घरफिचर्समाणूसपणाचे आकलन

माणूसपणाचे आकलन

Subscribe

डॉ.आंबेडकरांचे कार्य हे फक्त दलित समूहापुरतेच सिमीत नव्हते; तर ते व्यापक असल्याचा भाव दलितेतर कवितेने मांडला आहे. या अनुषंगाने चंद्रशेखर मलकमपट्टे यांच्या ‘भूमिपुत्रांचे बाबासाहेब’ या दीर्घकवितेचा निर्देश करता येईल. याच परंपरेतील महत्त्वाचा संग्रह असलेला अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घकवितेचे आकलन प्रस्तुत लेखातून मांडले आहे. कोकणची भू-जैविकता-ग्रामजीवन अभिव्यक्त करणारा ‘आवानओल’ हा काव्यसंग्रह आणि कोकणच्या राजकीय-सांस्कृतिक र्‍हासाचा पट मांडणारी ‘हत्ती इलो’ या दीर्घ कवितेमुळे अजय कांडर यांची मराठी कवितेत सशक्त कवी म्हणून ओळख प्रस्थापित झालेली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक पातळीवरील महापुरूष आहेत. वेगवेगळ्या ज्ञानशाखातील तत्त्वज्ञ-सुधारक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या जीवन आणि कार्याने आधुनिक भारताचा इतिहास व्यापलेला आहे. मूक समूहांना आवाज देण्याचे महान क्रांतीकार्य त्यांनी घडवून आणलेले आहे. म्हणून ते मूक समूहांचे महानायक ठरतात. एखाद्या समाज-संस्कृतीतील इतिहास पुरुष जेव्हा कवितेचा विषय होतो; तेव्हा तो महापुरुष त्या समूहाच्या नेणिवेचा भाग झालेला असतो.आणि तो नेणिवेचा भाग तेव्हाच होतो; जेव्हा त्याचे कार्य सर्वस्तरीय समूहाच्या जाणिवेला स्पर्श करणारे असते.

डॉ.आंबेडकर हे भारतीय समाजाच्या नेणिवेचा भाग असणारे व्यक्तिमत्त्व असल्यानेच त्यांच्यावर मराठी नि इतर भाषांतूनही कविता लिहिली गेली. या नायकासंबंधी मराठीत विपुल कविता लिहिली गेलेली आहे. लिहिली जाते आहे. तरीही बाबासाहेब कवितेतून सांगायचे उरतातच! यातच त्यांचे थोरपण दडलेले आहे. प्रामुख्याने मराठीत दलित कवितेने डॉ.आंबेडकरांचे क्रांतीकार्य काव्यबध्द केलेले आहे. परंतु अलीकडच्या काळात दलितेतर समूहातूनही त्यांच्यावर कविता लिहिली जाते आहे. ही बाब बाबासाहेबांचे महानत्त्व अधोरेखित करणारी आहे.

- Advertisement -

डॉ.आंबेडकरांचे कार्य हे फक्त दलित समूहापुरतेच सिमीत नव्हते; तर ते व्यापक असल्याचा भाव दलितेतर कवितेने मांडला आहे. या अनुषंगाने चंद्रशेखर मलकमपट्टे यांच्या ‘भूमिपुत्रांचे बाबासाहेब’ या दीर्घ कवितेचा निर्देश करता येईल. याच परंपरेतील महत्त्वाचा संग्रह असलेला अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घकवितेचे आकलन प्रस्तुत लेखातून मांडले आहे. कोकणची भू-जैविकता-ग्रामजीवन अभिव्यक्त करणारा ‘आवानओल’ हा काव्यसंग्रह आणि कोकणच्या राजकीय-सांस्कृतिक र्‍हासाचा पट मांडणारी ‘हत्ती इलो’ या दीर्घ कवितेमुळे अजय कांडर यांची मराठी कवितेत सशक्त कवी म्हणून ओळख प्रस्थापित झालेली आहे. बदलत्या वर्तमानाचे नवे रचित त्यांच्या कवितेने मांडल्याने ही कविता मराठी कवितेत वेगळी नि मौलिक ठरली. प्रस्तुत दीर्घ कविताही आविष्कारदृष्ठ्या मोलाची ठरणारी आहे. या कवितेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सर्वव्यापकता आणि सर्वस्पर्शीत्त्वाचा अवकाश त्यांनी मांडला आहे. डॉ.आंबेडकरांचे कार्य हे विशिष्ट समूहापुरते मर्यादित नाही तर त्याला वैश्विक संदर्भ आहेत आणि याच संदर्भांची उकल या कवितेने केलेली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र कार्याचे केंद्र ‘माणूस’आहे. त्यांच्या सर्व सामाजिक लढाया या माणसाच्या मुक्तीच्या लढाया आहेत. माणसांच्या श्वासाची लय जिवंत राहावी म्हणूनच त्यांनी विषम व्यवस्थेविरूध्द सामाजिक युध्द पुकारले. माणसाचे नैसर्गिक अधिकार त्याला मिळावे म्हणून त्यांनी समतासंगर केला. गुलामी नाकारून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हा मूल्यविचार रूजविण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य संघर्षरत ठेवले. हा संघर्ष माणसांच्या दु:खमुक्तीसाठी होता. माणूसपणाची नवी गाथा निर्मिणारा होता. याच माणूसवादी चळवळीचा आशय या कवितेतून अधोरेखित झाला आहे. कवी लिहितो, तू फक्त माणूस वाटलास माणसांसाठी झटणारा/म्हणूनच तू झालास माझ्यासाठी/युगानुयुगांचा नायक! माणूसवादी भूमिकेमुळेच जगातल्या कोणत्याही शोषित माणसाला कोणत्याही काळात डॉ.आंबेडकर आपले नायक वाटत असल्याचे सूचन या कवितेतून होते. म्हणूनच कविने ‘युगानुयुगे तूच’या सार्थ शब्दात या कार्याची व्यापकता नि वैश्विकता अधोरेखित केली आहे.

- Advertisement -

माणसांबद्दल अपार करूणा आणि माणसांवरील निस्सीम प्रेमाचे प्रतिक म्हणून बाबासाहेबांची प्रतिमा कांडर यांनी उभी केलेली आहे.‘तुझ्याच वाटेवरून चालल्यावर/लक्षात आलं/माणसानेच करावं/माणसावर प्रेम’या जाणिवेला केंद्रसूत्र ठेवून कवीने बाबासाहेबांचा चरित्रपट साकारला आहे. जात, धर्म, देव नि पंथमुक्त असलेले बाबासाहेब कवीला महत्त्वाचे वाटतात. आपला देश हा विविध प्रकारच्या विषमतांनी भरलेला आहे. त्यातून मूक समूहांचे कमालीचे शोषणच केले गेले. या विषमतामुक्तीसाठीच बाबासाहेबांनी आयुष्य झिजवल्याचा स्वर या कवितेने जागवला आहे. जात-धर्माच्या अस्मिता इतक्या टोकदार असतात की त्या माणसांकडे माणूस म्हणून पाहू देत नाही; त्यामुळे बाबासाहेबांनी या व्यवस्थेलाच उद्ध्वस्त करणारा कृतिकार्यक्रम दिला, याचा आशय ही कविता व्यक्त करते. पाण्यासारख्या नैसर्गिक हक्कातही व्यवस्थेने विषमता पेरली. ती विषमता या महापुरुषाने उखडून टाकली. म्हणून कवी बाबासाहेबांबद्दल लिहितो,‘या जगात माणूसच नाही । तर जोपर्यंत आहे जीवसृष्टी । तोपर्यंत तहान असणारच आहे । आणि जोपर्यंत तहान आहे । तोपर्यंत या जगात । तूही असणारच आहे!’ याप्रकारे या नायकाच्या विराटतेचे दर्शन कवीने घडवलेले आहे.

उपेक्षितांच्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी डॉ.आंबेडकरांनी केलेल्या समाजसंघर्षाची आणि उपेक्षितांमध्ये रूजवलेल्या आत्मशोधाच्या जाणिवेचे अनेकविध पदर या कवितेने उजागर केलेले आहेत. अन्यायवादी गुलामीचे समाजशास्र निर्मिणार्‍या व्यवस्थेला आणि देव संस्कृतीला दिलेला नकार, अस्पृश्यतेतून वाट्याला आलेल्या दु:खाचे केले विध्वंसन, धर्ममार्तंडांनी पुराणांच्या आडून गुंगवलेल्या समूहरचनेची केलेली चिकित्सा, व्यक्तिस्वातंत्र्याचा केलेला पुरस्कार आणि त्यासाठी ज्ञान आणि ग्रंथ वाचन-लेखनाची विशद केलेली महत्ता, त्यांनी प्रखर बुध्दीमत्तेचा केलेला आविष्कार या पैलुंच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आशय या कवितेने मांडला आहे. बाबासाहेबांच्या स्रीविषयक भूमिकेचा गाभा विस्तृतपणे ही कविता मांडते. ‘जो महापुरुष बाईला स्वातंत्र्य देण्यासाठी झटेल । तोच समजावा सार्‍या समाजाचा’ या शब्दात बाबासाहेबांचे मोठेपण कांडर यांनी विशद केले आहे. शेती व शेतकर्‍यांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी चळवळी केल्या आणि संबंध भारतीयांच्या हक्काचे संरक्षण करणारे लोकशाहीवादी संविधान दिले. यासंबंधीचेही संवेदन ही कविता मांडते.‘तुला भेटणे म्हणजेच बुध्दाला भेटणे । आणि बुध्दाला भेटणे म्हणजेच । दीनदुबळ्यांवर आयुष्याच्या अंतापर्यंत प्रेम करणे!’ अशी त्यांच्या कार्याची विशालताही कवीने अधोरेखित केलेली आहे. ही दीर्घ कविता माणूसपणाचे आकलन मांडणारी आणि करून देणारी; तसेच माणूसपणाची अफाटतेला विशद करणारी कविता आहे.

चिंतनशीलता आणि वैचारिकता हा महत्त्वाचा गुणधर्म या कवितेचा आहे. इतिहास व वर्तमान यांचे संतुलन साधत आकारलेली ही मुक्तछंदी दीर्घकविता बाबासाहेबांशी संवाद साधत भारतीय वंचित समूहाच्या वेदनामुक्तीचा इतिहास मांडते.आज देश विविध सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक मूल्य र्‍हासाच्या वाटेवरून मार्गक्रमण करतोय.अशा काळात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर अपरिहार्य ठरतो. या दृष्टीनेही या कवितेचे महत्त्व आहे. दुसरा भाग असा: बहुसंख्य भारतीयांची अशी धारणा आहे की, डॉ.आंबेडकर आपले नाहीत ते दलित समाजाचेच पुढारी आहेत. या कवितेने ही धारणाच खोडून काढलेली आहे. हे या कवितेचे महत्त्वाचे यश आहे. ही कविता अत्यंत साध्यासोप्या; परंतु तितक्याच समर्पक शब्दात बाबासाहेब रेखाटताना दिसते. बाबासाहेबांकडे भक्तीवादी भावाने कवी बघत नाही, ही या कवितेची जमेची बाजू आहे.

स्व ते समूह असा या कवितेचा विकासप्रवास समष्टीहिताचा आहे. ही कविता सामान्य माणसांमधे आशावाद जागा करत विश्वास पैदा करणारी कविता आहे. कोणत्याही प्रकारचा आत्मगौरव या कवितेने केला नसल्याने ती निर्मळतेने बाबासाहेबांचे चित्र साकारू पाहते. या चित्राची प्रेरणा घेऊन सर्वसामान्य माणसानेही भेदरहित जगण्याचा स्वीकार करण्याची प्रार्थना कवीने केलेली आहे. कवितानायकाच्या व्यापकतेएवढीच व्यापकता कविनेही अभिव्यक्तीत ठेवल्याने ही कविता अक्षर झाली आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कवितेत या कवितेचे वेगळेपण ठळक होते. या कवितेने मराठी चरित्रात्मक वैचारिक कवितेचा पैस व्यापक केला आहे. विचार, भावना आणि कलात्मकतेचे अतिव सेंद्रीय रूप या कवितेने घडवलेले आहे. नव्या अर्थशील प्रतिमाबंधामुळे ही कविता वैशिष्ठ्यपूर्ण झालेली आहे. काव्यबांधणीत अंतर्गत लय साधल्याने ही कविता एकात्म अनुभवाचा संस्कार करते. त्यामुळेच या कवितेचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे.

-केदार काळवणे -सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि.उस्मानाबाद.पिन :413507

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -