घरक्रीडाटीम इंडिया क्लिन बोल्ड!

टीम इंडिया क्लिन बोल्ड!

Subscribe

पहिल्या कसोटीत न्यूझीलंड १० विकेट राखून विजयी

कसोटी क्रिकेटमध्ये भारत सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखला जातो. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यांना याचा प्रत्यय देण्यात अपयश आले. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. वेगवान गोलंदाज टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्टच्या भेदक मार्‍यामुळे पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने पाहुण्या भारतावर १० विकेट राखून मात केली. आयसीसीच्या जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेतील सुरुवातीचे सातही सामने जिंकणार्‍या कोहलीच्या संघाचा हा पहिलाच पराभव होता. मात्र, ३६० गुणांसह त्यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर न्यूझीलंडचा हा या स्पर्धेतील केवळ दुसरा विजय ठरला असून १२० गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहेत.

भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये मागील एक-दोन वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र, वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत बोल्ट, साऊथी, कायेल जेमिसन या तेज त्रिकुटाने अप्रतिम स्विंग आणि सीमचा मारा करत भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. या कसोटीत भारताचा पहिला डाव १६५ आणि दुसरा डाव १९१ धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात ९ धावांचे आव्हान मिळाले, जे त्यांनी अवघ्या १.४ षटकांत पूर्ण केले.

- Advertisement -

चौथ्या दिवशी भारताने ४ बाद १४४ वरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. दिवसाच्या तिसर्‍याच षटकात बोल्टने अजिंक्य रहाणेला यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद करत भारताला पाचवा झटका दिला. रहाणेने ७५ चेंडूत २९ धावा केल्या. पुढच्याच षटकात साऊथीने हनुमा विहारीचा १५ धावांवर त्रिफळा उडवला. रविचंद्रन अश्विनने दुसर्‍याच चेंडूवर चौकार लगावत आपल्या डावाची दमदार सुरुवात केली. मात्र, ४ धावांवरच साऊथीने त्याला पायचीत पकडले. यानंतर रिषभ पंत आणि ईशांत शर्मा या आठव्या जोडीने काही चांगले फटके मारत २७ धावांची भागीदारी रचली. परंतु, कॉलिन डी ग्रँडहोमने ईशांतला (१२), तर पुढच्या षटकात साऊथीने पंत (२५) आणि जसप्रीत बुमराह (०) यांना बाद करत भारताचा दुसरा डाव १९१ धावांवर संपुष्टात आणला. पहिल्या डावात ४ गडी बाद करणार्‍या साऊथीने दुसर्‍या डावात ६१ धावांत ५ गडी बाद केले. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

संक्षिप्त धावफलक – भारत : १६५ आणि १९१ (मयांक अगरवाल ५८, अजिंक्य रहाणे २९, रिषभ पंत २५; टीम साऊथी ५/६१, ट्रेंट बोल्ट ४/३९) पराभूत वि. न्यूझीलंड : ३४८ आणि बिनबाद ९ (टॉम लेथम नाबाद ७).

- Advertisement -

गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय – विल्यमसन

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या कसोटीत भारताला दोन्ही डावांत २०० धावांच्या आतच रोखले. त्यामुळे या विजयाचे श्रेय गोलंदाजांनाच जाते, असे विधान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने सामन्यानंतर केले. आम्हाला अपेक्षा होती, तितका वारा सुटला नव्हता. परंतु, आमच्या गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आणि भारतीय फलंदाजांना बाद करण्याच्या संधी निर्माण केल्या. त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. आमच्या फलंदाजांनीही चांगले योगदान दिले, असे विल्यमसन म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -