घरमनोरंजनटेक केअर गुड नाईट; आभासी जगाच्या अनभिज्ञतेचा धोका

टेक केअर गुड नाईट; आभासी जगाच्या अनभिज्ञतेचा धोका

Subscribe

जस जसं तंत्रज्ञान बदलत जातं. तस तसं त्यातून निर्माण होणारे धोके वाढत जात आहेत. यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. पण या सगळ्यातून बाहेर कसं पडावं, हे मात्र अद्याप कळलेलं नाही. त्यामुळे बॅँकेतून पैसे चोरीला जाणे, एटीएम हॅक करणे, मुलींचे एमएमएस काढणे यासारख्या घटना सर्रास घडतात. सायबर गुन्हे घडू नयेत यासाठी काय काळजी घेतली जावी, याबाबत अज्ञान आहे. या सगळ्यावर ‘टेक केअर गुड नाईट’ हा चित्रपट आधारीत आहे. मात्र काही छोट्या चुकांमुळे चित्रपटांची कथा विस्कळीत झाली आहे.

एका मोठ्या कंपनीत अविनाश (सचिन खेडेकर) काम करत असतो. कंपनीत झालेल्या सॉफ्टवेअरच्या बदलामुळे तो ते सॉफ्टवेअर शिकण्याऐवजी कंपनीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतो. निवृत्तीतून मिळालेल्या पैशातून अविनाश आणि त्याची पत्नी आसावरी (इरावती हर्षे) युरोपला फिरायला जातात. यावेळी ते त्यांची मुलगी सानिका (पर्ण पेठे)हिला एकटीला घरीच ठेवतात. युरोपमधून परत आल्यावर अविनाशच्या अकाऊंटमधून ५० लाख गायब झाले असल्याचं लक्षात येतं. याबाबत ते पोलिसात तक्रार करतात. ऑनलाईन चॅटींग दरम्यान सानिकाची ओळख गौतम (आदीनाथ कोठारे) याच्याशी होते. त्यानंतर त्यांच्या गैरहजेरीत सानिका गौतमला घरी बोलवते. यावेळी त्यांच्यात जे काही घडतं त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर लीक होतो. यानंतर अविनाश आणि इरावती हा व्हिडिओ इंटरनेटवर काढून टाकण्याची पोलिसांना विनंती करतात. यावेळी पोलीस इन्स्पेक्टर पवार (महेश मांजरेकर)या सगळ्या प्रकरणाचा धडा लावतात. मात्र या गुंतागुंतीच्या केसचा धडा लावणे फारसे सोपे नसते. त्यांनी ज्या वेटरला गुन्हेगार म्हणून पकडले असते ते खरे गुन्हेगार नाहीत हे त्यांच्या लक्षात येते आणि तिथून सुरू होतो गुन्ह्याचा खरा प्रवास. या सगळ्यामागे गौतम आहे का? अविनाशचे पैसे परत मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळणार आहे.हा गुन्ह्याचा शोध घेतानाचा संपूर्ण प्रवास रंजक आहे. तुम्ही पहिल्या प्रसंगापासूनच चित्रपटात गुंतत जाता, मात्र तरीही अनेक प्रश्न तुम्हाला चित्रपट बघताना पडतात. मोठ्या कंपनीत कामाला असणारा, अलिशान फ्लॅटमध्ये राहणारा, स्मार्टफोन वापरणारा, आपल्या मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवणार्‍या अविनाशला ओटीपी, सायबर गुन्हे, ईमेल याबाबत काहीच माहिती नसते. एवढं शिकलेला अविनाशला यातील माहिती नसावी याबाबत आश्चर्य वाटतं. त्याचप्रमाणे गौतम ज्या पद्धतीने सानिकाचं युजरनेम सहजतेने मिळवतो. ते पटत नाही. चित्रपटातील या गोष्टी सोडल्या तर बाकी चित्रपट उत्तम जमून आला आहे.

हा संपूर्ण चित्रपट सध्या आपल्या अवतीभोवती घडत असणार्‍या गोष्टींवर आधारीत आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राला स्वत:चे असे वेगळे अस्तित्व आहे. सानिका आणि तिच्या आईमध्ये होणारे संवाद खूप प्रभावी आहेत. या चित्रपटात सायबर गुन्ह्यांबरोबर सध्या पालकांबरोबर असलेले मुलांचे नाते आपल्याला प्रत्येक प्रसंगातून अधोरेखित केलं जातं. आपल्या मुलीची चूक झाली असली तरी एखाद्या कठीण प्रसंगी आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभे रहा, असा संदेश तुम्हाला चित्रपट बघताना मिळतो. चित्रपटातील संवाद छान जमून आले आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही चित्रपटात गुंतत जाता. चित्रपटाचा पहिला अंक तुमची उत्कंठा वाढवतो. मात्र उत्तरार्धात तुमची उत्सुकता फार टिकत नाही. इरावती हर्षे, सचिन खेडेकर, पर्ण पेठे या सगळ्याच कलाकारांनी आपली कामं चोख पार पाडली आहेत. मात्र लक्षात राहतं ती महेश मांजरेकरांची भूमिका. महेश मांजरेकरांचा संपूर्ण चित्रपटात असणारा सहज वावर, त्यांच्या तोंडी असलेले संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतात. तुमच्या आजूबाजूला घडणार्‍या या घटना असल्यामुळे चित्रपट नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्याशी जोडाल. सायबर गुन्ह्यातील अनेक गोष्टी या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासमोर उलगडल्या जातात. त्यामुळे चित्रपट तुमचं मनोरंजन करेल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -