घरक्रीडाIPL 2020 : आरसीबीची विजयी सलामी; हैदराबादवर १० धावांनी मात  

IPL 2020 : आरसीबीची विजयी सलामी; हैदराबादवर १० धावांनी मात  

Subscribe

आरसीबी संघाने तेराव्या मोसमाची विजयी सुरुवात केली.

मधल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका सनरायजर्स हैदराबादला बसला. आयपीएलच्या तेराव्या मोसमाच्या आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने १० धावांनी पराभूत केले. या सामन्यात १६४ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १ बाद ८९ असा सुस्थितीत होता. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने अर्धशतक झळकावले होते. मात्र, यानंतर लेगस्पिनर युजवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी करत हैदराबादच्या मधल्या फळीतील फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवले. चहलने ४ षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या.

पडिक्कलचे पदार्पणात अर्धशतक

या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कल आणि अॅरॉन फिंच या सलामीवीरांनी बंगळुरूच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. खासकरून पडिक्कलने अप्रतिम फलंदाजी करत आयपीएल पदार्पणात ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने आणि फिंचने १० षटकांतच ८६ धावा केल्या. मात्र, पुढच्या षटकात विजय शंकरने पडिक्कलचा (५६) त्रिफळा उडवला. तर पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्माने फिंचला (२९) पायचीत पकडले. त्यामुळे बंगळुरूची बिनबाद ९० वरून २ बाद ९० अशी अवस्था झाली. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने फटकेबाजी करत ३० चेंडूत ५१ धावांची खेळी केली. त्यामुळे बंगळुरूने २० षटकांत ५ बाद १६३ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

चहलचा भेदक मारा

१६४ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार वॉर्नर अवघ्या ६ धावांवर धावचीत झाला. पुढे बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी हैदराबादचा डाव सावरला. या दोघांनी ७१ धावांची भागीदारी रचली. परंतु, चहलने पांडेला ३४ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. बेअरस्टोने चांगली फलंदाजी सुरु ठेवत ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यालाही चहलने माघारी पाठवले. बेअरस्टोने ४३ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. पुढच्याच चेंडूवर चहलने विजय शंकरचा त्रिफळा उडवला. यानंतर प्रियम गर्ग (१२) वगळता हैदराबादच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे हैदराबादचा डाव १५३ धावांत आटोपला आणि बंगळुरूने हा सामना १० धावांनी जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -