घरफिचर्सखळं (अंगण )

खळं (अंगण )

Subscribe

"खळं" म्हणजे घराचा अविभाज्य भाग. ग्रामीण भागात बहुतेक सर्वांच्या घरासमोर "खळं" असतंच. या खळ्यावर सर्वांचंच प्रेम म्हणजे लहान अगदी नेणतं मूल असेल तर त्याने पहिलं पाऊल या खळ्यात टाकलेलं असेल आणि अंत झाल्यावर त्याची तिरडीदेखील या खळ्यातच बांधली जाते. त्यामुळे खळं म्हणजे अंत उन्नतीच्या उत्कर्षाचा साक्षीदार. केवळ घराचा नव्हे तर ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

आये ! न्हाई मामा इलेत ” असं आईला बाहेरून ओरडून सांगितलं की आई आतून सांगाययची.” रे, त्यांका बाहेर खळ्यात
बसांन क्यास कापुक सांग” मग आम्ही सर्व भावंड खळ्यात बसून न्हावी मामांच्या हाती आमचं डोकं द्यायचो.”तात्या, गायच्या वासराक खय बांधू?””त्यांका खळ्यात बांध” मग वाड्यातून गाईचं वासरू सोडवून मी त्या लहान वासरांना खळ्यात बांधत असे.”गे झिलाच्या आवशी ! रतांबे हाडलय “असं म्हणत डोक्यावर रतांब्यानी भरलेली फाटी सावरत वसंतनाना यायचा तेव्हा काकी आतून ” नानांनु, फाटी खळ्यात उतरासकाळपासून अगदी रात्रीपर्यंत ” खळं ” या एका जागेविषयी अनेक गोष्टी जोडलेल्या असतं.

“खळं” म्हणजे घराचा अविभाज्य भाग. ग्रामीण भागात बहुतेक सर्वांच्या घरासमोर ” खळं” असतंच. या खळ्यावर सर्वांचच प्रेम म्हणजे लहान अगदी नेणतं मूल असेल तर त्याने पहिलं पाऊल या खळ्यात टाकलेलं असेल आणि अंत झाल्यावर त्याची तिरडीदेखील या खळ्यातच बांधली जाते. त्यामुळे खळं म्हणजे अंत उन्नतीच्या उत्कर्षाचा साक्षीदार. केवळ घराचा नव्हे तर ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आजही लोक स्वतःच्या घरासाठी, बंगल्यासाठी जागा घेताना घरासमोर जागा, घरामागे जागा राहील की नाही याचा विचार करतो. खळं म्हणजे अडगळीच्या वस्तू ठेवायचं ठिकाण असा कोणी अर्थबोध घेऊ नये. ग्रामसंस्कृतीत खळ्याला एक विशिष्ट महत्त्व आहे. आणि ते त्या त्या प्रसंगी अधोरेखित केलं जातं. खळ्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे घरासमोरच्या खळ्याव्यतिरिक्त शेतातल्या खळ्याचंदेखील एक विशेष सांस्कृतिक मोल आहे. धान्य पिकल्यावर झोडणीसाठी आणि मळणीसाठी खळ्याचा विशेष उपयोग होतो, पण घरासमोरचं खळं हे काही वेगळंच अनुभव देणार संचित आहे, हे प्रामुख्याने जाणवतं. या खळ्याला ग्रामसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

- Advertisement -

खळ्याचं विशेष महत्त्व आहे हे लक्षात घेता ते तयार करण्यासाठी लागणारे कष्टदेखील दृष्टीआड करून चालणार नाहीत. पहिली घरासमोरची जमीन खोदा मग पाणी मारून भिरवण्यांनी जमीन समांतर करा, भिरवणी म्हणजे जमीन समांतर करण्यासाठी क्रिकेटच्या बॅटसारखं साधन जे एखादा मजबूत गडी हातात घेऊन ओल्या जमिनीवर मारत जमीन समांतर करतो, एकदा जमीन समांतर झाली की शेणाचा शिडकांडा मारून जमीन सारवतात, मग कुठे खळं तयार होतं. खळ्यावर मांडव टाकला की घराला खरी शोभा येते. आज कोणाचं लग्न आहे, चला टाका अक्षता कोणाच्या तरी खळ्यात. खळ्यात हळद लावा, खळ्यातच निम सांडा. खळ्यात मांडव असेल तर त्या खळ्याला शोभा येते. ज्यादिवशी शेणाने खळं सारवलं जातं त्यादिवशी खळ्याचा डौल काही निराळाच !खळ्यात चार मेढी टाकून वर चार-पाच वाशे टाकून सात-आठ चिव्याचे बांबू टाकले की, वर कराड नाहीतर भातीयान गवत टाकलं की मांडव तयार होतो.

खेड्यातील लोकांचा वावर घरापेक्षा खळ्यात जास्त होतो. म्हणजे बघा, आलेला माणूस मग तो गावचा असो की परगावचा. आला की पहिला खळ्यात असणार्‍या चोपाळ्यावर बसून गूळखडा आणि पाणी पिऊन मग घरात जायचा. प्रत्येकाच्या खळ्यात चोपाला ठेवलेला असायचा आणि चोपाल्यावर पानांचं ताट, त्यात खायची पानं, तंबाखू, चुना नेहमी ठेवलेले असायचे. येणारा-जाणारा खळ्यात येऊन चोपाल्यावर बसून गावगजाली सांगत एक पानं तोंडात टाकत जायचा. या गावगजाली लोकांच्या करमणुकीचे आणि विचारांच्या आदान-प्रदानाचे माध्यम होतं. माझे आजोबा तर पहाटे उठून आमच्या घराच्या खळ्यात तुकोबांच्या ओव्या म्हणायचे, सकाळच्या त्या निरव शांततेत आजोबांच्या त्या खळ्यातल्या ओव्यांनी घरात प्रसन्नता यायची.

- Advertisement -

उन्हाळ्यात खळ्यात बसून विटी-दांडू, आबादुबी असो लगोरी असे किती खेळ खेळले जायचे, त्याशिवाय दुपारच्या वेळी पत्त्यांचे डाव मांडले जायचे. पत्त्यातले खेळभिडू येताना खिशातून काजी घेऊन यायचा. काजीच्या जीवावर पत्त्यांचे हे खेळ खेळले जायचे. कोणी बरका फणस आणला की फोडा खळ्यात. खळ्यात बसून फणस खाण्यात काय मजा आहे म्हणून सांगू! आज भाजी साफ करायचीय, या खळ्यात. कणकवलीतून खारी बटरवाला आला की उतरला खळ्यात. नांदगावची मासेवाली आली की तिने फाटी उतरवली खळ्यात. रोजचे घालायचे कपडे खळ्यातच दांडीवर सुकत घातलेले असायचे. आपले शोधायचे आणि अंघोळीनंतर घालायचे. घरातील अगदीच खाजगी काम ही खळ्यात सोडून व्हायची. खळ्याचा डौल सारवल्यानंतर पाहात राहावा. त्या सारवलेल्या खळ्यात तांदळाच्या पिठाला पाण्यात भिजवून त्यापासून काढलेल्या बोटांच्या रांगोळ्या अतिशय सुबक दिसतात.

खळं हे त्या घराच्या सांस्कृतिक वातावरणाचं आणि समृद्धीचं प्रतीक होतं असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. खळ्यात एका बाजूला तुळशीवृंदावन ठेवलेलं असायचं. ती तुळस हिरवीगार असेल तर घरातील स्त्रिया त्या वृंदावनाची पूजा करून ही संस्कृती जपतात हे प्रतीत होतं. खळ्याचा एका बाजूला शेतात पिकलेल्या धान्याच्या कणगी, भाताचे बिवळे, मुडी ठेवलेल्या असत. भुईमूग काढणीच्या दिवसात शेतातील भुईमूग काढून त्याचे लटे बांधून खळ्यात पडायचे, मग घरातील माणसं, गडीमाणसं एकत्र येऊन खळ्यात बसून भुईमुगाच्या शेंगा झाळीपासून वेगळ्या करत बसत, त्यात कोणी गप्पिष्ट माणूस असेल तर गावगजाली रंगून सांगत कामाचा क्षीण जाणवू देत नसे.

खळ्यात अगदी घरातल्या खाजगी व्यवहाराशिवाय इतर सर्व गोष्टी होत. म्हणजे घरातली पूजा खळ्यात. पूजेनिमित्त आलेलं भजन खळ्यात. घरातलं ब्राह्मणभोजन खळ्यात, त्या ब्राह्मणभोजनाच्या जेवणाचा व्याप खळ्यात. त्यानिमित्ताने वाढलेली पंगत खळ्यातच उठायची, एवढंच काय कोणाचं लग्न या खळ्यात आणि जेवणाच्या पंगतीदेखील त्याच खळ्यात! खळ्याच्या आजुबाजूने फुललेली फुलांची बाग या खळ्याच्या सौंदयात भर घालते. उसवणे-शिवणे खळ्यात. केस कापणे खळ्यात, सकाळची पेज खळ्यात खाल्ली तरच मजा! गायी म्हशींची धार काढणं खळ्यात. दुपारची वामकुक्षी आणि उन्हाळ्यात घरात गरम होतं म्हणून झोपणंदेखील खळ्यात. गाई बैल गोठ्यात जरी बांधले तरी लहान वासरांना खळ्यात अगदी नजरेसमोर बांधलं जाई. हल्ली दरवर्षी खळं तयार करण्यापेक्षा आम्ही घरासमोर लाद्या घालून कायमस्वरूपी खळ्याचा प्रश्न मिटवून टाकलाय. दरवर्षी खळं तयार करण्यासाठी माणसं तरी कुठे शोधणार? दरवर्षी मांडव तयार करून पुन्हा पावसाळ्यात कोसळून ‘बलाट’ तयार करण्यापेक्षा पर्मनंट मांडव घातला आणि वर गवताच्या ऐवजी पत्रे टाकले तर कसं झ्याकपाक दिसतं.

घरासमोरचं खळं आता नामशेष होतंय. गोठ्यात गाई बैल नाहीत म्हणून सारवण्यासाठी शेण मिळत नाही ही शोकांतिका आहे. खळं नाही त्यामुळे खळ्यात अळी तयार करून भाज्या पिकवणे हे देखील होत नाही. त्यामुळे ते भाज्यांचे मांडवदेखील आता दृष्टिपथात येत नाहीत. जुन्या खळ्याची आठवण तेव्हा येते, जेव्हा घरासमोर घातलेल्या पत्राच्या मांडवाखाली कोब्याच्या जमिनीवर बसताना कोणी म्हणतं “आय गे, बापाशी माझ्या, भाजलंय रे मी !”. खळं या ग्रामसंस्कृती जपलेल्या संचितापैकी एक होतं ही वस्तुस्थिती आजसुद्धा नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -