घरIPL 2020IPL 2020 : धोनी पुन्हा अपयशी; कोलकाताविरुद्ध चेन्नई पराभूत

IPL 2020 : धोनी पुन्हा अपयशी; कोलकाताविरुद्ध चेन्नई पराभूत

Subscribe

चेन्नईचा हा सहा सामन्यांत चौथा पराभव ठरला.   

मधल्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स संघाला बसला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना चेन्नईने १० धावांनी गमावला. हा चेन्नईचा सहा सामन्यांत चौथा पराभव ठरला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्याला या सामन्यात १२ चेंडूत केवळ ११ धावा करता आल्या. याचा फायदा कोलकाताला झाला आणि त्यांनी यंदाच्या आयपीएल मोसमात आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली.

त्रिपाठीची आक्रमक खेळी

अबू धाबी येथे आज झालेल्या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यंदा पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीने कोलकाताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे कोलकाताची पॉवर-प्लेच्या सहा षटकांनंतर १ बाद ५२ अशी धावसंख्या होती. त्रिपाठीने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्याला इतरांची फारशी साथ मिळाली नाही. त्रिपाठीने ५१ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची खेळी केल्यावर त्याला ब्रावोने बाद केले. त्याच्या व्यतिरिक्त कोलकाताच्या एकाही फलंदाजाला वीस धावाही करता न आल्याने त्यांचा डाव १६७ धावांवर आटोपला.

- Advertisement -

चेन्नईचा डाव गडगडला

याचा पाठलाग करताना फॉर्मात असलेला चेन्नईचा सलामीवीर फॅफ डू प्लेसिस १७ धावा करून माघारी परतला. मात्र, शेन वॉटसनने आपले सलग दुसरे अर्धशतक झळकावत एक बाजू लावून धरली. त्याला अंबाती रायडूची (३०) चांगली साथ लाभली. या दोघांनी ६९ धावांची भागीदारी रचली. मात्र, हे दोघे सलग दोन षटकांत बाद झाल्यावर चेन्नईचा डाव गडगडला. त्यांना २० षटकांत केवळ ५ बाद १५७ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांनी हा सामना १० धावांनी गमावला. कोलकाताच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -