांना बराच वेळ आहे. तोपर्यंत पक्षाला प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी राज ठाकरे यांना बरेच विषय मिळतील. त्याची सुरुवात नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा या कायद्यांच्या माध्यमातून केली आहे.

केंद्रात मोदी सरकार आहे. सध्या मोदी आणि शहा हे जे जे निर्णय घेतात. ते हिंदुत्वाला अनुसरून असतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी केवळ केंद्राच्या निर्णयांचे स्वागत केले तरी त्यांनी हिंदुत्वाचे विषय हाताळल्यासारखेच होणार आहे. मात्र, असे करून राज ठाकरे यांनी परावलंबी बनू नये. त्यांनी मागील दोन वर्षे शरद पवार यांच्यावर अवलंबून राहून जे राजकीय नुकसान करून घेतले, तसे त्यांनी भाजपवर अवलंबून राहून करू नये. राज ठाकरे स्वत: एक उत्तम वक्ता, उत्तम संघटक, उत्तम अभ्यासू आणि उत्तम नेता आहेत. त्यांच्यातील या गुणांमुळे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत नाराजी व्यक्त करून दुसरा पक्ष काढला आणि शिवसेनाप्रमुखांसमोर तो यशस्वीपणे उभा करून दाखवला. तेव्हा ते स्वावलंबी होते, स्वत: पक्षाचे ध्येयधोरण ठरवत होते, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देत होते. पक्ष संघटना बांधत होते. आता जरी त्यांनी राजकीय अपरिहार्यता म्हणून प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली असली तरी हिंदुत्वासाठी त्यांना भाजपवर अवलंबून राहण्याची काहीही गरज नाही. त्यांचे मूळ हे हिंदुत्वच होते, हे त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात जाहीर केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना हिंदुत्वाचे मुद्दे कोणते आहेत, हे कुणी सांगण्याची नक्कीच गरज नाही. तसे त्यांनी त्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनातील भाषणात अनेक मुद्यांचा उल्लेख केला. त्यातील एक महत्त्वाचा मशिदींवरील भोंग्यांचा होता. त्यासोबत गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी, शालेय पाठ्यपुस्तकांतून राष्ट्रपुरुषांचा होणारा अवमान, धर्मांतर बंदी कायदा, समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा यांची निर्मिती अशा अनेक मुद्यांसाठी राज ठाकरे यांनी जर आग्रह धरला, त्यासाठी शिवसेनेला फैलावर धरले, तर एका बाजूला शिवसेनेची कोंडी करणे शक्य होईल आणि दुसरीकडे या विषयांसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला, तर त्याचे श्रेय घेणे शक्य होणार आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -