घरफिचर्सदडून राहिलेलं गाणं!

दडून राहिलेलं गाणं!

Subscribe

कॅसेटच्या त्या काळात सुरेश वाडकरच्या आवाजात काही भावगीतं गाऊन घेण्याचा एक प्रस्ताव अशोक पत्कींपुढे स्वत:च्या पायापंखांनी चालून आला...आणि अशोक पत्कींच्या मनात साठून राहिलेलं ते सूर झेपावत बाहेर आले. ते त्यांच्याच मनात रेंगाळत राहिलेले सूर होते. त्याच्यावर त्यांनीच शब्द बेतले आणि ते गाणं आकाराला आलं. ते शब्द होते - तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला हा, तव स्पर्श अमृताचा.

संगीताच्या प्रांतात मुशाफिरी करणार्‍या कलावंताच्या मनात कोणतं तरी एक वेगळंच गाणं कायम मनात दडून राहिलेलं असतं. गायकाच्या मनात तसं गाणं गायचं राहून गेलेलं असतं. पण संगीतकाराच्या मनात तर असं एखादं गाणं हटकून दडून राहिलेलं असतं. इतरांसाठी मागणीबरहुकूम गाणी करत असताना कधीतरी या संगीतकाराचं मन त्याच्या मनात झंकारत असणार्‍या सात सुरांकडून वेगळीच मागणी करत असतं. ते मन त्याला म्हणत असतं, बाबा रे, तू इतरांसाठी गाणी करत असतोस ती तुझी चाकरी असते, पण एक गाणं तू स्वत:साठी कर ना!…आणि अशाच मनस्थितीत असताना एका क्षणी संगीतकाराच्या मनात अचानक तार छेडली जाते. त्या तारेवर मनातल्या मनात एखादी धून वाजली जाते आणि ती धून त्याच्या मनात सतत वाजत राहते. ती त्याच्या मनात दडून राहते, साठून राहते. संगीतकाराच्या बाबतीत ही गोष्ट सर्रास होत राहते.

संगीतकार अशोक पत्कींच्या बाबतीत सांगायचं तर अशाच एका गाण्याचे सूर त्यांच्या मनात बर्‍याच दिवसांपासून तरळत होते. ते सूर त्यांनी स्वत:च गाऊन पाहिले, हार्मोनियम काढून त्यावर वाजवून पाहिले. पण त्याचं पुढे काही होत नसल्यामुळे ते त्यांच्या मनात तसेच राहिले. काहीसे अडगळीत पडल्यासारखे. पण कधीतरी त्या सुरांचं सोनं होणार असा पक्का आशावाद त्यांच्या मनात होता.

- Advertisement -

…आणि पुढे झालंही तसंच!…कॅसेटच्या त्या काळात सुरेश वाडकरच्या आवाजात काही भावगीतं गाऊन घेण्याचा एक प्रस्ताव अशोक पत्कींपुढे स्वत:च्या पायापंखांनी चालून आला…आणि अशोक पत्कींच्या मनात साठून राहिलेलं ते सूर झेपावत बाहेर आले. ते त्यांच्याच मनात रेंगाळत राहिलेले सूर होते. त्याच्यावर त्यांनीच शब्द बेतले आणि ते गाणं आकाराला आलं. ते शब्द होते – तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला हा, तव स्पर्श अमृताचा.

अशोक पत्कींना त्या सुरांवर ते शब्द सुचल्यानंतर, का कोण जाणे त्या गाण्याचा अंतराही आपणच स्वत:च लिहावासा वाटला. त्यांनी अंतर्‍याचे शब्द लिहिले – जागेपणी मी पाहिले, ते सत्य सारे देखणे, माझे मला आले हसू, आकाश झाले ठेंगणे, निमिषात सारे संपले, हुंकार ये प्रीतीचा.

- Advertisement -

लिहिता लिहिता पुढच्या अंतर्‍याचेही शब्द त्यांना सुचले, त्यांनी झरझर ते कागदावर उतरवले. त्यातही एखाद्या तज्ज्ञाकडून दाखवून घ्यावं म्हणून फक्त कवी प्रवीण दवणेंना त्यांनी ते शब्द दाखवले. प्रवीण दवणेंनी त्यात अगदी किरकोळ बदल केले आणि यथावकाश ते गाणं सुरेश वाडकरांच्या आवाजात रेकॉर्ड झालं. ‘तू सप्तसूर माझे’ हे एक नितांतसुंदर, आरस्पानी भावगीत म्हणून दर्दी रसिकांनी इतकं मनापासून स्वीकारलं की सुरेश वाडकरांच्या मैफिलीत त्याला या गाण्याची फर्माइश येऊ लागली.

‘तू सप्तसूर माझे’ या गाण्याच्या निमित्ताने अशोक पत्कींच्या मनात बराच काळ रेंगाळत राहिलेल्या एका गाण्याला न्याय मिळाला. ते गाणं म्हणजे एखाद्या कलाकाराच्या मनातल्या सुप्त ऊर्मीचा तो उत्कट आविष्कार होता. कलाकाराच्या आत दाटून राहिलेल्या सुरांचा तो साक्षात्कार होता.

असंच एक अप्रतिम हृदयस्पर्शी गाणं एका अशाच प्रतिभावान संगीतकाराच्या मनात दडून राहिलं होतं. त्या संगीतकाराचं नाव होतं मदनमोहन. त्यांनी संगीताच्या क्षेत्रात तोपर्यंत स्वत:ला सिध्द केलं होतं. त्यांच्या गाण्यांना आणि खुद्द त्यांनाही तोपर्यंत प्रचंड लोकप्रियतेचं वलय लाभलं होतं. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात येऊन आणि स्थिरावूनही त्यांना एक-दोन नव्हे तर तब्बल अठरा वर्षं लोटली होती. पण या अठरा वर्षांपासून त्यांना सुचलेली एक चाल त्यांच्या मनात कायम फेर धरून राहिली होती. या दरम्यान त्यांच्याकडे अनेक सिनेमांचे प्रस्ताव आले. त्यातली अनेक गाणी त्यांनी बघता बघता हातावेगळी केली. त्यातले काही सिनेमे चालले. काही सिनेमे पडले. काही गाणी लोकांनी डोक्यावर घेतली. काही गाणी नुसतीच वाजली. काही अशीच दृष्टीआड झाली. पण मदनमोहनजींच्या मनात असलेलं ते गाणं लोकांसमोर येण्याचा योग काही आला नाही.

बरं, आपल्या मनातल्या त्या गाण्याचा विषय त्यांनी या अठरा वर्षांत कुणाकडे काढलाच नाही असं नाही. बर्‍याच नामवंत निर्मात्या-दिग्दर्शकांना आपल्या मनातली ती चाल त्यांनी कधी एखाद्याच्या घरी, कधी कुणाच्या स्टुडिओत, कधी एखाद्या शांत रात्री-मध्यरात्री ऐकवली. त्यातल्या बहुतेकांनी ती चाल ऐकली. ऐकून तेवढ्यापुरती मदनमोहनजींची वाहव्वा केली. पण त्यानंतर त्या गाण्याचं भवितव्य पुढे सरकलंच नाही. कुणी सिनेमात या गाण्यासाठी तसं दृष्य नसल्याची सबब पुढे केली. पण त्या गाण्याला या ना त्या कारणाने नकारच दिला. पण तरीही गेली अठरा वर्षं केवळ आपल्या मनात जपलेल्या त्या गाण्याचा विसर मदनमोहनजींना पडला नव्हता, ना त्यांनी त्या गाण्याचा नाद सोडला होता.

पण अखेर राज खोसलांनी ‘वह कौन थी?’ या सिनेमाची तयारी करायचं ठरवलं तेव्हा मदनमोहनजींच्या या गाण्याचं नशीब खुललं. दिग्दर्शक राज खोसलांनी या सिनेमाचं रहस्यमय कथानक मदनमोहनना ऐकवलं आणि त्याक्षणीच मदनमोहनजींनी त्यांना आपल्या मनातलं ते गाणं ऐकवलं. राज खोसलांना त्या गाण्याची चाल ऐकताक्षणी पसंत पडली. नुसती पसंत पडली नाही तर ती त्यांच्या त्या चित्रपटातल्या रहस्यमय वातावरणासाठी अगदी योग्य वाटली. त्यांनी ते गाणं करण्यासाठी मदनमोहनजींना हिरवा कंदिल दाखवला. मदनमोहनजींनी राजा मेहंदी अली खानना त्या सुरांवर शब्द लिहायला सांगितले. पुढे ते गाणं लता मंगेशकरांच्या आवाजात अजरामर झालं, त्या गाण्याचे शब्द होते – नैना बरसे, रिमझिम रिमझिम.

ते गाणं त्या काळात कमालीचं हीट झालं. मदनमोहनजींनी संगीत दिलेला तो पहिलाच असा सिनेमा होता की जो पंचवीस आठवडे चालला. लतादिदींनी त्या गाण्यात आपली जान ओतली. आजही ते गाणं ऐकलं की मन स्तब्ध होतं.

असो, अखेर, संगीतकाराच्या मनात साठून राहिलेलं गाणं बराच काळ साठून राहतं, दडून राहतं, पण कधी ना कधी ते गाणं एखादी संधी मिळताच उसळी मारून वर येतं. पुढे संगीतकाराच्या मनात दडून राहिलेलं गाणं रसिकांच्या मनात रूतून राहतं हा त्या गाण्याचा विजय असतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -