घरफिचर्समरण पाहिले म्या ‘लाइव्ह’

मरण पाहिले म्या ‘लाइव्ह’

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेनं ‘भारत नैराश्याशी झुंजणारा देश आहे’ असं स्पष्ट शब्दात नमूद केलंय. ‘नैराश्य निर्मूलनाच्या दृष्टीने प्रयत्न करणं हा भारताचा अग्रक्रम असला पाहिजे’ असंही म्हटलं आहे. आत्महत्या हा नैराश्याचाच पुढचा टप्पा असतो. आणि आता सोशल मीडिया हाताशी आल्यानंतर प्रत्यक्ष आयुष्यात माणसं एकटी आणि एकाकी असली तरी आत्महत्या करताना जगाला त्या घटनेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

तो फक्त चोवीस वर्षांचा होता. आग्राचा मुन्ना कुमार. बीएस्सी झाला होता. त्याला लष्करात जायचं होतं. प्रवेश परीक्षा पार करू शकला नाही. आपल्या अपयशामुळे आईबाबांचं स्वप्न धुळीस मिळालं या भावनेतून निराश झाला. इतका, की हे आयुष्य जगण्यात काहीच अर्थ नाही असं त्याला वाटायला लागलं. आत्महत्येचा निर्णय झाला. सहापानी सुसाईड नोट लिहिली आणि मग फेसबुक लाईव्ह झाला. २७५० लोकांनी त्याची आत्महत्या ऑनलाईन बघितली; पण त्यातल्या एकाही माणसाला पोलिसांना, घरच्यांना कुमारच्या परिचितांना फोन करून कळवावंसं वाटलं नाही! २७५० लोकांनी ऑनलाईन आत्महत्येचा खेळ बघितला, क्षणभर हळहळले किंवा सुप्त मनात त्याचा आनंद घेतला…

आणि पुढच्याच क्षणी आपापल्या कामाला लागले. तब्बल २७५० लोकांपैकी एकालाही समोरच्या व्यक्तीचे प्राण वाचवावेत असं वाटू नये हे भीषण आहे. मागे एकदा चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी आत्महत्या करताना सुसाईड नोट फेसबुकवर पोस्ट केली होती. आयबीएन लोकमतमध्ये काम करणार्‍या नितीन शिर्के यांनी आत्महत्या केली. त्यांनीही त्यांची सुसाईड नोट फेसबुकवर पोस्ट केली होती. फेसबुक लाइव्ह स्ट्रीम आत्महत्या हा प्रकार दिवसेंदिवस वाढायला लागलाय. मुंबईत काम करणारी ‘आसरा’सारखी सेवाभावी संस्था ‘सुसाईड अलर्टस’साठी फेसबुकबरोबर काम करतेय. या संस्थेच्या म्हणण्यानुसार गेल्या सहा महिन्यात आत्महत्यांचं फेसबुक लाईव्ह करण्याचे प्रकार ४-५ कॉल्सवरून पन्नासपर्यंत वाढलेत. या सगळ्या घटना आणि आसरासारख्या संस्थांची आकडेवाडी अस्वस्थ करणारी आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेनं ‘भारत नैराश्याशी झुंजणारा देश आहे’ असं स्पष्ट शब्दात नमूद केलंय. ‘नैराश्य निर्मूलनाच्या दृष्टीने प्रयत्न करणं हा भारताचा अग्रक्रम असला पाहिजे’ असंही म्हटलं आहे. आत्महत्या हा नैराश्याचाच पुढचा टप्पा असतो. आणि आता सोशल मीडिया हाताशी आल्यानंतर प्रत्यक्ष आयुष्यात माणसं एकटी आणि एकाकी असली तरी आत्महत्या करताना जगाला त्या घटनेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. डॉ. प्रिया वेदी हिने केलेली आत्महत्या आणि त्यापूर्वी फेसबुकवर दिलेली नोट बघितली तर तिचा प्रश्न सहज सोडवण्यासारखा होता, पण समाज काय म्हणेल या भीतीपोटी तिने आत्महत्येचं पाऊल उचललं. लग्नाला पाच वर्षे झाली होती.नवरा समलिंगी होता.पण हे माहीत झाल्यावरही ‘सुखाचा संसार चालू आहे’ हे नाट्य ती रंगवत राहिली. तिची झालेली फसवणूक टाळत राहिली आणि मग जेव्हा सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलं तेव्हा फेसबुकवर नोट टाकून तिने आत्महत्या केली.

आत्महत्येची भावना प्रबळ होत जाणं, ‘आता जगण्यात काही राम नाही’ असं वाटणं, कुणाशी तरी बोलून त्यातून मार्ग काढून पुन्हा आयुष्य ताब्यात घ्यावंसं न वाटणं ही सगळीच आधुनिक जगण्याची देण आहे. या सगळ्या अत्यंत दुर्दैवी घटनांमधील आत्महत्येची कारणं वेगवेगळी असली तरी सुुसाईड नोट फेसबुकवर टाकणं, स्वतःच्या मनातली व्यथा, आत्महत्येचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून जगापर्यंत पोचवणं ही मानसिकता काय आहे याचा शोध घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अशा सुसाईड नोट्सना लाईक करणार्‍यांच्या मानसिकतेचा आणि सजग संवेदनशीलतेच्या अभावाचा हा प्रकार नक्की काय आहे हेही जरा समजून घेणं त्यानिमित्ताने गरजेचं आहे. कारण जगभर हा ट्रेंड पसरतोय. २७५० लोक बघतात आणि कुणीही त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. आत्महत्येच्या नोट्सना मिळणारे ‘लाईक्स’ मेंदू गोठवून टाकणारे असतात. आत्महत्यांचं प्रमाण तर वाढत आहेच; पण त्यातली सोशल मीडियाची भूमिका दुर्लक्ष करण्याजोगती राहिलेली नाही.

- Advertisement -

प्रत्येक क्षणी माणसांच्या मनात काय चालू आहे, ते काय विचार करत आहेत, त्यांना काय सांगायचं आहे या मूलभूत गोष्टीवर सोशल मीडिया चालतो. एरवी आपल्याला सतत आपल्या मनातले विचार कुणालातरी सांगायचे नसतात. पण सोशल मीडियावर अनेकदा तुमची गरज असो नसो, माणसं लिहीत राहतात. ‘माणसांनी सतत लिहीत-व्यक्त होत राहिलं पाहिजे’ या गरजेवर या माध्यमाचं अर्थगणित चालतं आणि माणसांच्या भावनांचंही. मुळात आत्महत्या करण्याची भावना जेव्हा तीव्र होते तेव्हा मनात प्रचंड निराशा, राग, फसवले गेल्याची भावना असते. सगळ्या गडद काळ्या भावनांनी मन व्यापलेलं असतं. आपल्या आत्महत्येच्या निर्णयाचं कारण जगाला कळलं पाहिजे ही भावना एरवीही आत्महत्या करणार्‍या व्यक्तीच्या मनात असतेच. म्हणूनच लोक आत्महत्येचं कारण सांगणारी चिठ्ठी लिहितात. पण सोशल मीडियामुळे सगळ्या जगाला आत्महत्येचं कारण ओरडून-ओरडून सांगण्याची भावना तीव्र होत जाते. अनेकदा अशा पद्धतीने वागणार्‍या माणसांच्या आयुष्यात त्यांना ऐकून घेणारं कुणीही नसतं. त्यांना जे ‘अटेन्शन’ अपेक्षित असतं ते मिळत नसतं. अपयश, एखादी चूक पचवता येत नाही. अनेकांना ‘नाही’ ऐकण्याची सवय नसते. मनासारख घडलं नाही की माणसं निराश होतात आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून आत्महत्येचं थेट प्रक्षेपण करतात. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचीही भावना तीव्र असावी. ज्याने कुणी आपला छळ केलाय, ज्याने कुणी फसवले आहे त्याला कडक शासन व्हायला पाहिजे, तो/ती सुटता कामा नये याही भावना असतात बहुधा. काहीशी सुडाची भावना म्हणता येईल. म्हणूनही अनेकदा तपशिलाने आणि नावांसकट सुसाईड नोट्स टाकल्या जातात. ‘फेसबुक डिप्रेशन’ नावाचा एक मानसिक आजार आता मानसोपचारतज्ज्ञ अधोरेखित करू लागले आहेत. यात नैराश्यातून आत्महत्या करताना जसा सुसाईड नोट्ससाठी फेसबुकचा वापर होतो त्याचप्रमाणे फेसबुकच्या अतिरेकी वापराने आत्महत्येची भावना प्रबळ होत जाते असंही या विषयातले तज्ज्ञ मानतात.

मग प्रश्न पडतो, सोशल मीडियाचाच वापर करून आत्महत्या करू इच्छिणार्‍या लोकांना त्या भावनेपासून आपण परावृत्त करू शकतो का? काही तज्ञांच्या मतानुसार आत्महत्येचे विचार मांडणार्‍या पोस्टचाच उपयोग लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी करता येऊ शकेल. Qntfy या हेल्थ अनॅलिटीक्स कंपनीचे सीईओ कॉपरस्मिथ यांच्या मते ऑनलाईन जगतात. माणसे एकमेकांशी कोणत्या पद्धतीने कम्युनिकेशन करतात याची माहिती गोळा करून त्यातून काही ट्रेंड्स अधोरेखित करून आत्महत्येचे विचार करणार्‍या लोकांपर्यंत ते कुठलाही भलता-सलता निर्णय घेण्याआधी पोचवता येऊ शकतात. माणसं ऑनलाईन कशा पद्धतीने संवाद साधतात, त्यातून त्यांची व्यक्तिमत्व कशी आहेत याचे अंदाज बांधण्याचे तंत्रज्ञान आज विकसित झालेले आहे. त्याचा वापर ब्रॅण्ड्सपासून राजकीय पक्षांपर्यंत सगळेच करत असतात. न्युरोमार्केटिंग हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. या सगळ्याचा वापर सध्या भांडवलशाही व्यवस्थांना पूरक असा होतोय. पण याच सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानांचा, तंत्रज्ञानाच्या विकसित संकल्पनांचा वापर करून निराशेच्या गर्तेत गेलेल्या, जाणार्‍या माणसांना तिथून बाहेर काढता येऊ शकेल.


– मुक्ता चैतन्य
[email protected]
(लेखिका समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -