घरदेश-विदेशआठवडाभर गिरीश महाजनांचा केरळमध्ये मुक्काम

आठवडाभर गिरीश महाजनांचा केरळमध्ये मुक्काम

Subscribe

पूरग्रस्त जनतेला उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन केरळला रवाना झाले आहेत. दरम्यान ते मदत करण्यासाठी आठवडाभर तिथेच राहणार आहेत.

देवभूमी अर्थात केरळमध्ये पावसाने थैमान घातला असून, तिथले जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारकडून देखील मदत केली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून जीवनावश्यक वस्तू, कपडे इत्यादी साहित्य केरळला रवाना केले आहे. पूरग्रस्त जनतेला उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आज सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० जणांचे वैद्यकीय पथक विविध आजारांशी संबंधित तसेच प्रतिबंधात्मक ट्रकभर गोळ्या-औषधांसह केरळकडे रवाना झाले आहे. विशेष म्हणजे गिरीष महाजन नुसते गेलेच नाहीत तर ते आठवडाभर राहून स्वतः जातीने लक्ष घालणार आहेत.

केरळमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणार – गिरीष महाजन

केरळमध्ये पुरामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता केरळच्या जनतेला मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पुरवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे. केवळ नाममात्र आरोग्य सेवा न पुरविता सर्जरी, मेडिसिन, बालरोग, स्त्रीरोग, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांचा या पथकात समावेश करण्यात आला असून आवश्यक ती सर्व औषधे, गोळ्या, सलाईन्स आणि सामग्री या पथकासोबत देण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास पुन्हा दुसरे वैद्यकीय पथक केरळमध्ये येत्या दोन-तीन दिवसात पाठविण्यात येईल आणि केरळमध्ये दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याचे काम हे वैद्यकीय पथक करेल, असे महाजन यांनी सांगितले.

- Advertisement -
girish mahajan
गिरीष महाजन आपल्या टीमसह

गरज लागल्यास उद्या अजून एक विमान साहित्य घेऊन पाठवणार

इंडियन नेव्ही आणि विमानाच्या माध्यमातून आज औषध आणि सामान पाठवले असून, आणखी गरज लागली तर अजून एक विमान केरळात पाठवू असे महाजन यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. तसेच महाजन स्वतः आठवडाभर राहून संपूर्ण मॉनिटरिंग करणार असल्याची माहिती देखील महाजन यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

महाजनांचा नेहमीच पुढाकार

विशेष म्हणजे गिरीष म्हणजन हे सरपंच असल्यापासून अशा गोष्टीमध्ये पुढे असतात. जेव्हा गुजरातमध्ये अशी परिस्थिती आली होती तेव्हा महाजन तिकडे गेले होते तसेच नंदुरबारमध्ये देखील एकदा संकट आले होते त्यावेळी महाजन धावून गेले असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -