घरCORONA UPDATEझाडांच्या छाटणीची परवानगी महानगरपालिकेच्या MCGM 24x7 ॲपवर

झाडांच्या छाटणीची परवानगी महानगरपालिकेच्या MCGM 24×7 ॲपवर

Subscribe

मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत अथवा सकृतदर्शनी धोकादायक झालेल्या झाडाबाबत देखील महापालिकेच्या नागरी सेवा सुविधा विषयक १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

नागरिकांना घर बसल्या वृक्ष छाटणी परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या एमसीजीएस २४ बाय ७ (MCGM 24×7) या भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइडवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत अथवा सकृतदर्शनी धोकादायक झालेल्या झाडाबाबत देखील महापालिकेच्या नागरी सेवा सुविधा विषयक १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

त्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या विभाग कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे. पण त्याचबरोबर  मोबाईल अॅपवरही परवानगी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सात दिवसांमध्ये परवानगी दिली जाईल. महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घ्यावी, असेही आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. छाटणी झाल्यानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या व इतर कच-याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधितांचीच आहे. तथापि, महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे छाटणी केल्यास कचऱ्याप्रकारे विल्हेवाट लावण्याची कार्यवाही ठेकेदारामार्फत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबईत एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे

वर्ष २०१८ मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत, अशी माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -