घरताज्या घडामोडीमालेगांवकरांना दिलासा; संसर्ग झालेले तीन रूग्ण करोनामुक्त

मालेगांवकरांना दिलासा; संसर्ग झालेले तीन रूग्ण करोनामुक्त

Subscribe

मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन कोरोना बाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून आज घरी सोडण्यात आले, मालेगाव शहरातून प्रथमच एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांचा आरोग्य प्रशासनावरील विश्वास वाढुन नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

मालेगांव शहरात करोना बाधित रूग्णांची संख्या १२६ झाली आहे. त्यात आतापर्यंत १२ रूग्णांचा मृत्यु झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतांनाच आज संसर्ग झालेले ३ रूग्ण करोनामुक्त झाले. मन्सुरा हॉस्पिटल मधून कोरोनामुक्त झालेल्या तीनही रुग्णांना घरी सोडण्यात आले. मालेगाव येथील कोरोनामुक्त झालेले हे रुग्ण अनुक्रमे ७ व ९ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिमने योग्य उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात मोठे यश संपादन केले आहे. त्या रुग्णांचा अनुक्रमे २१ व २३ रोजी करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा २४ तासानंतर घेण्यात आलेल्या दुसर्‍या चाचणीतही त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना कोरोनामुक्त घोषित करुन घरी सोडण्यात आले. यात प्रामुख्याने मालेगाव येथील मदिनाबाद परिसरातील ३५ वर्षीय महिला व खुशामदपुरा परिसरातील ४५ वर्षीय महिला तर चांदवड येथील २७ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. यावेळी रूग्णालयात महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, इन्सिडन्ट कमांडट तथा उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, डॉ.सुशिलकुमार शिंदे, डॉ.अरुण पवार, महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय काथेपुरी, माजी आमदार रशीद शेख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

नागरिकांनी तपासणीसाठी पुढे यावे
तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून रुग्णालयातील डॉक्टरांची टिम, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. रुग्णालयातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, इतर सर्व कोरोना रुग्णही या रुग्णांप्रमाणे लवकरच बरे होतील, त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अथवा गैरसमज न ठेवता आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने दवाखान्याशी संपर्क साधावा.
दादा भुसे, कृषीमंत्री

शहर करोनामुक्तीचा ध्यास
शहरातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याच्या बातमीने काही अंशी दिलासा मिळाला आहे. या यशाने हुरळून न जाता मोठ्या संख्येने दाखल रुग्णांमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आणि आपण याच प्रमाणे कसोटीने संपुर्ण जबाबदारी पार पाडल्यास शहरातून कोरोनाला हद्दपार करण्यात नक्की यश मिळेल
डॉ. पंकज आशिया, घटना व्यवस्थापक

चांगले उपचार मिळाले
सामान्य रुग्णालयातील डॉ.महाले यांच्या टिम कडून खुप चांगल्या प्रकारे उपचार व सुविधा मिळाली त्यानंतर जीवन हॉस्पिटल व मन्सुरा हॉस्पिटल या ठिकाणी स्थलांतरीत केल्यानंतर तेथेही चांगला अनुभव व चांगल्या सुविधा मिळाल्या. माझा सात वर्षाचा मुलगा याठिकाणी आजही दाखल आहे, आणि त्याला सोडून जातांना मला खुप दु:ख होत आहे. असा प्रसंग कुणावरही येवू नये यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे.
करोनामुक्त व्यक्ती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -