घरIPL 2020IPL : खाकीच्या ‘फ्री हिट’वर बुकींची ‘बॅटिंग’

IPL : खाकीच्या ‘फ्री हिट’वर बुकींची ‘बॅटिंग’

Subscribe

हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद; तरी मोबाईल तंत्रज्ञान अन् वाहनांमध्ये ‘खेळी’ सुरू

साईप्रसाद पाटील : नाशिक

पैशांचा खेळ म्हणून जगभरात नावाजलेल्या आयपीएल स्पर्धेची धूम गेल्या आठवड्यात सुरू झाली अन् लागलीच पोलिसांच्या नाकावर टिच्चून बुकींची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बुकींसह देशातील बुकीही या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत साशंकता असल्यानं अनेकांची निराशा झाली होती, मात्र अखेर बिगूल वाजला आणि टेक्नोसेव्ही बुकींचे तळहात खाजवायला लागले. यंदा प्रथमच लॉकडाऊनमुळे हॉटेल्स, रेस्टोरंट, लॉजिंग्स बंद असले तरी मोबाईल सॉफ्टवेअरच्या मदतीने तसेच वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू असल्याचे दिसते. या प्रकारामुळे ठराविक ठिकाणी धाड मारून बुकींना पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांपुढे नेहमीप्रमाणे यंदाही आव्हान उभे ठाकले आहे.

- Advertisement -

‘बॉल टू बॉल’, ‘टॉस का बॉस’, ‘ओव्हर मेक ओव्हर’ यासह ‘मॅच टू मॅच’ सट्टा लावण्याचे प्रकार राज्यभर बिनबोभाटपणे सुरू आहेत. नाशिकसह मुंबई, ठाण्यातही आजघडीला बुकींचे ठराविक अड्डे बंद असले आणि मोठमोठ्या बार, हॉटेल्सच्या कानाकोपर्‍यात लॅपटॉप, महागडे मोबाईल घेऊन बसलेले दिसत नसले तरी महागड्या कारमध्ये आणि घरातूनच मोबाईलद्वारे सट्टा लावला जात आहे. यंदा आपसुकच बाहेर पडावे लागत नसल्याने व त्या तोडीचे सॉफ्टवेअर डेव्हलप झाल्याने आता बुकींसह खेळींनाही बसल्या जागी सट्टा लावता येणं शक्य झालयं. यामुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र कमालीची वाढली आहे. रोलेट, मटका जुगार, बिंगो, पत्त्यांसह अनेक ऑनलाईन गेम सर्रासपणे सुरू असताना आता आयपीएल सट्टाबाजांनाही रोखण्याचे आव्हान खाकीसमोर असेल. विशेष म्हणजे, इंटरनॅशनल कनेक्शनमुळे स्थानिक पातळीवर पोलीस दादांवरही मर्यादा येत असल्याचं दबक्या आवाजात सांगितलं जातयं. यामुळे या दोन नंबरच्या धंदेवाल्यांची चांगलीच चंगळ आहे.

आठवडा उलटूनही ‘बातमी’ नाही!

यंदाच्या सत्रात आयपीएल हंगामाचा एक आठवडा उलटून गेल्यानंतरही बुकींना पकडल्याची किंवा कुठे धाड पडल्याची बातमी नसल्याने आश्चर्य व्यक्त होतेय. ‘आपलं महानगर’ प्रतिनिधीने या पार्श्वभूमीवर कानोसा घेण्याचा प्रयत्न करत वेगवेगळ्या ठिकाणच्या बुकींशी संपर्क साधला असता संबंधितांनी थेट रेट, बुकिंगचे प्रकार, बुकिंगची वेळ आणि पैशांची देवाण-घेवाण पद्धत याविषयी चर्चा केली. त्याचे कॉल रेकॉर्डही आमच्याकडे उपलब्ध आहेत. यंदा कुठेही ऑफिस वा हॉटेल्समध्ये तसेच प्रत्यक्ष भेटींवर बुकिंग सुरू नसून फक्त मोबाईलवर हे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

‘फोन पे’, ‘गुगल पे’चा वापर जोरात

यंदा बुकींकडून ऑनलाईन सॉफ्टवेअरद्वारेच बुकिंग सुरू असल्याने सायबर पोलिसांना त्यांचा माग काढणे शक्य होऊ शकते. त्यात ‘फोन पे’, गुगल पे यांसारख्या अ‍ॅप्सचा वापर करून पैशांची देवाण-घेवाण सुरू असल्यानंतर तर बँक डिटेल्स आणि लोकेशन, अन्य तपशीलाद्वारे माग काढणे शक्य होऊ शकते. प्रत्यक्षात प्रत्येक सामना आणि सामन्यातील प्रत्येक घडामोडींवर सट्टा लावला जात असताना कारवाई का झाली नाही, असा सवाल केला जातोय.

रेट कमी होताच खिसा गरम

बुकींकडील रेटनुसार खेळींना पैसे मिळतात. जितका रेट कमी, तितका फायदा असे साधारण समीकरण. यात 2 दोन पैशांपासून 25 ते 26 पैशांपर्यंत भाव जातात. मुंबई, चेन्नई आणि आरसीबीवर अधिक पैशांचा पाऊस पडत असल्याचंही दिसून येतं. यात सामन्यावर आणि नाणेफेकीवर पैसे लावल्यास दुप्पट पैसे मिळत असल्याने त्यावर अधिक जोर असल्याचंही दिसून येतं. मात्र, या सर्व प्रकारांकडे खाकीची मेहेरनजर असल्यानं आजही नाशिक, मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांत बुकींची इनिंग जोरदार सुरू आहे.

आयपीएलच नव्हे तर सर्वच सोशल क्राईमवर वॉच ठेवला जात आहे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली असून, आतापर्यंत नाशिकमध्ये तरी आयपीएलवर सट्टा लावला जात असल्याच्या तक्रारी नाहीत. तशा प्रकारांसाठी विशेष ट्रॅप केला असून, बुकिंग सुरू असल्यास लवकरच बुकींवर कारवाई केली जाईल.
        – देवराज बोरसे, वरिष्ठ उपनिरीक्षक, सायबर पोलीस, नाशिक

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -