घरदेश-विदेशसॅनिटायझेशनच्या नावाखाली लुटली ८ लाखांची रोकड!

सॅनिटायझेशनच्या नावाखाली लुटली ८ लाखांची रोकड!

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझेशन केलं जात आहे. कोरोनाचे विषाणू सार्वजनिक ठिकाणाहून लोकांपर्यंत पसरू नयेत, हा त्यामागचा हेतू असतो. मात्र, अशा सॅनिटायझेशनच्या नावाखाली लाखोंची लूट झाल्याची घटना नुकतीच चेन्नईमध्ये घडली आहे. एटीएममध्ये सॅनिटायझेशन करायचं कारण सांगून एटीएममध्ये शिरलेल्या एका व्यक्तीने एटीएममधून तब्बल ८.२ लाखांची रोकड लांबवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या टीमची चौकशी सुरू केली आहे. तसेच, परिसरातल्या सीसीटीव्हींचं फूटेज देखील तपासलं जात आहे.

नक्की घडलं काय?

एटीएममध्ये मोठ्या संख्येने वेगवेगळे लोकं जात असतात. त्यामुळे तिथे कोरोनाचा विषाणू असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे चेन्नईच्या एका खासगी बँकेच्या एटीएममध्ये जेव्हा सॅनिटायझेशन करण्याचं कारण सांगून एक अज्ञात व्यक्ती शिरला तेव्हा तिथल्या ६५ वर्षांच्या सेक्युरिटी गार्डला कोणताही संशय आला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासनाकडून अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याची कामं केली जात आहेत. त्यामुळे त्या सेक्युरिटी गार्डने सदर व्यक्तीला एटीएममध्ये शिरण्याची परवानगी दिली.

- Advertisement -

दरम्यान, ती व्यक्ती आतमध्ये असताना सेक्युरिटी काही अंतरावर उभा राहून वाट पाहू लागला. या दरम्यान तिथे एक ग्राहक पैसे काढण्यासाठी आला असताना त्याने आतल्या व्यक्तीने एटीएम पॅनलवर पासवर्ड टाकल्याचं पाहिलं. तेव्हा पैसे भरण्याचं काम सुरू असेल, असं समजूल ग्राहक देखील बाहेरच वाट पाहात उभा राहिला. काही वेळाने आतली व्यक्ती हातात एक बॅग घेऊन बाहेर आली आणि लागलीच समोर थांबलेल्या रिक्षामध्ये बसून निघून गेली.

सतर्क राहा!

काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय येऊन सेक्युरिटी गार्डने त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत तो भामटा निघून गेला होता. काही काळानंतर बँक मॅनेजर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी केली असता एटीएममधून तब्बल ८.२ लाखांची रोकड लांबवली असल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने एटीएम पॅनलमध्ये पासवर्ड आणि चावी वापरून पैसे काढले होते. त्यामुळे एटीएममध्ये पैसे भरणाऱ्यांपैकीच कुणीतरी ही चोरी केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आपल्याही परिसरात जर अशा पद्धतीने काही संशयित आढळल्यास लागलीच सतर्क होण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -