घरमुंबईसंजनाने वाचवला विहिरीत पडलेल्या लहानगीचा जीव!

संजनाने वाचवला विहिरीत पडलेल्या लहानगीचा जीव!

Subscribe

विक्रमगडमधील घटना, एकाकी धैर्यावर कौतुकाचा वर्षाव

विक्रमगड तालुक्यातील कर्‍हे तलावली येथील आठवीत शिक्षण घेत असलेल्या संजना राव हिने विहिरीत पाय घसरून पडलेल्या तिसरीतल्या मुलीला धाडसाने विहिरी बाहेर काढून तिचा जीव वाचवला. पाय घसरून विहिरीत पडलेल्या जागृती राव हिला वाचवण्यासाठी संजना स्वत: धैर्याने विहिरीत उतरली. मनाचा तोल ढळू न देता तिने मदतीला आजूबाजूला कुणीही नसताना परिस्थिती हाताळली. घाबरलेल्या जागृतीला धीर देत तिने आपल्या खाद्यांवर घेऊन तिला बाहेर काढले. तिच्या या अतुलनीय धैर्याबद्दल तिच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

18 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हा परिषद शाळा कर्‍हे तलावली या शाळेत इयत्ता 8 वीमध्ये शिक्षण घेत असलेली संजना जेठु राव ही शाळा सुटल्यावर सायंकाळी पिण्याचे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. विहिरीच्या कठड्यावर हंडा ठेऊन विहिरीतून पाणी काढू लागली. तेवढ्यात इयत्ता 3 री मध्ये शिकणारी जागृती विष्णू राव कळशी घेऊन पाणी भरण्यासाठी आली व पाणी भरु लागली. संजनाचा हंडा भरला, ती विहिरीच्या पालीवरून खाली उतरली. डोक्यावर हंडा ठेवला व ती जाणार एवढ्यात जागृतीचा पाय घसरला व ती विहिरीत पडली.

- Advertisement -

संजनाने लगेचंच डोक्यावर ठेवलेला हंडा खाली ठेवला व मदतीसाठी इकडे तिकडे बघू लागली. जवळपास कोणीच दिसत नव्हतेे. संजना खूप घाबरली होती. थरथरत होती. काय करावेे तिला सुचत नव्हते. तिच्या लक्षात आले आपणच काही तरी केल्याशिवाय पर्याय नाही. ती जोरात ओरडून जागृतीला हातपाय हालवत राहण्यासाठी सांगत होती. जागृतीही पोहत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. आणि शेवटी संजनाने स्वत: विहिरीत उतरायचे ठरवले.

विहिरीला पायर्‍या नव्हत्या. विहिरीचे बांधकाम करतेवेळी चढण्या उतरण्यासाठी काही दगड बांधकामातून बाहेर सोडलेले होते. ती कठड्यावर चढली. त्याच दगडांच्या मदतीने एक एक दगड उतरत ती आत गेली. तोपर्यंत जागृतीनेही कमालीचे धैर्य दाखवले होते. ती ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती. सतत दगडाकडे जाण्याचा प्रयत्न करत होती व संजना उभी असलेल्या दगडापर्यंत ती पोहोचली. आता कठीण काम होते, जागृतीला घेऊन वर येणे. कारण दोन दगडांमध्ये अंतर खूप होते. संजना विहिरीतून जागृतीला खांद्यावर घेऊन एक एक दगड चढत वर आली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता ती जागृतीला खांद्यावर घेऊन धावत जवळच असलेल्या आरोग्य उपकेंद्रात घेऊन गेली. डॉक्टर व त्यांच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ जागृतीची तपासणी केली. बोटाला झालेल्या जखमेवर पट्टी करुन तिला घरी सोडले. जागृती विहिरीत पडल्यापासून दवाखान्यात आणेपर्यंत सर्व परिस्थिती संजनाने एकटीने हाताळली. कुठलाही आततायीपणा न करता संयमाने व तेवढ्याच धाडसाने संजनाने दाखवलेलेे प्रसंगावधान कौतुकास्पद आहे. दुसर्‍या दिवशी दवाखान्यातील संपूर्ण कर्मचार्‍यांनी शाळेत येऊन संजनाला बक्षीस देऊन तिचेे कौतुक केले. त्यावेळी डॉ. चौधरी यांनी संजनाच्या धाडसाचे कौतुक केले.

- Advertisement -

संजनाने दाखवलेल्या या धाडसाबद्दल केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व ग्रामस्थ आणि तालुक्यातून अनेकांनी तिचे कौतुक केले. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी धाडसाबद्दल 25 हजार रुपये देऊन संजनाचा गौरव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -