घरताज्या घडामोडीमराठा आरक्षणात गडबड झाली तर ‘ठाकरे सरकार’कोसळेल

मराठा आरक्षणात गडबड झाली तर ‘ठाकरे सरकार’कोसळेल

Subscribe

शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचा इशारा

नाशिक : मराठा आरक्षणाच्या संदर्भात येत्या 7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या मूळ याचिकेवर सुनावणी होणार असल्याचा समज निर्माण झाल्यामुळे मराठा समाजात संभ्रम आहे. याविषयी राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालून आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडावी. आरक्षणात काही गडबड झाली तर ‘ठाकरे सरकार’ कोसळेल, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी नाशिकमध्ये दिला.
खासगी कामानिमित्त नाशिकमध्ये आल्यानंतर बुधवारी (दि.1) ते शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर उपस्थित होते. याप्रसंगी मेटे म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज 6 जुलैपर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चालणार आहे. त्यानंतर 7 जुलै रोजी मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे. 1500 पानांचे प्रतिज्ञापत्र असल्यामुळे त्यावर ऑनलाईन सुनावणी होणे शक्य नाही. मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवर नव्हे तर, वैद्यकीय प्रवेशावर सुनावणी घेण्याची मागणी राज्य सरकारने न्यायालयाकडे केली पाहिजे. तसेच आरक्षणाविषयी सरकारने आपली बाजू प्रभाविपणे मांडली पाहिजे. हातात आलेले आरक्षण जर समाजाला गमवावे लागले तर, समाज ‘ठाकरे सरकार’ला कदापी माफ करणार नाही, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला. मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी समितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांची आहे. तेवढीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचिही आहे. त्यामुळे आरक्षणात काही गडबड झाली तर राज्य सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तत्कालिन सरकारने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. तसेच शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. साधी माहितीही सरकार मागवत नाही. त्यामुळे या सरकारला मराठा समाजाचे काही देणेघेणे नसल्याचे दिसून येते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे लाभार्थ्यांना 25 हजार रुपये थेट मदत केली पाहिजे. परंतु, सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या विषयी महामंडळाची एकही बैठक सुध्दा झाली नाही. करोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सपशेल अपयशी ठरले. आकडेवारी दाबण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गरीबांना बेडस, रुग्णालय मिळत नसल्याने मृतांचा आकडा वाढला. प्रगतीशील महाराष्ट्राला ही बाब अशोभनिय असल्याची टिका मेटे यांनी केली.
…..
इंदोरीकरांना टार्गेट केले जातेय
प्रसिध्द कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना विनाकारण टार्गेट केले जात आहे. केवळ सांगावांगी चर्चेच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यापूर्वी संभाजी भिडे यांनीही अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. परंतु, बोलण्याचा ओघातून येणार्‍या अशा गोष्टींना सरकारने गांभीर्याने घेवून थेट खटला दाखल करण्याची भूमिका घेणे अयोग्य असल्याचे सांगत विनायक मेटे यांनी इंदोरीकर महाराजांना विशिष्ट लोकांकडून टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला.

 

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -