घरमहाराष्ट्रनो गुंडे, ओन्ली मुंढे तुकाराम मुंढेंसाठी नाशिककर रस्त्यावर

नो गुंडे, ओन्ली मुंढे तुकाराम मुंढेंसाठी नाशिककर रस्त्यावर

Subscribe

तुकाराम मुंडेसाठी नाशिकर रस्त्यावर या बातमीबरोबरच जळगाव ,सोलापूर,नंदुबार भागातील बातम्या वाचा थोडक्यात ...

नाशिक महानगरपालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मांडण्यात येणार्‍या अविश्वासाला प्रस्तावाला नाशिककरांनी जोरदार विरोध केला असताना ते मुंढे यांच्या पाठिशी जनता उभी राहिली आहे. मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. नो गुंडे, ओन्ली मुंढे अशा आशयाचे फलक नाशिककरांनी झळकावले. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. त्यामुळे मुंढे यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव आता बारगळला आहे.

करवाढीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपने मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी केली होती. मात्र, मुंढे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिककरांनी शुक्रवारी वॉक फॉर कमिशनर चे आयोजन केले होते. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही मोठ्या संख्येने नाशिककर शुक्रवारी रस्त्यावर उतरले. वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेत त्यांनी नाशिक महापालिकेवर मोर्चा काढला. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरही मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिककरांचा विजय होणारच… अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.मोर्चेकर्‍यांना भेटण्यासाठी मुंढे स्वत: प्रवेशद्वारावर आले. पाठिंब्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. आपल्याला पारदर्शक कामं करायची आहेत. तुमच्या सर्वांच्या साथीने नाशिकचा विकास होणारच आहे. आपण सर्वांनी मिळून नियमांनुसार कामे करायची आहेत,’ असे ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

कांद्याच्या दरात 15 दिवसांत 200 रुपयांनी घसरण

onions लासलगाव : चांगला भाव मिळेल या उद्देशाने अनेक शेतकर्‍यांनी कांदा हा चाळीत साठवला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कांदा दरातील घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. १३ ऑगस्ट रोजी सरासरी १०३० रुपये प्रतिक्विंटलने विकला जाणारा उन्हाळ कांदा हा आज ८३० रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. पंधरा दिवसात कांद्याच्या दरात दोनशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. उन्हाळ कांदा हे परिसरातील शेतकर्‍यांची हुकमी पीक आहे.  त्यात मागी कांद्याला चांगला दर मिळाल्याने यावर्षीही शेतकरी वर्गाने कांदा हा साठवण करण्यावर भर दिला. चार पैसे मिळतील या अपेक्षेने चार-पाच महिन्यांपूर्वी चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा आता बदलत्या वातावरणामुळे चाळीत सडू लागला आहे. त्यातच कांदा बाजार हे ८०० ते ९०० रुपयांच्या पुढे जात नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. एकरी एक हजार ते बाराशे रूपयांपर्यंत खर्च करुन कांद्याला भाव मिळत नसल्याने याची चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. नवा लाल कांदाही बाजारात येऊ लागल्याने चाळीत कांदा ठेवावा की नाही, भाव वाढतील का, आता विक्री केला अन उद्या भाव वाढले तर अशा द्विविधा मनस्थितीत शेतकरी अडकलेला आहे.

उन्हाळ्यात कांद्याला 5 ते 6 महिने टिकवून क्षमता असल्याने शेतकरी वर्ग गरजेनुसार हा कांदा विक्री करत असतो आणि साठवणुकीला प्राधान्य देतो. काही शेतकर्‍यांनी काढणीनंतर लागलीच मार्च ते मेमध्ये उन्हाळ कांदा सरासरी ६००-७०० रुपयांनी विक्री केला होता. त्यावेळी कांद्याची प्रतही उत्तम होती तर वजनही भरघोस होते. मात्र मागील वर्षाप्रमाणे जुलै नंतर तेजी आली तर भाव दोन हजारांपर्यंत जातील या अपेक्षेने काही शेतकर्‍यांनी तेव्हा विक्री न करता कांदा चाळीत साठवला होता. त्याच अपेक्षेने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने उन्हाळ कांदा हा चाळीत साठवलेला आहे. तीन-चार महिने चाळीत साठवलेला कांदा आज विक्रीस आणला जात असल्यामुळे शेतकर्‍याला चार पैसे मिळावे ही रास्त अपेक्षा असते. मात्र कांदा दरावरील शुक्लकाष्ट काही कमी होताना दिसत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

- Advertisement -

चारशे रुपयात विठ्ठल-रुक्मिणीचे झटपट दर्शन

ashadi ekadhashi vitthal songsसोलापूर । प्रत्येकी चारशे रुपये घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे झटपट दर्शन घडवणार्‍या एकास पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी या प्रकरणी (शुक्रवार) आरोपी कैलास डोके (रा. पंढरपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित काही जणांना हाताशी धरुन पैसे घेऊन दर्शनाचा काळाबाजार करण्याचा उद्योग सुरु असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. मध्यंतरी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, कोणीही असो कारवाई केली जाईल असे त्यांनी जाहीर केले होते. त्यांनीखडसावल्या नंतर काही दिवस हा प्रकार थांबला होता. परंतु, पुन्हा संबंधित मंडळींनी पैसे घेऊन दर्शनाला सोडण्याचा उद्योग नियोजनबध्दरित्या सुरु केला असल्याचे चित्र समोर येत आहे. गुरुवारी (ता. 30) लक्ष्मी श्रीनिवासराव पीठे आणि त्यांचे पती श्रीनिवासराव प्रसादराव पीठे (रा. हैद्राबाद) हे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी आरोपी कैलास डोके याने त्यांच्याकडून प्रत्येकी चारशे रुपये घेऊन दर्शन घडवण्याचे आमिष दाखवले. पीठे यांनी दोघांचे मिळून आठशे रुपये कैलास डोके याला दिल्यावर त्याने मंदिर समितीच्या एका सदस्यास फोन करुन दर्शनपासची व्यवस्था केली. त्यानंतर डोके हा पास घेऊन पीठे दांम्पत्यास दर्शनासाठी घेऊन जात असताना मंदिर सुरक्षेचे काम करणार्‍या पोलिस नाईक वामन पोपट यलमार यांना संशय आला. त्यांनी पीठे यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांना डोके हा पैसे घेऊन दर्शनास जात असल्याची माहिती पुढे आली. त्यांनी डोके याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक काळे पुढील तपास करीत आहेत.


बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

जळगाव । धरणगाव तालुक्यातील चोरगाव शेत शिवारात विषारी साप चावल्याने १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. बालकास तत्काळ खाजगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत रोहित हा शेतात काम करीत होता. अचानक रोहित याला विषारी सापाने चावा घेतला. यावेळी रोहित याने आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून त्याच्या मामाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रोहित जमिनीवर पडलेला आढळून आला. त्याला तत्काळ खाजगी वाहनाने उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. खेताडे यांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले.


 

१२५ वर्षांत प्रथमच बाप्पांची मिरवणूक

ganapati
गणपती बाप्पा

नंदुरबार । नंदुरबार येथील सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील बाबा गणेश मंडळाने मिरवणूक काढण्यासाठी कर्नाटकमधून नवीन रथ तयार करून आणला आहे. त्यानिमित्त संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून बाबा गणपतीची शहरातील विविध भागांतून मिरवणूक काढण्यात आली. सव्वाशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच संकष्टी चतुर्थीला बाबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा करून महिला सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीदरम्यान बाबा गणपतीचा रथ व दादा गणपतीचा रथ समोरासमोर आल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. सुमारे सहा तास ही मिरवणूक सुरू होती. यावेळी अनेक मान्यवरांनी बाप्पाचे दर्शन घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -