घरफिचर्सरानभाज्या बाजाराच्या कचाट्यात

रानभाज्या बाजाराच्या कचाट्यात

Subscribe

इंट्रो भारतात खेड्यांची संख्या जास्त असली तरी आता शहरात राहणार्‍यांची संख्या वाढायला लागली आहे. दिवसेंदिवस रोजगारासाठी लोक गाव सोडत आहेत. हे लोक फक्त गाव सोडत नाहीत, तर गावाबरोबर सुटतो त्यांचा आहार. खाण्याचा कस, चव आणि विविधता वाढवणार्‍या बहुविध वनस्पती. या वनस्पती शहरात कुठे मिळणार? या सगळ्या वनस्पतींच्या बलिदानावर तर आज शहरे उभी राहत आहेत. एके काळी प्रसिद्ध असलेली बाणेरी बोरे आज कुठे शोधायची? शाळा कॉलेजच्या बाहेर मिळणारे आवळे, बोरे, चिंच, करवंदे, आंबोळ्या, अमोन्या-कामोन्या, अळीव यांची जागा आज कसहीन व सत्वहीन कुरकुर्‍यांनी घेतली आहे.

करटुली, चाईचे कोंब आणि मोहर, भारंगी, चीचुर्डी, कुर्डूची भाजी, सुरण, असे अनेक प्रकारच्या भाज्या तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत. या भाज्यांची शेती केली जात नाही यामुळे सर्व रानभाज्या आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, जिथे माणसाची वर्दळ अजून तितकी वाढली नाही तेथे या भाज्या आढळतात. या भाज्यांना बाजारात जसे जसे किंमत मिळू लागते तसे तसे या भाज्यांचे जंगलातील अस्तित्व धोक्यात येत आहेत. निव्वळ या भाज्या जंगलातून संपत आहेत हा एकच चिंतेचा विषय नाही, तर या भाज्या गरिबांच्या आहारातूनही कमी होत आहेत. आलू, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी या भाज्या खेड्यात वाढू लागले आहेत.

अनेक आदिवासी व खेड्यातील बांधव बाजारात रानभाजी विकून बाजारातून बटाटे, कोबी या भाज्या विकत घेतात. याबाबत त्या त्या गावातील लोकांनी संवर्धनाचे धोरण ठरविणे गरजेचे आहे. अन्यथा आपण या भाज्या गमावू. पुढच्या पिढीला या भाज्या फक्त पुस्तकात दिसतील. ही आपल्या पिढीची खूप मोठी चूक असेल. दुष्काळात आणि गरिबीत लोकांनी वेगवेगळ्या वनस्पती अन्न म्हणून खाण्यात आणल्या. या शोधाच्या पाठीमागे भूक ही सर्वात मोठी प्रेरणा होती. अगदी भाताची साळ कांढून उरलेल्या कोंड्यापासून ते गाळाची माती खाऊन पोट भरल्याच्या आठवणी आता पन्नास साठीत असलेले लोक सांगतात. कोणत्याही गावशिवारातील शंभरहून अधिक वनस्पती या खाद्य वनस्पती म्हणून शोधल्या गेल्या. हा शोध घेताना कैकानी विषबाधा होऊन आपले जीवही गमावले असतील. या वनस्पती भाज्या म्हणून पोषक आणि औषधीही असतात.

- Advertisement -

जेव्हा दवाखान्यांनी तालुक्याच्या सीमा ओलांडल्या नव्हत्या तेव्हा गावकुसातील कैक वनस्पती या प्राथमिक उपचार केंद्र म्हणून लोकांना कामी येत होत्या. आजही गावातील लोक या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. जुलाब थांबण्यासाठी लाजाळूच्या मुळी दह्यामध्ये वाटून प्यायला दिल्या की एक-दोन दिवसात फरक पडतो. शेतात कापणीची कामे करताना हमखास बोट कापले जाते. कुठेही शेतात, बांधावर उगवलेल्या जखमा जोडी किंवा घावटीच्या पाल्याचा रस लावला की लगेच रक्त थांबायचे. बिबा तर प्राथमिक आरोग्य केंद्रच समजले जाते. खोकला लागला तर बिब्याला सुईने दोन-चार टोचे मारून उकळत्या दुधात टाकून ते प्यायले की खोकला गायब. निर्गुडीचा पाला, धोत्र्याचे फळ, बेशर्मीची पाने या अतिशय निरुपयोगी समजल्या जाणार्‍या वनस्पती देखील खूप औषधी आहेत. त्यांचे गावजीवनातील महत्व आजही खूप आहे. भारतात खेड्यांची संख्या जास्त असली तरी आता शहरात राहणार्‍यांची संख्या वाढायला लागली आहे. दिवसेंदिवस रोजगारासाठी लोक गाव सोडत आहेत. हे लोक फक्त गाव सोडत नाहीत, तर गावाबरोबर सुटतो त्यांचा आहार. खाण्याचा कस, चव आणि विविधता वाढवणार्‍या बहुविध वनस्पती. या वनस्पती शहरात कुठे मिळणार? या सगळ्या वनस्पतींच्या बलिदानावर तर आज शहरे उभी राहत आहेत. एके काळी प्रसिद्ध असलेली बाणेरी बोरे आज कुठे शोधायची? शाळा कॉलेजच्या बाहेर मिळणारे आवळे, बोरे, चिंच, करवंदे, आंबोळ्या, अमोन्या-कामोन्या, अळीव यांची जागा आज कसहीन व सत्वहीन कुरकुर्‍यांनी घेतली आहे.

आमच्या शेता शेजारी मलन्नांचे शेत होते. त्यांच्या आणि माझ्या वडिलांच्या गप्पा व्हायच्या . वरण आमटी मधील डाळींच्या वापरावरून एकदा चर्चा निघाली. आम्हाला डाळी खूपच कमी लागतात असे ते सांगत होते. वडिलांनी विचारलं, ते कसं? हे सगळं संभाषण तेलगु भाषेत सुरू होतं. मलंन्ना सांगू लागला. पावसाळ्यात आपसूक उगवलेल्या कित्येक वनस्पती या भाजी म्हणून खाल्ल्या जातात. तांदूळखा, पाथरी, छोटी घोळ, मोठी घोळ, आघर्डा, कुरडू, तरोटा, सुरण, केना, या सगळ्या वनस्पतींची आलटून पालटून भाज्या केल्या तरी आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी नवीन भाजी खायला मिळते. यातल्या काही भाज्या प्रमाणापेक्षा जास्त उपलब्ध असल्यामुळे त्या वाळवून देखील ठेवल्या जातात. मग या भाज्या उन्हाळ्यात खाल्या जातात. गावात भाज्यांचा कंटाळा आला असे कधी होतच नाही. शेतात खुरपताना अनेक गोष्टी ज्या तन म्हणून बाजूला फेकल्या जातात, त्याची भाजी केली जाते. बांधावर कर्टूल्याची वेल सहज उगवून येते. या वेलीला सलग सहा महिने कर्टूल्या लागत राहतात.

- Advertisement -

कर्टूल्याची भाजी करून त्या दिवशीचा भाजीचा प्रश्न सोडवला जात असे. त्यामुळे आज कोणती भाजी आणायची, ही डोकेदुखी संपायची. एखाद्याला डोकेदुखी असेल तर त्याला कर्टूल्याच्या पानाचा रस व मिरी एकत्रित करून डोक्याला चोळले तर डोकेदुखीही कमी होते. कुरडू किंवा शंकरोबाच्या कोवळ्या पानाची भाजी अधून मधून खात राहीले तर पोट साफ न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही भाजी कुठेही सहज उगवून येते. याची फुलं मराठवाड्यात बदक्कमा या सणासाठी वापरतात. चारा म्हणून जनावरांना देखील ही वनस्पती दिली जाते. हिंगोली भागात लोकं पवन्या गवताचे तूप खाल्लो असे सांगतात. सुरवातीला वाटलं की पवन्या म्हणजे वनस्पती तूप असेल. मात्र नंतर कळलं की, जनावरं पवन्या गवत खाल्ली की त्यांच्या दुधापासून जे तूप बनवलं जातं त्याला पवन्याच तूप म्हणतात.

या तुपाला वेगळी चव असून हे इतर तुपापेक्षा पौष्टिक आहे, असे स्थानिकांचे निरीक्षण आहे. यासाठी कयाधू नदीच्या थडीवरील हे गवत जपण्याचे काम स्थानिक शेतकरी करीत आहेत. ज्या भागात खुरटं गवत सोडून दुसरं काही नाही, असे समज असणार्‍या ठिकाणी देखील चौरस टाकून त्यातल्या वनस्पती मोजल्या तर २०-२२ वनस्पती सहज आढळतात. एक मीटरचा चौरस आखून त्यामध्ये किती वेगवेगळ्या वनस्पती आढळतात हे मोजणे ही आपल्या भागातील संपन्नता मोजण्याची एक पद्धत आहे. आपल्या गावशिवारातील वनस्पतींचा शोध घेणे, अभ्यास करणे हे त्यांच्या संवर्धनासाठी खूप उपयुक्त असते. प्रत्येक गावाला आपल्या गावातील जैवविविधता म्हणजेच उपयुक्त वनस्पती आणि त्यांबद्दलचे लोकं ज्ञान नोंदविण्यासाठी जैवविविधता बोर्डाकडून आर्थिक मदतही मिळते. प्रत्येक गावात जैवविविधता समिती तयार करणे बंधनकारक आहे. आज यासगळ्या गोष्टी कागदावरच सुरू आहेत.


-बसवंत विठाबाई बाबाराव

लेखक पर्यावरण विषयक अभ्यासक आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -