घरCORONA UPDATECoronavirus : माथाडी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी घ्या!

Coronavirus : माथाडी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी घ्या!

Subscribe

काम करणाऱ्या माथाडींच्या आरोग्याची काळजी कोण घेणार आहे, असा सवाल अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश बाबूराव रामिष्टे यांनी केला आहे.

मुंबई शहराचा अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. मात्र, येथे काम करणाऱ्या माथाडींच्या आरोग्याची काळजी कोण घेणार आहे, असा सवाल अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश बाबूराव रामिष्टे यांनी केला आहे.
बाजार समितीतील दाना बाजारातील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा असून, यापूर्वी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यालाही लागण झाली होती. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा या हेतूने बाजार समितीचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे व ते आवश्यकही आहे. बाजार समितीचे अधिकारी आणि पदाधिकारी तसेच व्यापारीही घरात बसून काम करीत आहेत, तर माथाडी कामगारांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करावे लागत आहे. आज कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्याना इतकेच माथाडींचे काम महत्त्वाचे आहे. किंबहुना माथाडी कामगार जीवावर उदार होऊन काम करीत असल्यामुळेच मुंबईचा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत आहे. परंतु त्यांच्या आरोग्याची काळजी कुणी करायची, असा सवाल अविनाश बाबूराव रामिष्टे यांनी केला आहे.
रुग्ण सेवा करणाऱ्या डाॅक्टर व इतर कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज तसेच आवश्यकतेनुसार इतर साधने दिली जात आहेत, त्यांचा सरकार वा संबंधित स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरविण्यात आला आहे. मग अशीच काळजी माथाडी कामगारांची का घेतली जात नाही, असा सवाल करतानाच माथाडी कामगारांनाही बाजार समिती वा शासनाच्या माध्यमातून मास्क, जाड ग्लोव्ह्ज आदी गोष्टी मिळाव्यात, अशी मागणी अविनाश रामिष्टे यांनी केली आहे.
बाजार समितीच्या आवारात मालाच्या चढउताराचे काम करताना माथाडी कामगारांना एकत्र यावेच लागते, परस्परांमध्ये अंतर राखणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनाही विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांची नियमित तपासणी करण्याबरोबरच गरज पडल्यास त्यांच्यावर मोफत उपचार करण्याची हमी बाजार समिती व शासनाने द्यावी. त्याचप्रमाणे डाॅक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे माथाडी कामगारांचाही व्यक्तिगत विमा उतरविण्यात यावा, अशी मागणीही अविनाश रामिष्टे यांनी केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -