घरCORONA UPDATEकोरोनाच्या टेस्टसाठी बसवून ठेवलं; इंजिनिअर तरुणीचा काविळीने मृत्यू झाला

कोरोनाच्या टेस्टसाठी बसवून ठेवलं; इंजिनिअर तरुणीचा काविळीने मृत्यू झाला

Subscribe

उल्हासनगरमधील जेष्ठ पत्रकार आणि समाजसेवक रामेश्वर गवई यांची २४ वर्षीय मुलगी प्रणाली गवई हिचे कावीळच्या आजाराने आकस्मिक निधन झाले. इंजिनियरींगमध्ये पदवीधर असलेल्या प्रणालीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. या रुग्णालयात कोरोना टेस्टच्या नावाखाली सुमारे १ तास ४५ मिनिटे बसविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिची तब्येत बिघडल्याने माझ्या मुलीला जीव गमवावा लागला, असा आरोप रामेश्वर गवई यांनी केला आहे.

प्रणाली गवई हीने आयटी विषयात इंजिनियरिंग केले होते. लहानपणा पासूनच अत्यंत हुशार असलेली प्रणाली ही यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होती. सामाजिक क्षेत्रात ती वडीलांप्रमाणेच अग्रेसर होती. ७ एप्रिल २०२० रोजी तिला टायफॉईड झाला होता. तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले होते.

- Advertisement -

२० एप्रिल २०२० ला अचानक प्रणालीची तब्येत खराब झाली तेव्हा तिला मध्यवर्ती रुग्णालयात तपासणीसाठी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रामेश्वर गवई, शिवाजी रगडे आणि अन्य सहकाऱ्यांनी आणले. यावेळी डॉक्टरांनी तिची कोरोना टेस्ट घ्यावी लागेल, असे सांगितले. तिला कोरोना झाला असे समजून डॉक्टर्स आणि कर्मचारी तिची तपासणी करण्यास टाळाटाळ करू लागले. दुपारी २ वाजेपर्यंत तिला कोणत्याही प्रकारचा उपचार मिळाला नाही आणि कोरोना चाचणी देखील झाली नाही. दरम्यान मला वाचवा काहीतरी उपचार करा, अशी विनवणी प्रणाली करू लागली होती.

ही परिस्थिती बघून रामेश्वर गवई, समाजेवक शिवाजी रगडे यांनी उल्हासनगर मनपाचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी प्रणालीवर तातडीने उपचार करण्यात यावा, असे आदेश दिले. यानंतर त्याच दिवशी तिला धन्वंतरी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी प्रणालीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र दुर्दैवाने सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास प्रणालीची प्राणज्योत मावळली.

- Advertisement -

या घटनेमुळे रामेश्वर गवई यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वतः रामेश्वर गवई हे पत्रकार आहेतच, पण त्याशिवाय समाजसेवक आणि विशेषतः रुग्णमित्र म्हणून ते परिचित आहेत. रात्री – बेरात्री कधीही ते रुग्णांच्या मदतीला धावून येतात. मग ते उल्हासनगरचे रुग्णालय असो की मुंबई अथवा ठाणे, परंतु त्यांच्या स्वतःवर अशा प्रकारचा दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे संपूर्ण उल्हासनगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअप या सोशल मीडियावर प्रणालीच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मध्यवर्ती रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप रामेश्वर गवई यांनी केला असून पत्रकार संघटनांनी देखील या घटनेचा निषेध करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मध्यवर्ती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुधाकर शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकारची हयगय केलेली नाही. प्रणाली गवईच्या निधनाचे आम्हाला देखील दुःख आहे, मात्र तिची तब्येत अत्यंत खराब झालेली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -