घरक्रीडास्वप्नपूर्ती!

स्वप्नपूर्ती!

Subscribe

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मुंबईकडून दोनदा मुंबई आणि पुण्यात मार खाणार्‍या सौराष्ट्रला गेल्या वर्षी नागपुरात विदर्भाने हरवले. यंदा मात्र त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरण्याचे स्वप्न साकार केले. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी बंगालला शह दिला. जवळपास ८३ वर्षांनंतर रणजी करंडक सौराष्ट्रकडे तो अर्पित वसावडा, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार जयदेव उनाडकट या त्रिकुटाच्या दमदार कामगिरीमुळे!

जयदेव उनाडकटच्या सौराष्ट्र संघाने बंगालचा पराभव करून चौथ्या प्रयत्नात रणजी करंडक पटकावला. राजकोटच्या पावन भूमीत रणजी, दुलीप यांचा जन्म झाला. तसेच विनू मंकड, सलीम दुराणी आणि या संघाला पहिल्यांदा रणजी करंडक मिळवून देणारे प्रशिक्षक करसन घावरी यांची जन्मभूमी देखील सौराष्ट्रच! अपयशी हॅटट्रिकनंतर उनाडकट आणि त्याच्या सहकार्‍यांची मेहनत फळाला आली ती २०१९-२० मोसमात.

मुंबईकडून दोनदा मुंबई आणि पुण्यात मार खाणार्‍या सौराष्ट्रला गेल्या वर्षी नागपुरात विदर्भाने हरवले. यंदा मात्र चौथ्या प्रयत्नात घावरी-उनाडकट या प्रशिक्षक-कर्णधाराच्या जोडीने जेतेपदाचा चंगच बांधला. उपांत्य आणि अंतिम फेरीत अर्पित वसावडाने झुंजार शतकी खेळी करुन संघाची धुरा समर्थपणे वाहिली. या दोन्ही लढतीत सामनावीराचा पुरस्कार त्याने पटकावला. तळाच्या फलंदाजांच्या साथीने किल्ला लढवण्याची कला त्याला चांगलीच अवगत आहे. शेल्डन जॅक्सन यानेदेशील आपली भूमिका चोख पार पाडताना संघाचा ताल राखला.

- Advertisement -

भरवशाच्या चेतेश्वर पुजाराने मोक्याच्या क्षणी आपली जबाबदारी ईमानेइतबारे निभावली. समर्पित भावनेने खेळणे हा पुजाराचा मोठा गुण आणि तेच सौराष्ट्रचे बलस्थान! न्यूझीलंडचा दौरा करून आलेला पुजारा मैदानात उतरला, पण घसा दुखावल्यामुळे माघारी परतला. मात्र, तिसर्‍या दिवशी तो खेळपट्टीवर पुन्हा सज्ज झाला. त्याने २३७ चेंडूंचा सामना करत ६६ धावांची खेळी करताना अर्पितबरोबर शतकी भागी रचून सौराष्ट्रला भक्कम धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार उनाडकटसाठी यंदाचा मोसम अविस्मरणीय ठरला. त्याच्या नेतृत्वात सौराष्ट्रने पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला आणि त्याने १० सामन्यांत तब्बल ६७ गडी बाद करत वेगवान गोलंदाज म्हणून रणजीच्या एका मोसमात सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला.

सौराष्ट्रचे प्रशिक्षक करसन घावरी यांचाही जेतेपदात निश्चितच वाटा आहेच. सितांशू कोटक याच्याकडून प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यावर कडूभाईंनीनी (घावरी यांचे टोपण नाव) खेळाडूंना युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. ते मूळचे काठेवाडी, पण कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईत आले. रणजीमध्ये ते मुंबईकडून खेळले. तसेच त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करतानाही चांगली कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे शतक साजरे करणारे घावरी हे पहिले वेगवान गोलंदाज! महान कपिल देवच्याही आधी त्यांनी कसोटीत शंभर बळी मिळवले होते. मुंबईच्या रणजी विजेत्या चमूचेही त्यांनी प्रशिक्षकपद भूषवले होते. आता त्यांच्याच मार्गदर्शनात सौराष्ट्रने पहिल्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरले. ’मी खुश आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisement -

गेल्या दशकभराच्या रणजी विजेत्यांवर नजर टाकल्यास नवे विजेते बघावयास मिळतात. गेले दोन मोसम विदर्भ संघ विजेता होता. त्याआधीच्या मोसमात गुजरातने बलाढ्य मुंबईला हरवून पहिल्यांदा रणजी करंडक पटकावला. मागील दशकाच्या सुरूवातीला राजस्थानने लागोपाठ दोनदा जेतेपद पटकावण्याची किमया केली होती. दिल्ली, मुंबई, तामिळनाडू, बंगाल, कर्नाटक यांसारख्या पूर्वीच्या बलवान संघाना जेतेपद मिळवणे आता अवघड जात आहे. छोट-छोटे संघदेखील त्यांना तगडी टक्कर देत आहेत. त्यांनादेखील फिटनेस, अकादमीज यांचे महत्त्व उमगले असून दर्जेदार सोयीसुविधा पुरवण्यावर भर देण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

गुजरातमध्ये तीन क्रिकेट संघटना आहेत. गुजरात, बडोदा आणि सौराष्ट्र. या तीनही क्रिकेट संघटनांनी गेल्या दशकभरात आपली छाप पाडताना रणजी, विजय हजारे, विजय मर्चंट, मुश्ताक अली अशा विविध राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. शिवाय पार्थिव पटेल, मुनाफ पटेल, जसप्रीत बुमरा, इरफान पठाण, युसुफ पठाण, पुजारा, जयदेव उनाडकट, रविंद्र जाडेजा, हार्दिक पांड्या यांसारखे खेळाडू त्यांनी भारताला दिले. रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत अलीकडे गुजराती संघांनी लक्षवेधक कामगिरी करताना मुंबईवर वारंवार कुरघोडी केली आहे. ही बाबदेखील नजरेआड करून चालणार नाही. रणजीच्या इतिहासावर नजर टाकली असता पहिल्या ५-६ वर्षांत मुंबई, नवानगर, हैदराबाद, बंगाल असे विविध संघ जेतेपदाच्या यादीत दिमाखाने दिसतात. जवळपास ८३ वर्षांनंतर रणजी करंडक सौराष्ट्रकडे आल्याने निरंजन – जयदेव शहा या पितापुत्रासह उनाडकट, चेतेश्वर पुजारा, अरविंद पुजारा (चेतेश्वरचे वडील), घावरी प्रभूती खुश झाले असणार, हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -