घरCORONA UPDATEहॅट्स ऑफ ऋतुजा! कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात जाऊन देतात मानसिक आधार!

हॅट्स ऑफ ऋतुजा! कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात जाऊन देतात मानसिक आधार!

Subscribe

राज्यात सध्या दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे सर्वच जण हैराण आहेत. मुंबईमध्ये तर हा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यातच ज्यांना कोरोना झालाय त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण आता याच कोरोना झालेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी मानसोपचार तज्ञ ऋतुजा कारखानीस-मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. मागील काही दिवसांपासून पालिकेकडून कोरोना रुग्णांना त्यांचा तणाव दूर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अनेकांना विचारणा देखील केली. मात्र कोरोना या महाभयंकर आजारामुळे बऱ्याच जणांनी थेट रुग्णालयात जाऊन समुपदेशन करण्यास नकार दिला. मात्र, ऋतुजा यांनी मात्र तत्काळ होकार दिला आणि कामाला सुरुवात देखील केली.

भाभा रुग्णालयापासून सुरुवात!

ऋतुजा यांनी शुक्रवारपासून आपल्या कामाला सुरुवात केली असून, कुर्ला येथील भाभा रुग्णालयातमध्ये जाऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांचे समुपदेशन केले. यावेळी त्यांनी पालिकेने दिलेले किट परिधान करून रुग्णालयात प्रवेश केला. तसेच कोरोना रुग्णांच्या विभागात जाण्यापूर्वी त्यांनी रुग्णांची नावे लिहून घेतली आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर प्रत्येक रुग्णांचे नाव घेत त्यांचा मानसिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या रुग्णांना त्यांनी काही सकारात्मक गोष्टी सांगितल्या जेणे करून या रुग्णाच्या मनात असलेली नकारात्मकता जाईल. तसेच जर कॅन्सरवर मात करून एखादी व्यक्ती पुन्हा जोमाने उभी राहू शकते तर मग मी का नाही? होय मी देखील बरा होईन आणि हा जो वाईट काळ सुरू आहे त्यावर मात करेन असे एक ना अनेक बाबी सांगत रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान अनेक रुग्णांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार देखील असतो. मात्र असा कोणताही विचार न करता तुम्ही तुमच्या देवाचे नाव घ्या आणि मी पूर्णपणे बरा होईन असे स्वतःच्या मनाशी ठरवा, असे देखील त्यांनी यावेळी रुग्णांना सांगितले. तसेच त्यांना मन:शांतीचे काही उपाय देखील त्यांनी सुचवले. यासोबत त्यांनी सर्व रुग्णांना तुम्ही स्वतःची स्वच्छता राखा, दुसऱ्याच्या बेडवर जाऊन गप्पा मारू नका असे एक ना अनेक उपाय देखील सुचवले.

- Advertisement -

डॉक्टर, नर्स आणि नातेवाईकांचेही करणार समुपदेशन

दरम्यान, ऋतुजा यांनी समुपदेशनाचे तीन भाग केले असून, यामध्ये पहिल्यांदा कोरोना रुग्ण त्यानंतर डॉक्टर तसेच नर्स आणि रुग्णांचे नातेवाईक यांचे देखील त्या समुपदेशन करणार आहेत. डॉक्टर आणि नर्स हे सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. एकीकडे वाढणारे रुग्ण, कामाचा ताण तसेच स्वतःची आपल्या घरच्यांची काळजी यामुळे त्यांना सध्या मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे ऋतुजा त्यांचे देखील समुपदेशन करणार असल्याचे त्यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. दरम्यान, ऋतुजा यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले असून, या कामात त्यांना त्यांच्या पतीची साथ मिळत आहे. पेशाने दिग्दर्शक असलेल्या त्यांच्या पतीने त्यांना या कामात प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या घरच्यांना काळजी होती. पण त्यांनी मला अडवले नाही. सध्या कोरोना रुग्णांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे थेट रुग्णालयात जाऊन मी समुपदेशन देण्याचा निर्णय घेतला.

ऋतुजा कारखानीस-मोरे, मानसोपचार तज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -