घरताज्या घडामोडीमालेगावात बंदोबस्तासाठी रेल्वेचे ३८५ पोलीस

मालेगावात बंदोबस्तासाठी रेल्वेचे ३८५ पोलीस

Subscribe

मालेगावात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलासह परजिल्ह्यातील पोलीस कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, ९० हून अधिक पोलिसांना करोनाची लागण झाल्याचे रिपोर्टवरुन निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार शासनाने रेल्वेचे ३८५ पोलीस अधिकारी व सेवक मालेगावात बंदोबस्तासाठी उपलब्ध केले आहेत.

शुक्रवारी (दि.८) मालेगाव येथील पोलीस परेड मैदानावर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दाखल झालेल्या सर्व लोहमार्ग पोलीस अधिकारी व सेवकांना मार्गदर्शन करून त्यांना बंदोबस्ताचे सूचना दिल्या. त्यांनी पोलिसांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. मालेगाव येथे करोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर मालेगाव येथे पोलीस दलाची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या मालेगावात एक हजार ८०० पेक्षा अधीक पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, संदीप घुगे हेही तळ ठोकून आहेत. मालेगावात सुमारे ९० पेक्षा अधिक पोलीस व एसआरपीएफच्या जवानांना करोनाचा संसर्ग झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासह करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लोहमार्ग पोलीस दलाचे ३५ अधिकारी व ३५० कर्मचारी मालेगावसाठी उपलब्ध केले आहेत. त्यामुळे पोलीस दलास मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. सिंह यांनी नव्याने आलेल्या सर्व अधिकारी व सेवकांना बंदोबस्ताचे वाटप केले. सर्व प्रभारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, राज्य राखीव पोलीस दल जालनाचे समादेशक अक्षय शिंदे, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रशांत बच्छाव उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -