घरठाणेवैशाखरे शाळेत प्लास्टिकचा राक्षस बाटलीत बंद

वैशाखरे शाळेत प्लास्टिकचा राक्षस बाटलीत बंद

Subscribe

परिसरातील गाव आणि वाड्यांना प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न

सर्वत्र प्लास्टिकच्या अति वापराने पर्यावरण दूषित आणि वातावरण प्रदूषित होत आहे. शासनाच्या प्लास्टिक वापराच्या बंदीला झुगारून अजूनच त्याचा वापर होत आहे. प्लास्टिकचा हा धोका दूर करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील वैशाखरे शाळेच्या मुख्याध्यापिका दिपश्री इसामे यांनी मालती ट्रस्टचे अध्यक्ष डी. जी. महाजन यांच्या मार्गदर्शना खाली ‘ घर ते शाळा, शाळा ते घर, प्लास्टिकचा राक्षस बाटलीत बंद कर.’ हा उपक्रम राबवला आणि परिसरातील गाव आणि वाड्यांना प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा विविध उपक्रमशील शाळेला मागील वर्षी आदर्श शाळा आणि या वर्षी गावाला आदर्श ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मुरबाड तालुक्यातील 1 हजार 587 लोकसंख्या असलेल्या वैशाखरे ग्रामपंचायतीला यावर्षीचा आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील 63 मुलगे व 83 मुली असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वैशाखरे या शाळेसही मागील वर्षी आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या शाळेत वैशाखरे, एक कि.मी. अंतरावरील प्रधानपाडा, दादरावाडी, खडकपाडा, दोन कि.मी. वरील पेंढरी व साडे तिन कि. मी. अंतरावरील वाघाची वाडी येथून मुले पायी शाळेत येत असतात. या शाळेच्या मुख्याध्यापिका साहित्यीक दिपश्री ईसामे या आपले सहकारी शिक्षक कांचन चौधरी, जगदीश सूर्यराव, महेंद्र धामणे यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवत असतात.

- Advertisement -

व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, साक्षरता, पाणी बचत, यासाठी विविध जनजागृती रॅली, वृक्षारोपण, प्लास्टिक व प्रदूषण मुक्ती या गोष्टीकड़े त्यांनी विशेष अभियान राबवले आहे. मालती ट्रस्टचे अध्यक्ष आयआयटियन डी. जी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पासून त्यानी वैशाखरे ग्रामपंचायत प्लास्टिक मुक्तीचे अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ” घर ते शाळा, शाळा ते घर।प्लास्टिकच्या राक्षसाला बाटलीत बंद कर ” असे नाव देऊन उपक्रम सुरू केला आहे.

पाचवी ते आठवीची मुले शाळेत येता जाता प्लास्टिकच्या बाटलीत रस्त्यात, गावात जिथे दिसेल तिथले चॉकलेट, गुटखा, कुरकुरे, वेफर यांच्यासाठी वापरलेले प्लास्टिक व पिशव्या गोळा करून बाटलीत कोंबून त्याला झाकण लावून शिक्षकांकडे राक्षस बाटलीत कोंबला या आनंदाने आणून देतात. या साठी शाळेतील मुलांनी गावात लग्न समारंभ प्रसंगी वापरलेल्या पाण्याच्या बाटल्या गोळा केल्या आहेत. आतापर्यंत सातशेहून जास्त बाटल्या मुलांनी राक्षसांना कोंडून भरल्या आहेत. याच बाटल्यांचा वापर शाळेच्या आवारातील झाडांना शोभीवंत कुंपण कारण्यासाठी केला आहे. त्यामुळे शाळेचे आवार सुंदर नि स्वच्छ दिसत आहे. प्लास्टिकच्या मोठ्या बाटल्यांतून तूर, घेवड्याची लागवड केली आहे. त्यामुळे शाळेची परसबाग सुद्धा हिरवीगार झाली आहे. या उपक्रमाला पंचायत समिती सदस्या सीमा घरत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुजित घरत, उपाध्यक्ष अंकुश भोईर सरपंच, सदस्य यांचे सहकार्य मिळत आहेत.

- Advertisement -

” लॉक डाऊन असतानाही आम्ही आमचे अभियान थांबले नाही. ग्रामपंचायतच नव्हे तर आजूबाजूची गावे सुद्धा प्लास्टिक मुक्त करायची आहेत. ही एक छोटीशी सुरुवात आहे. सगळ्यांनाच पटले, स्वीकारले, केले तर देश प्लास्टिक मुक्त होईल.
– दिपश्री ईसामे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा वैशाखरे.

” खूप छान उपक्रम राबविले जातात. जिथे शाळा आदर्श ते गावही आदर्श झाल्याशिवाय राहत नाही. आमची ग्रामपंचायत याच वर्षी आदर्श म्हणून सन्मानित झाली आहे.
– सीमा घरत, सदस्या व माजी उपसभापती, पंचायत समिती मुरबाड

” मुले शाळेतून आली की रोज गावातील प्लास्टिक उचलून बाटलीत टाकताना आम्ही पाहिले आम्ही त्यांना काय येड्या सारखी करता असे म्हणत होतो. पण आज आमचे गाव प्लास्टिक मुक्त होऊन त्याच बटल्यांची डिझाइन बघून आनंद होत आहे. आम्हीही शिक्षकांचे कौतुक केले आहे.
– श्रुती लाटे, ग्रामस्थ, दादरावाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -