घरताज्या घडामोडीशरद पवार पार्थ पवार यांच्यावर नक्की का चिडले?

शरद पवार पार्थ पवार यांच्यावर नक्की का चिडले?

Subscribe

एकीकडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी करायची की CBI ने करायची? याला राजकीय स्वरूप येऊन भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय वाद सुरू झालेला असताना आता त्यात आणखी एका राजकीय वक्तव्याची भर पडली आहे. आणि ते वक्तव्य केलं आहे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून! सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी पार्थ पवारांनी केली होती. त्यासंदर्भात शरद पवारांना विचारलं असता ‘पार्थ पवार अपरिपक्व आहे. त्याच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही’, असं शरद पवार म्हणाले आणि एक नवीच राजकीय चर्चा सुरू झाली. आजवर पवार कुटुंबातील एकाही सदस्याबद्दल पवारांनी इतकी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली नव्हती. अजित पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत, महाविकास आघाडीचा प्रयोग असेल, त्याआधी पक्षातील नाराजीनाट्य किंवा अजित पवारांची वादग्रस्त वक्तव्ये असतील. शरद पवारांनी अजित पवारांना जाहीरपणे कधीच टार्गेट केले नव्हते. माध्यमांच्या समोर उलट अजित पवारांचे कौतुकच केले. मग अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्याबाबतच पवार इतके का चिडले असतील? या सगळ्याचे संदर्भ थेट गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांपर्यंत जाऊन पोहोचतात!

काय झालं होतं गेल्या वर्षी?

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली मावळची जागा खुद्द शरद पवार लढवणार हे जवळपास सगळ्यांनीच निश्चित मानलं होतं. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्याप्रमाणे तयारी देखील चालवली होती. मात्र, त्याचवेळी पवार कुटुंबातली तिसरी पीढी असलेल्या पार्थ पवार यांना देखील राजकारणात उतरवण्यासाठी खुद्द अजित पवार आग्रही असल्याचं आणि त्यांच्यासाठी मावळ मतदारसंघच योग्य असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं. ‘एका कुटुंबात एकाच व्यक्तीला उमेदवारी मिळावी’, अशी भूमिका शरद पवारांनी जाहीर करून देखील पार्थ पवारांसाठीचा अजित पवारांचा हट्ट काही कमी होताना दिसत नव्हता. अखेर थोरल्या पवारांनीच माघार घेत मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडली आणि आपण निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. काका-पुतण्यामध्ये विसंवादाची पहिली सुरुवात तिथूनच झाल्याचं दिसू लागलं.

- Advertisement -

sharad pawar parth pawar 1

पार्थ पवारांचं ते पत्र!

या विसंवादाला खतपाणी घातलं गेलं पार्थ पवारांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या एका पत्रानं. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या एका युवा मंत्र्याचा समावेश असल्यामुळे मुंबई पोलिसांना योग्य पद्धतीने तपास करता येत नसल्याचा खळबळजनक आरोप करण्याच्याही आधी पार्थ पवार यांनी थेट अनिल देशमुखांनाच पत्र लिहून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात CBI कडून तपास केला जावा, अशी थेट मागणी केली. आता राज्यात सत्ता, त्यातही गृहखातं ज्या पक्षाच्या हातात आहे, त्याच पक्षाच्या प्रमुखांच्या नातवाने त्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांकडे खात्याच्या पोलिसांवर आणि अप्रत्यक्षपणे खात्यावर देखील अविश्वास दर्शवणारी अशी मागणी करणं हे खचितच कुठल्या पक्षाध्यक्षाला पटेल!

- Advertisement -

राम मंदिराबद्दल शुभेच्छा!

वास्तविक शरद पवारांनी सुरुवातीपासूनच कोरोनाच्या संकटकाळात राम मंदिर भूमिपूजनासारखा इव्हेंट करण्याच्या विरोधी भूमिका मांडली होती. ‘राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का?’ असं म्हणत त्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आमंत्रण आलं तरी जाणार नाही, असं स्पष्ट शब्दांत ठणकावलं होतं. त्यामुळे साहजिकच भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला त्यांचा असलेला विरोध जगजाहीर झाला होता. मात्र, थोरल्या पवारांच्या भूमिकेला सरळ सरळ छेद देत पार्थ पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा एकदा त्या विसंवादाला हवा मिळाली.

एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहीत पवार यांच्या भूमिकांमध्ये सुसंवाद पाहायला मिळत असताना अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या भूमिका मात्र पहिल्यापासूनच पक्षाच्या किंवा आधीच्या तिघांच्या भूमिकांपासून वेगळ्या पाहायला मिळाल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पार्थ पवारांनी केलेल्या CBI तपासाच्या मागणीमुळे चिडलेल्या शरद पवारांनी अखेर प्रसार माध्यमांसमोरच आपला राग व्यक्त केला. सार्वजनिक ठिकाणी किंवा राजकीय पत्रकार परिषदांमध्ये नेहमीच अतिशय तोलून-मापून बोलणाऱ्या शरद पवारांनी अशा प्रकारे पार्थ पवारांच्या भूमिकेची जाहीरपणे किंमत करणं ही बाब कदाचित भविष्यात पवार काका-पुतण्यांमधल्या विसंवादाला अजूनच हवा देणारी ठरू शकते.


वाचा सविस्तर – पार्थच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही – शरद पवार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -